maharashtra

पहिल्याच दिवशी विठुरायाच्या ऑनलाइन पूजा बुकिंग हाऊसफुल्ल; मंदिर प्रशासनाला तीन महिन्यात दीड कोटीपेक्षा जास्त उत्पन्न


Vithuraya online pooja booking housefull on first day; More than one and a half crore income to the temple administration in three months
भाविकांना घरबसल्या विठ्ठल रुक्मिणीच्या विविध पूजा बुकिंग करता याव्यात यासाठी सुरू करण्यात आलेली ऑनलाईन बुकिंग काल (26 डिसेंबर ) पहिल्याच दिवशी बुक झाल्या आहेत.

Vitthal Rukmini Temple, Pandharpur : भाविकांना घरबसल्या विठ्ठल रुक्मिणीच्या विविध पूजा बुकिंग करता याव्यात यासाठी मंदिर समितीने काल (26 डिसेंबर) ऑनलाईन बुकिंगला सुरुवात केली. एक जानेवारी ते 31 मार्च या तीन महिन्यांच्या कालावधीसाठी हे बुकिंग होते. मात्र काल (26 डिसेंबर ) पहिल्याच दिवशी देवाच्या सर्व नित्य पूजा बुक झाल्याने आता भाविकांना नित्य पूजेच्या बुकिंगसाठी पुढच्या तीन महिन्याची वाट पाहावी लागणार आहे. 
     

विठ्ठलाला रोज सकाळी होणारी महापूजा अर्थात नित्य पूजेचे आकर्षण जगभरातील भाविकांना असते. यावेळी देवाला दही दुधाचे स्नानापासून पोशाखापर्यंत सर्व उपचार केले जातात. या महापूजेच्या बुकिंगसाठी काल ऑनलाईन नोंदणीला सुरुवात झाली होती. विठुरायाच्या नित्य पूजेसाठी 25000 तर रुक्मिणी मातेच्या नित्य पूजेसाठी 11000 एवढे शुल्क ठरविण्यात आले होते. मात्र बुकिंग सुरू होताच भाविकांनी पहिल्या दिवशी तीन महिन्याच्या सर्व पूजा बुक केल्याने मंदिराला नुसत्या नित्य पूजेतून 55 लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. याशिवाय पाद्यपूजा तुळशी आरक्षण पूजा यासाठीही मोठ्या संख्येने बुकिंग झालेले आहे. अजूनही पाद्यपूजा व तुळशी अडचण पूजेच्या काही पूजा शिल्लक असून भाविकांना याचे घर बसल्या बुकिंग करता येणार आहे.

मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराचे दार चांदीने मढविण्याचे काम सुरू

श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिराचे जतन व संवर्धन करण्याचे काम सुरू असून या अंतर्गत संत नामदेव पायरीवरील पितळी दरवाजा चांदीचा बनविण्याचा ठराव मंदिर समितीच्या बैठकीमध्ये करण्यात आला होता. दरम्यान नांदेड येथील अरगुलकर परिवाराच्यावतीने सदर दरवाजास चांदी बसवून देण्यात येत आहे. यासाठी तीस किलो चांदी लागणार असून याची किंमत जवळपास तीस लाख रूपये आहे. शंकर व नरसिमलू या बंधूंनी आपले वडील स्व. दिगंबर तुकाराम अरगुलकर व आई स्व. जनाबाई यांच्या स्मरणार्थ हा दरवाजा चांदीचा केला आहे. अरगुलकर परिवार श्री विठ्ठल रूक्मिणीचे निस्सीम भक्त आहेत. त्यानुसार मागील आठ दिवसापासून सदर काम सुरू आहे. यामुळे येथून भाविकांना प्रवेश बंद ठेवण्यात आला आहे. येत्या आठ दिवसात सदर काम पूर्ण झाल्यानंतर मंदिराच्या प्रवेशद्वाराला मोठी झळाळी मिळणार आहे.