एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रिपदावरील आपला दावा सोडल्यानंतर भारतीय जनता पार्टीने या निर्णयाचा स्वागत केलं आहे. असं असतानाच आता ठाकरेंच्या शिवसेनेनं काय म्हटलंय जाणून घ्या...
विधानसभेच्या निकालाला चार दिवसांहून अधिक काळ उलटून गेल्यानंतरही राज्याचे मुख्यमंत्री कोण असणार यासंदर्भातील संभ्रम काय आहे. बुधवारी काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रिपदावरील दावा सोडला आहे. विशेष म्हणजे हा दावा सोडताना पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाहांचा उल्लेख करत दिल्लीतील ज्येष्ठ भाजपा नेते जो निर्णय घेतील, जो मुख्यमंत्री ठरवतील तो आम्हाला मान्य आहे असं शिंदे म्हणाले. शिंदेंच्या या निर्णयामुळे भाजपाचा मुख्यमंत्री निवडण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं नाव सध्या संभाव्य मुख्यमंत्र्यांच्या यादीमध्ये आघाडीवर आहे. असं असलं तरी यासंदर्भात ही बातमी लिहीपर्यंत कोणताही निर्णय झालेला नसतानाच उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी 'फडणवीस मुख्यमंत्री झाले तर?' या प्रश्नाला सूचक शब्दांमध्ये उत्तर दिलं आहे.
फडणवीस मुख्यमंत्री झाले तर? वर राऊतांचं सूचक विधान
'फडणवीस मुख्यमंत्री झाले तर? या प्रश्नाला उत्तर देताना राऊतांनी मुख्यमंत्री हा राज्याचा असतो त्यामुळे त्यांचं आम्ही स्वागतच करु असं म्हटलं. मात्र हे विधान करतानाच त्यांनी भाजपावर निशाणा साधला. "महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे स्वागत आहे. ते राज्याचे मुख्यमंत्री असतात. मुख्यमंत्री, प्रधानमंत्री हा एका पक्षाचा नसतो तो राज्याचा, देशाचा असतो. पण भारतीय जनता पक्ष सत्तेवर आल्यापासून मुख्यमंत्रिपद, प्रधानमंत्रिपद एका पक्षाचं झालेलं असतं. त्यामुळे वादाचा विषय असतो. तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री आहात. देशाचे पंतप्रधान आहात. एका गटाचे किंवा पक्षाचे नाही. फडणवीसांनी मुख्यमंत्री म्हणून राज्याचा, सगळ्यांचा विचार केला तर नक्कीच आम्ही त्याच्यांकडे काळजीपूर्वक पाहू," असं राऊत यांनी म्हटलं आहे.
पदावरील दावा सोडताना शिंदे काय म्हणाले?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बुधवारी ठाण्यातील निवासस्थानी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये मुख्यमंत्रिपदावरील आपला दावा सोडल्याचं सूचत केलं. यावेळेस शिंदेंनी आपलं पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांशी बोलणं झाल्याचं सांगितलं. "मी काल पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन केला होता. सरकार बनवताना, निर्णय घेताना माझ्यामुळे अडचण होईल असं मनात आणू नका. तुम्ही आम्हाला मदत केली. अडीच वर्षं तुम्ही राज्याचा विकास करण्याची, उद्योगधंदे आणण्याची संधी दिली आहे. तुम्ही निर्णय घ्या. तुमचा निर्णय महायुती, एनडीएचे प्रमुख म्हणून जसा भाजपासाठी अंतिम असतो तसा आम्हालाही अंतिम आहे. तुम्ही निर्णय घेताना एकनाथ शिंदेंची अडचण आहे असं मनात आणू नका, मी अमित शाह यांनाही फोन करुन भावना सांगितल्या. जो काही निर्णय असेल तो मान्य असेल," असं शिंदेंनी सांगितलं. शिंदेंच्या या निर्णयाचं भाजपाकडून स्वागत करण्यात आलं आहे