बुधवारपासून सुरू झालेल्या फ्रेंच खुल्या सुपर 750 दर्जाच्या पुरूष आणि महिलांच्या आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या पीव्ही सिंधू, लक्ष्य सेन, सौरभ वर्मा यांनी विजयी सलामी देत दुसरी फेरी गाठली. मात्र सायना नेहवालला दुखापतीमुळे पहिल्या फेरीतून निवृत्त व्हावे लागले. के. श्रीकांतचे आव्हान पहिल्या फेरीतच समाप्त झाले.
पॅरिस : बुधवारपासून सुरू झालेल्या फ्रेंच खुल्या सुपर 750 दर्जाच्या पुरूष आणि महिलांच्या आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या पीव्ही सिंधू, लक्ष्य सेन, सौरभ वर्मा यांनी विजयी सलामी देत दुसरी फेरी गाठली. मात्र सायना नेहवालला दुखापतीमुळे पहिल्या फेरीतून निवृत्त व्हावे लागले. के. श्रीकांतचे आव्हान पहिल्या फेरीतच समाप्त झाले.
ऑलिम्पिकमध्ये सलग दोनवेळा पदक मिळविणाऱ्या पीव्ही सिंधूने महिला एकेरीच्या पहिल्या फेरीतील सामन्यात डेन्मार्कच्या ज्युली जेकॉब्सनचा 21-15, 21-18 असा पराभव करत विजयी सलामी दिली. सिंधूचा दुसऱ्या फेरीतील सामना डेन्मार्कच्या ख्रिस्टोफर्सनविरुद्ध होणार आहे. लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक मिळविणाऱ्या सायना नेहवालला मात्र पहिल्या फेरीतच स्नायू दुखापतीमुळे स्पर्धेतून निवृत्त व्हावे लागले. जपानच्या तेकाहेसी आणि सायना यांच्यात पहिल्या फेरीतील सामना खेळविला गेला. या सामन्यात तेकाहेसीने 21-11, 9-2 अशी आघाडी मिळविली असताना सायनाने दुखापतीमुळे माघार घेतली.
पुरूष एकेरीच्या पहिल्या फेरीतील सामन्यात भारताच्या लक्ष्य सेनने आयर्लंडच्या नेग्युयेनवर 21-10, 21-16 अशी मात करत दुसरी फेरी गाठली. सेनचा दुसऱ्या फेरीतील सामना सिंगापूरच्या येवीविरुद्ध होणार आहे. अन्य एका सामन्यात भारताच्या सौरभ वर्माने 43 मिनिटांच्या कालावधीत ब्राझीलच्या कोलेहोचा 22-20, 21-19 असा पराभव करत दुसऱ्या फेरीत स्थान मिळविले. सौरभचा दुसऱ्या फेरीतील सामना जपानच्या निशीमोटोविरुद्ध होईल.
पुरूष एकेरीत भारताच्या किदांबी श्रीकांत, पी कश्यप आणि एचएस प्रणॉय यांचे आव्हान मात्र संपुष्टात आले. जपानच्या टॉप सीडेड मोमोटोने के. श्रीकांतचा 18-21, 22-20, 21-19 असा 79 मिनिटांच्या कालावधीत पराभव केला. दुसऱ्या एका सामन्यात फ्रान्सच्या लिव्हेझने पी. कश्यपवर 21-17, 17-21, 21-11 तसेच चीन तैपेईच्या चौथ्या मानांकित चीनने भारताच्या एचएस प्रणॉयवर श्1-11, 21-14 अशी मात करत दुसऱ्या फेरीत स्थान मिळविले. पुरूष दुहेरीच्या पहिल्या फेरीतील सामन्यात भारताच्या एम.आर. अर्जुन-धृव कपिला यांनी आयर्लंडच्या मॅगी-रेनॉल्डस यांचा 21-13, 21-7 असा पराभव करत विजयी सलामी दिली. मिश्र दुहेरीच्या पहिल्या फेरीतील सामन्यात भारताच्या सात्विक साईराज-अश्विनी पोनाप्पा यांनी डेन्मार्कच्या थिएरी-सुरो यांचा 21-19, 21-15 असा पराभव केला. महिला दुहेरीच्या सामन्यात कोरियाच्या टॉप सीडेड सोही-शिन या जोडीने भारताच्या अश्विनी पोनप्पा-एन. सिक्की रेड्डी यांच्यावर 21-16, 21-11 अशी मात केली.