विश्वविजेत्या गुकेशसाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय; 4.67 कोटींचा कर माफ, आता मिळणार तब्बल इतके कोटी रुपये!
विश्वनाथ आनंद नंतर भारताला बुद्धीबळात दुसरा वर्ल्ड चॅम्पियन मिळाला तो म्हणजे डी गुकेश.
विश्वनाथ आनंद नंतर भारताला बुद्धीबळात दुसरा वर्ल्ड चॅम्पियन मिळाला तो म्हणजे डी गुकेश. त्याने बुद्धीबळाच्या इतिहासात सर्वात कमी वयाचा विश्वविजेता बनून इतिहास रचला आहे. डी गुकेशने चीनच्या डिंग लिरेनला 14 व्या फेरीत हरवलं. डी गुकेशला विश्वविजेता बनताच कोट्यवधी रुपये प्राइज मनी म्हणून मिळाले. त्याला 1.3 दशलक्ष डॉलर्स म्हणजे सुमारे 11 कोटी रुपये बक्षीस रक्कम मिळाली. मात्र, त्यानंतर त्याला सुमारे 4.67 कोटी रुपयांचा कर भरावा लागणार होता. मात्र त्यांच्या या ऐतिहासिक विजयाचा मान राखत भारत सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.
सरकारने करमाफी का केली?
सिंगापूरच्या नियमांनुसार तिथल्या सरकारला बक्षिसाच्या रकमेवर गुकेशला एक रुपयाही द्यायचा नव्हता. त्याने बक्षिसाची संपूर्ण रक्कम घरी आणली. परंतु भारतातील कर नियमांनुसार, त्याची नेटवर्थ इंडिविजुअल असलेल्या व्यक्ती म्हणून केली जाते. त्यामुळे त्याला 30 टक्के कर आणि अधिभारासह भारत सरकारला अंदाजे 4.67 कोटी रुपये द्यावे लागणार होते. यामुळे त्याच्या खिशात फक्त 6.33 कोटी रुपये शिल्लक राहिले असते. मात्र गुकेशला कर भरण्यापासून आता सूट देण्यात आली आहे.
खरंतर, Philox या वेबसाइटने दावा केला आहे की, त्यांनी गुकेशला त्याच्या बक्षीस रकमेवर करातून सूट देण्याचे भारत सरकारकडे अपील केली होती. अर्थ मंत्रालयाने त्यांची मागणी मान्य केली आहे आणि गुकेशच्या ऐतिहासिक विजयाचे कौतुक करत त्यांच्या सन्मानार्थ त्यांना बक्षीस म्हणून मिळालेल्या रकमेवरील करातून सूट दिली आहे. जेणेकरून भारतीय तरुणांना पुढे जाण्याची हिंमत मिळेल. वृत्तानुसार, लवकरच या निर्णयाची अधिकृत घोषणा केली जाईल. तमिळनाडूच्या खासदार आर सुधा यांनीही गुकेशला करमुक्त करण्यासाठी पंतप्रधान मोदींना पत्र लिहिले होते.
मुख्यमंत्र्यांनीही केली 5 कोटींची घोषणा
गुकेश हा चेन्नईचा रहिवासी आहे. त्याच्या या कामगिरीने संपूर्ण देशाला अभिमान वाटला आहे. त्याच्या राज्य तामिळनाडूमध्ये या विजयाचा मोठा जल्लोष करण्यात आला. तामिळनाडूला भारताची बुद्धिबळ फॅक्टरी म्हटले जाणे ही अभिमानाची बाब होती. त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी त्याच्यासाठी 5 कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले. रिपोर्टनुसार, गुकेशला यावरही कर भरावा लागत होता, पण आता त्याला यातूनही दिलासा मिळाला आहे. तथापि, आम्ही याची पुष्टी करू शकत नाही. अधिकृत घोषणेनंतरच या बक्षीस रकमेवर सवलत स्पष्ट होईल.