sports

कोहलीची कर्णधारपदावरून हकालपट्टी!


Kohli fired from captaincy
गेल्या 48 तासांत भारतीय टेलिव्हिजनवरील मालिकांमध्ये जसे नाट्य रंगते, तसेच नाट्य भारतीय क्रिकेटमध्येही कर्णधारपदावरून रंगले. बीसीसीआयचे उच्च पदस्थ पदाधिकारी आणि निवड समितीचे अध्यक्ष चेतन शर्मा यांनी विराट कोहलीला एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदावरून पायउतार होण्यास सांगितले. मात्र, कोहलीने त्याबाबत कोणतेही प्रत्युत्तर न दिल्यामुळे त्याची कर्णधारपदावरून उचलबांगडी करण्यात आली, अशी चर्चा आहे.

नवी दिल्ली : गेल्या 48 तासांत भारतीय टेलिव्हिजनवरील मालिकांमध्ये जसे नाट्य रंगते, तसेच नाट्य भारतीय क्रिकेटमध्येही कर्णधारपदावरून रंगले. बीसीसीआयचे उच्च पदस्थ पदाधिकारी आणि निवड समितीचे अध्यक्ष चेतन शर्मा यांनी विराट कोहलीला एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदावरून पायउतार होण्यास सांगितले. मात्र, कोहलीने त्याबाबत कोणतेही प्रत्युत्तर न दिल्यामुळे त्याची कर्णधारपदावरून उचलबांगडी करण्यात आली, अशी चर्चा आहे.
सप्टेंबर महिन्यात कोहलीने ‘टी-20’ कर्णधारपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्याला वनडे कर्णधारपदी कायम ठेवण्याची बीसीसीआयची इच्छा नव्हती. दक्षिण आफ्रिका दौऱ्याआधी रोहित शर्माकडे वनडे कर्णधारपद सोपवावे, असे बीसीसीआयचे ठाम मत होते. टी-20 आणि वनडे या मर्यादित षट्‌कांच्या क्रिकेटसाठी दोन वेगवेगळे कर्णधार असावेत, अशी बीसीसीआयची इच्छा नव्हती. नेतृत्व आणि विचारप्रक्रिया सुलभ व्हावी, यासाठी एकच कर्णधार असावा, यावर बीसीसीआय ठाम होते. वनडे आणि ‘टी-20’ वर्ल्डकपमध्ये भारतीय संघ अपयशी ठरल्यामुळे नेतृत्वगुणांवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले जात होते. रोहित शर्माच्या नेतृत्वगुणांवर निवड समिती फिदा असल्यामुळे भारताला आयसीसीच्या प्रतिष्ठेच्या स्पर्धांमध्ये यश मिळेल, अशी खात्री त्यांना आहे. भारतीय क्रिकेटच्या भल्यासाठीच रोहितची ‘टी-20’ आणि वनडे संघाच्या कर्णधारपदी निवड करण्यात आली, असे बीसीसीआयच्या पदाधिकाऱ्याने सांगितले.दोन दिवस कोहलीच्या उत्तराची प्रतीक्षा
कोहलीला कर्णधारपदावरून पायउतार होण्यास सांगण्यात आल्यानंतर बीसीसीआयचे पदाधिकारी आणि निवड समितीचे अध्यक्ष चेतन शर्मा यांनी 48 तास कोहलीच्या उत्तराची वाट पाहिली; पण कोहलीकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने बुधवारी संध्याकाळी कसोटीसाठी भारताचा संघ जाहीर केला. त्यात रोहित शर्मा याची वनडे कर्णधारपदी निवड करण्यात आली आहे, हे एकच वाक्य समाविष्ट करण्यात आले होते.
कोहलीच्या भूमिकेवर बीसीसीआय नाराज
कोहलीच्या वागणुकीवर बीसीसीआय नाराज झाल्यामुळेच त्याच्यावर राग काढण्यात आला, हे स्पष्ट आहे. कसोटी संघ जाहीर करताना वनडे कर्णधाराची घोषणा करणे योग्य नव्हते. मात्र, कोहलीचे कर्णधारपदाचे प्रकरण आणि बीसीसीआय यांच्यात आलबेल नसल्यामुळेच हा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर कोहलीने समाजमाध्यमांवरून आपली भूमिका स्पष्ट केली नाही. अथवा, नव्या कर्णधाराला साध्या शुभेच्छाही दिल्या नाहीत. बीसीसीआयच्या या निर्णयामुळे कोहलीला मोठा धक्का बसला असणार, हे निश्‍चित. त्यामुळे आता दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील तीन वनडे सामन्यांसाठी कोहली अनुपलब्ध असण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
कोहलीचा कर्णधारपद सोडण्यास नकार
वनडे कर्णधारपदाचा निर्णय घेण्याआधी बीसीसीआयने कोहली आणि मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्याशी चर्चा केली होती. बीसीसीआय आणि निवड समितीची विचारप्रक्रिया कोहलीला समजावून सांगण्यात आली होती. दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी कोहलीला कसोटीवर लक्ष केंद्रित करण्यास तसेच वनडे कर्णधारपद सोडण्यास सांगण्यात आले होते. मात्र, कोहलीने तसे करण्यास नकार दिल्यामुळे बीसीसीआयला त्याची कर्णधारपदावरून उचलबांगडी करावी लागली.
कोहलीची गुणवत्ता, नेतृत्वाची संघाला गरज - रोहित शर्मा
विराट कोहलीसारख्या दर्जेदार फलंदाजातील गुणवत्ता आणि त्याचे नेतृत्व कौशल्य याची संघाला नितांत आवश्‍यकता असल्याचे मत वनडे कर्णधारपदी नियुक्त करण्यात आलेल्या रोहित शर्माने व्यक्त केले. तो म्हणाला, “कर्णधाराचे काम हे मैदानावर फक्त 20 टक्केच असते. त्याआधी त्याला संघबांधणीसाठी कष्ट घ्यावे लागतात. कोहलीची फलंदाज म्हणून असलेली गुणवत्ता, त्याचा अनुभव तसेच कठीण प्रसंगी संघाला तारून नेण्याची क्षमता याची संघाला गरज आहे. प्रत्येक सामन्यात अव्वल खेळाडूंना संधी मिळावी तसेच उत्तम रणनीती आखण्याची गरज असते. कर्णधार म्हणून सर्व आघाड्यांवर पुढे राहून कामगिरी साकारावी लागते.” लोकेश राहुलकडे वन-डेचेही उपकर्णधारपदटी-20नंतर आता वनडे संघाच्या कर्णधारपदी रोहित शर्माला बढती देण्यात आल्यानंतर दोन्ही संघाच्या उपकर्णधारपदी लोकेश राहुल याची निवड होण्याची शक्यता आहे.
न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेसाठी राहुल उपकर्णधारपदाच्या भूमिकेत होता. आता त्याची कायमस्वरूपी उपकर्णधारपदी निवड होण्याची घोषणा पुढील महिन्यात केली जाणार आहे. “मर्यादित षट्‌कांच्या क्रिकेटसाठी लोकेश राहुलच्या नावालाच आमची पसंती आहे. गेली अनेक वर्षे तो चांगली कामगिरी करत आहे. त्याच्यात अद्याप सहा-सात वर्षे क्रिकेट शिल्लक आहे. भविष्यातील कर्णधार म्हणून त्याच्याकडे पाहिले जात असल्याने राहुलकडे उपकर्णधारपद सोपवण्यात येईल. विराट, रोहित तसेच राहुल द्रविड यांच्याकडून त्याला खूप काही शिकायला मिळणार आहे,” असे बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने सांगितले. यष्टिरक्षक-फलंदाज ऋषभ पंत याची उपकर्णधारपदी नेमणूक करण्यात यावी, असे निवड समिती आणि बीसीसीआयमधील काही जणांचे म्हणणे होते. तसेच पंतने दिल्ली कॅपिटल्सच्या नेतृत्वाची धुराही सांभाळली आहे. मात्र, लोकेश राहुल सध्या तुफान फॉर्मात असल्याने मर्यादित षट्‌कांच्या क्रिकेटमधून त्याला डावलता येणार नाही. राहुलचे कोहली आणि रोहितशी चांगले संबंध असल्यामुळेच त्याच्यावर उपकर्णधारपदाची जबाबदारी टाकण्यात आली.