PAN 2.0 Project : मोठी बातमी! सरकारने आणलं QR कोडवालं पॅनकार्ड, जुनं पॅनकार्ड रद्दीत जाणार, पॅन 2.0 प्रोजेक्ट आहे तरी काय?
PAN 2.0 Project : सध्या देशात सुमारे 78 कोटी पॅनकार्ड जारी करण्यात आले आहेत. त्यापैकी 98 टक्के पॅन वैयक्तिक स्तरावर जारी करण्यात आले आहेत.
PAN 2.0 Project: केंद्रीय मंत्रिमंडळाच्या (Union Cabinet) बैठकीत 1,435 कोटी रुपयांच्या पॅन 2.0 प्रोजेक्टला (PAN 2.0 Project) मान्यता देण्यात आली आहे. सरकारी संस्थांच्या सर्व डिजिटल प्रणालींसाठी परमनंट अकाउंट नंबर (PAN) हा 'कॉमन बिजनेस आइडेंटिफायर' बनवणं हा या प्रोजेक्टमागील प्रमुख हेतू असल्याचं सरकारच्या वतीनं सांगण्यात आलं आहे. पॅन 2.0 प्रोजेक्ट अंतर्गत, पॅन कार्ड QR कोडसह विनामूल्य अपग्रेड केलं जाईल.
केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी यासंदर्भात सांगितलं की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहारावरील कॅबिनेट समितीनं (CCEA) आयकर विभागाच्या पॅन 2.0 प्रोजेक्टला मंजुरी दिली आहे. PAN 2.0 प्रकल्पावर 1435 कोटी रुपये खर्च केले जातील.
PAN/TAN 1.0 इकोसिस्टमचं एडवांस रुप
पॅन 2.0 प्रोजेक्टचं मुख्य उद्दिष्ट उत्तम गुणवत्तेसह पोहोचण्यास सुलभ आणि जलद सेवा देणं हे आहे. हा प्रकल्प करदात्यांच्या चांगल्या डिजिटल अनुभवासाठी PAN/TAN सर्विसची टेक्नोलॉजी-ड्रिवेन ट्रांसफॉर्मेशन मार्फत टॅक्सपेयर्स रजिस्ट्रेशन सर्विसची पुनर्रचना करण्यासाठी एक ई-गव्हर्नन्स प्रकल्प आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हे सध्या असलेल्या PAN/TAN 1.0 इकोसिस्टमचे प्रगत स्वरूप असेल.
देशात अंदाजे 78 कोटी पॅन कार्ड जारी
सध्या देशात सुमारे 78 कोटी पॅनकार्ड जारी करण्यात आले आहेत. त्यापैकी 98 टक्के पॅन वैयक्तिक स्तरावर जारी करण्यात आले आहेत.
पॅन 2.0 प्रोजेक्टचा फायदा काय?
सरकारनं दिलेल्या माहितीनुसार, पॅन 2.0 प्रोजेक्टमुळे केवळ करदात्यांनाच फायदा होणार नाही. मात्र, आयकर विभागाच्या कामकाजातही गती आणि पारदर्शकता येणार आहे. हा प्रकल्प डेटाची सुरक्षा आणि गोपनीयता देखील सुनिश्चित करेल. देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी हा प्रकल्प उपयुक्त ठरेल, अशी सरकारला आशा आहे. हा प्रकल्प टप्प्याटप्प्यानं पूर्ण करण्यात येणार आहे. या अंतर्गत नवीन सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर इन्फ्रास्ट्रक्चर उभारण्यात येईल. तसंच प्राप्तिकर विभागातील कर्मचाऱ्यांनाही नवीन प्रणाली वापरण्याचं प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
नवं पॅनकार्ड मिळाल्यानंतर जुन्या पॅनकार्डचं काय होणार?
सरकारच्या पॅन 2.0 प्रोजेक्ट अंतर्गत आता नवं बारकोड असलेलं पॅनकार्ड मिळणार आहे. त्यामुळे आता अनेकांना प्रश्न पडला आहे की, नव्या पॅनकार्डचं काय होणार? नवं पॅनकार्ड आलं तरी तुमचा पॅन नंबर बदललं नाही, असं अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं. तसेच, तुम्हाला अपग्रेडेड प्रक्रियेतून जावं लागेल. त्यानंतर तुम्हाला नवं पॅन कार्ड मिळेल. अपडेटेड पॅन कार्ड नव्या फिचर्ससह येणार आहे. यामध्ये QR कोड समाविष्ट असेल. अपग्रेडेट पॅन कार्ड विनामूल्य असणार आहे. ते नवं कार्ड तुम्हाला थेट देण्यात येणार आहे. सध्याच्या डिजिटल पद्धतीनं पॅन कार्ड अपग्रेड करणं खूप सोपं होणार आहे. अपडेटची प्रक्रिया पेपरलेस आणि ऑनलाईन असेल, असंही अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं.