टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारताच्या पुरुष हॉकी संघाने कांस्यपदक मिळवून नवा इतिहास नोंदविला होता. अनुभवी गोलरक्षक पीआर श्रीजेश आशियाई चॅम्पियन्स करंडक स्पर्धेसाठी उपलब्ध राहू शकणार नसल्याने हॉकी इंडियाने मनप्रीत सिंगकडे नेतृत्व सोपविले आहे.
भुवनेश्वर : पुढील महिन्यात ढाका येथे होणाऱ्या हिरो पुरस्कृत आशियाई चॅम्पियन्स करंडक हॉकी स्पर्धेसाठी भारतीय हॉकी संघाचे नेतृत्व मनप्रीत सिंगकडे सोपविण्यात आले आहे. शुक्रवारी या स्पर्धेसाठी 20 जणांचा भारतीय हॉकी संघ निवडण्यात आला.
टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारताच्या पुरुष हॉकी संघाने कांस्यपदक मिळवून नवा इतिहास नोंदविला होता. अनुभवी गोलरक्षक पीआर श्रीजेश आशियाई चॅम्पियन्स करंडक स्पर्धेसाठी उपलब्ध राहू शकणार नसल्याने हॉकी इंडियाने मनप्रीत सिंगकडे नेतृत्व सोपविले आहे. या स्पर्धेसाठी हरमनप्रीत सिंग उपकर्णधार राहील. ही स्पर्धा 14 ते 22 डिसेंबर दरम्यान खेळविली जाणार आहे.
टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेनंतर भारतीय हॉकी संघाची विदेशातील ही पहिली स्पर्धा आहे. हॉकी इंडियाच्या निवड समितीने अनुभवी गोलरक्षक श्रीजेशला विश्रांती देण्याचा निर्णय घेतला. गोलरक्षणाची जबाबदारी आता कृष्णन बहाद्दूर पाठक आणि सूरज करकेरा यांच्याकडे सोपविली जाईल.
भारताच्या बचावफळीमध्ये हरमनप्रीत सिंग, गुरजिंदर सिंग, जारमनप्रीत सिंग, निलम संजीप झेस, दीपसेन तिर्की, वरुणकुमार आणि मनदीप मोर यांचा समावेश आहे. मध्यफळीची जबाबदारी कर्णधार मनप्रीत सिंग, हार्दिक सिंग, जेस करन सिंग, सुमीत, राजकुमार पाल, समशेरसिंग आणि अनुभवी आकाशदीप सिंग यांच्यावर राहील.
ललितकुमार उपाध्याय, दिलप्रीतसिंग, गुरुसाहिबजित सिंग आणि शिलानंद लाक्रा हे आघाडी फळी सांभाळतील. या स्पर्धेतील भारताचा सलामीचा सामना 14 डिसेंबरला कोरियाविरुद्ध होणार आहे. मस्कतमध्ये यापूर्वी झालेल्या आशियाई चॅम्पियन्स करंडक स्पर्धेत भारताने पाकसमवेत संयुक्त विजेतेपद पटकाविले होते. पावसामुळे अंतिम सामना वाया गेल्याने या दोन्ही संघांना संयुक्त विजेते म्हणून घोषित करण्यात आले होते.