वरिष्ठ राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत शिवराज राक्षेने पटाकावले सुवर्णपदक
दहा कास्यपदकाची कमाई करीत घवघवीत यश
वरिष्ठ राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्रच्या शिवराज राक्षेने उत्तर भारतीय मल्लांचे तगडे आव्हान मोडून काढीत खुल्या गटात सुवर्णपदक मिळवले. फ्रीस्टाईल प्रकारात पुरुष व महिला मल्लानी दोन रौप्य आणि सात कास्य ग्रीकोरोमनमध्ये देखील तीन कास्यपदकासह महाराष्ट्राच्या संघाने दहा कास्यपदकाची कमाई करीत घवघवीत यश प्राप्त केले.
पुणे : वरिष्ठ राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्रच्या शिवराज राक्षेने उत्तर भारतीय मल्लांचे तगडे आव्हान मोडून काढीत खुल्या गटात सुवर्णपदक मिळवले. फ्रीस्टाईल प्रकारात पुरुष व महिला मल्लानी दोन रौप्य आणि सात कास्य ग्रीकोरोमनमध्ये देखील तीन कास्यपदकासह महाराष्ट्राच्या संघाने दहा कास्यपदकाची कमाई करीत घवघवीत यश प्राप्त केले.
सातारा येथे झालेल्या राज्यस्तरीय अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक मिळवलेल्या, महाराष्ट्रातील मल्लानी वरीष्ठ राष्ट्रीय स्पर्धेत पदकांची लयलूट करीत उत्तर प्रदेश (गोंडा) येथे झालेल्या स्पर्धेत मल्लांना चांगलीच झुंज दिली. खुल्या गटात अर्जुनवीर काकासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल पुणे येथे सराव करीत असलेल्या, शिवराजने खुल्या गटात हरियानाच्या मोहित कुमारला अंतिम फेरीत तीन विरुद्ध एक गुणांनी नमवून सुवर्णपदक पटाकावले. शिवराजने अंतिम फेरीपर्यंतच्या सर्वच लढतीत प्रतिस्पर्धी मल्लांचा तांत्रिक गुणावर फडशा पाडत एकतर्फी विजय मिळवाला. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या तोंडावर शिवराजने मिळवलेल्या पदकाला अन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे.
वरीष्ठ कुस्ती स्पर्धेत खुल्या गटात तब्बल 50 वर्षानंतर सुवर्णपदक मिळाल्याची चर्चा कुस्तीशौकिनांच्यात सुरू आहे. 97 किलो गटात महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर याला अंतिम फेरीत हरियानाच्या सत्यव्रत कडून पराभव पत्करावा लागल्याने, त्याला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. 92 किलो गटात कुस्तीपंढरीचा आंतरराष्ट्रीय मल्ल पृथ्वीराज पाटील याला कास्यपदकावरच समाधान मानावे लागले. 86 किलो गटात सोलापूरचा वेताळ शेळके याला कास्यपदकावर समाधान मानावे लागले.
74 किलो गटात डीवायएसपी नरसिंग यादवने कास्यपदक मिळवले. 57 किलोत आबा अटकळे याने कास्यपदक मिळवून महाराष्ट्राच्या खात्यात आणखी एका पदकाची भर घातली. ग्रीकोरोमनमध्ये मुंबईतील गोकुळ यादव 77 किलो, कोल्हापूरच्या विक्रम कुर्हाडे (नंदगाव) 60 किलो आणि प्रितम खोत 67 किलो यांनी देखील कास्यपदकावर मोहोर उटवून कुस्ती पंढरीचा झेंडा फडकावला. 62 किलोत कोल्हापूरच्या स्रुष्टी भोसलेने कास्यपदकाची कमाई करून कुस्तीपंढरीला आणखी एक पदक मिळवून दिले.
अहमदनगरची आंतरराष्ट्रीय मल्ल भाग्यश्री फंड 59 किलो आणि सोनाली मंडलिक 57 किलो यांनी कास्यपदकाची कमाई केली. यशस्वी मल्लाचे कुस्ती मार्गदर्शक, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे पदाधिकारी आणि कुस्ती शौकिन यांनी अभिनंदन केले आहे.