sports

शेन वॉर्नचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन


Shane Warne dies of heart attack
फिरकीचा जादूगार आणि ऑस्ट्रेलियाचा महान फिरकी गोलंदाज शेन वॉर्नचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. आपल्या फिरकीच्या तालावर दिग्गज फलंदाजांना नाचवणाऱ्या शेन वॉर्नने अखेर या जगाचा ५२व्या वर्षी निरोप घेतला.

कोह सामुई : फिरकीचा जादूगार आणि ऑस्ट्रेलियाचा महान फिरकी गोलंदाज शेन वॉर्नचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. आपल्या फिरकीच्या तालावर दिग्गज फलंदाजांना नाचवणाऱ्या शेन वॉर्नने अखेर या जगाचा ५२व्या वर्षी निरोप घेतला. वॉर्न हा थायलंड येथील कोह सामुई येथे असताना त्याचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याची माहिती त्याच्या मॅनेजमेंट करणाऱ्या संस्थेने दिली आहे. त्यानंतर याबाबतचे पहिले वृत्त फॉक्स क्रिकेटने दिले आहे.
वॉर्नने आपल्या फिरकीच्या जोरावर क्रिकेट विश्व गाजवले होते. क्रिकेटच्या इतिहासातील शतकातील सर्वोत्तम चेंडू टाकण्याचा मानही वॉर्नला मिळाला होते. वॉर्नने इंग्लंडचा महान फलंदाज माइक गेटिंगला ज्यापद्धतीने बाद केले होते, ते पाहिल्यावर बऱ्याच जणांना विश्वास बसला नव्हता. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी सामन्यात हा जादुई चेंडू वॉर्नने टाकला होता. त्यानंतर इंग्लंडचा माजी कर्णधार अँड्र्यू स्ट्रॉसलादेखील वॉर्नने तसेच बाद केले होते. पण आशिया खंडात, खासकरून भारतामध्ये वॉर्नची जादू भारतामध्ये जास्त दिसली नाही. शेन वॉर्न आणि सचिन तेंडुलकर यांच्यातील मैदानात चांगलेच युद्ध रंगलेले पाहायला मिळायचे आणि यामध्ये सचिननेच जास्तवेळा बाजी मारल्याचे पाहायला मिळाले. वॉर्नकडे नेतृत्व करण्याची चांगली क्षमता होती आणि ते त्याने आयपीएलमध्येही दाखवून दिले. पहिल्याच आयपीएलमध्ये आपल्या नेतृत्वाखाली वॉर्नने राजस्थान रॉयल्सला जेतेपद पटकावून दिले होते. एक कर्णधार आणि मार्गदर्शक कसा असावा, याचा उत्तम वस्तुपाठ वॉर्नने यावेळी दाखवला होता. वॉर्नने क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यावरही तो राजस्थानच्या संघाशी संलग्न होता.
वॉर्नचे मैदानाबाहेरची किस्से चांगलेच रंगल्याचे पाहायला मिळाले होते. बऱ्याच ललनांबरोबरचे त्याचे संबंध असल्याचेही म्हटले गेले, पण त्याने कसलीही तमा बाळगली नाही. मैदानाबाहेरच्या वॉर्नच्या बऱ्याच गोष्टी प्रकाशझोतात आल्या, पण त्यामुळे त्याची कुप्रसिद्धी कधीही झाली नाही. कारण वॉर्नने क्रिकेटच्या मैदानात बरेच नाव कमावले होते. दक्षिण आफ्रिकेत २००३साली झालेल्या विश्वचषकातून वॉर्नला वगळण्याची पाळी ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट मंडळावर त्यावेळी आली होती. पण त्यानंतरही वॉर्न हा मैदानात आपली चुणूक दाखवतच राहीला होता.