maharashtra

लाडकी बहिन योजना : गुड न्यूज, लाडक्या बहिणींना आजपासून पैसे मिळण्यास सुरुवात, डिसेंबरच्या हप्त्यासाठी 3500 कोटी वर्ग, 1500 की 2100 रुपये मिळणार?


Ladki Bahin Yojana : Good News, Ladki Bahin Yojana will start receiving money from today, Rs 3500 crore for December installment, Rs 1500 or Rs 2100?
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन योजना :मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता या वर्षीच मिळणार आहे.

मुख्यंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता कधी मिळणार याकडे सर्व महिलांचं लक्ष लागलं होतं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथे विधानसभेत अधिवेशन संपल्यानंतर लाडक्या बहिणींच्या खात्यात रक्कम वर्ग केली जाईल, असं म्हटलं होतं. त्यानुसार या वर्षीच लाडक्या बहिणींना डिसेंबर महिन्याचा हप्ता मिळणार आहे. हप्ता देण्याची प्रक्रिया आजपासून सुरु करण्यात येणार आहे. लाडक्या बहिणींना 1500 रुपयांप्रमाणं सहावा हप्ता मिळणार आहे. 

डिसेंबरच्या हप्त्यासाठी  3500 कोटी रुपयांची तरतूद

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पाच हप्त्यांची रक्कम पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात वर्ग करण्यात आली होती. जुलै ते नोव्हेंबर पर्यंत 1500 रुपयांप्रमाणं  7500 रुपये महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले होते. निवडणुकीपूर्वीच महिलांच्या खात्यात नोव्हेंबर महिन्याची रक्कम आली होती. आता डिसेंबरच्या हप्त्याची रक्कम आजपासून महिलांच्या खात्यात येणार आहे.  

लाडक्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता या महिना अखेर मिळणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विधानसभेतील घोषणेप्रमाणं अधिवेशन संपल्यानंतर 1500 रुपयांची रक्कम मिळणार आहे. डिसेंबरचा हप्ता लाडक्या  बहिणींना देण्याची प्रक्रिया आजपासून सुरू होणार आहे. एका महिन्याचा हप्ता देण्यासाठी लागणारी रक्कम लाडक्या बहिणींना वर्ग करण्यात आला आहे. 

किती महिलांना मिळणार लाभ?

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता दोन टप्प्यात दिला जाणार आहे. पहिल्या टप्प्यात 2 कोटी 35 लाख महिलांना पंधराशे रुपये प्रमाणे डिसेंबरचा हप्ता मिळणार आहे. विधानसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वी अखेरच्या टप्प्यात महिला व बाल कल्याण विभागाकडे 25 लाख महिलांचे अर्ज आले होते. त्या अर्जांची स्क्रुटिनी राहिली असल्यानं ती  पूर्ण करुन या महिलांना देखील डिसेंबरचा हप्ता दुसऱ्या टप्प्यात दिला जाईल.   

लाडक्या बहिणींना 2100 रुपयांसाठी वाट पाहावी लागणार

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केल्यानंतर महायुतीनं मोठी घोषणा केली होती. विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या काळात महायुतीकडून लाडकी बहीण योजनेची रक्कम 1500 रुपयांवरुन 2100 रुपये करण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार 2100 रुपये कधीपासून मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. मात्र, डिसेंबरचा हप्ता 1500 रुपयांप्रमाणं मिळणार आहे. दुसरीकडे, देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपद स्वीकारल्यानंतर अर्थसंकल्पात याबाबत निर्णय घेतला जाईल, असं म्हटलं होतं. त्यानुसार अर्थसंकल्प सादर झाल्यानंतरचं महिलांना 2100 रुपयांचा हप्ता मिळू शकेल, अशी स्थिती आहे.