सातारा क्राईम न्यूज: लिव्ह इन रिलेशनमध्ये राहणाऱ्या महिलेची हातोड्याने हत्या, १२ तासात खुनाचा उलगडा, कारण समोर...
वाकड येथे सोमवारी दि. २५ रात्री साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली होती. जयश्री विनय मोरे (वय २७, रा. मारुंजी, हिंजवडी) असं खून झालेल्या महिलेचं नाव आहे
सातारा : पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर खंडाळ्याजवळील खंबाटकी घाटात अज्ञात महिलेचा मृतदेह आढळून आल्याने तालुक्यात खळबळ उडाली होती. हा मृतदेह वाकड (पुणे) पोलीस ठाण्यात तक्रार दाखल असलेल्या बेपत्ता महिला जयश्री मोरे हिचा असल्याचे खंडाळा पोलिसांना समजले. त्यामुळे हा गुन्हा खंडाळा पोलिसांनी अधिक तपासासाठी वाकड पोलिसांकडे वर्ग केला. त्यानंतर अवघ्या १२ तासांच्या आत खुनाचा गुन्हा उघडकीस आणून एकास अटक केली
दरम्यान, खंबाटकी घाटात अज्ञात महिलेचा मृतदेह दिसून येत असल्याबाबत एका प्रवाशाने पोलीस कंट्रोलला ११२ नंबरला कॉल करून सांगितले. त्यानंतर खंडाळा पोलिसांनी खंबाटकी घाटात धाव घेत पोलीस कर्मचारी व खंडाळा तालुका रेस्क्यू टीमच्या साह्याने मृतदेह दरीतून वर काढण्यात आला. त्यानंतर जिल्हा पोलीसप्रमुख समीर शेख, अप्पर पोलिस अधीक्षक वैशाली कडूकर यांच्या आदेशान्वये पोलीस उपअधीक्षक राहुल धस, स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक अरुण देवकर, खंडाळा पोलीस निरीक्षक सुनील शेळके, सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष म्हस्के, पोलीस हवालदार संजय जाधव, संजय पोळ, शरद तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस अंमलदार नितीन महांगरे, अमित चव्हाण यांनी दूरदृष्टी दाखवत मिसींग व्यक्तींबद्दल ऑनलाईन तपासणी केली असता मिळतेजुळते वर्णनाची महिला वाकड येथून बेपत्ता असल्याबाबत माहिती मिळाली.
जयश्रीचे वर्णन असलेल्या महिलेचा मृतदेह मिळाल्याची माहिती वाकड पोलिसांना दिली असता खंडाळा पोलीस व पिंपरी-चिंचवड पोलिसांनी वेगाने तपासाची चक्रे फिरवली असता यामागे दिनेश ठोंबरेच असल्याचं पोलीसी खाक्या दाखविल्यानंतर समोर आले. बनाव करण्यासाठी दिनेश याने जयश्रीच्या तीन वर्षीय मुलाला आळंदीत बेवारस सोडून दिल्याचे निदर्शनास आले. याबाबतची पोलिसांनी सोशल मीडियावर पोस्टदेखील व्हायरल केली होती. ज्यानंतर लहान मुलगा आळंदी पोलिसांना मिळून आला होता. खंडाळा पोलिसांचे सहकार्याने वाकड पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण करून अवघ्या १२ तासांत गुन्हा उघडकीस आणून दिनेश याला अटक केली.