150+ कावळ्यांचा रहस्यमयी मृत्यू.. मान वाकडी होते अन् झाडावरुन..; महाराष्ट्रातील 'या' शहरात भीतीचं वातावरण

150 हून अधिक कावळ्यांचा गूढ मृत्यू : महाराष्ट्रातील या शहरामध्ये मागील दोन दिवसांपासून फळ पडावीत तशापद्धतीने कावळे मरुन पडत आहेत.
लातूरमधील उदगीर शहरात मागील दोन दिवसांपासून एक फारच विचित्र प्रकार घडत आहे. उदगीर शहरांमध्ये मागील दोन दिवसांमध्ये 150 हून अधिक कावळ्यांचा रहस्यमयरित्या मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे स्थानिकांमध्ये घबराट पसरल्याचं पाहायला मिळत आहे.
या तीन ठिकाणी घडतोय हा विचित्र प्रकार
समोर आलेल्या माहितीनुसार, उदगीर शहरातील तीन ठिकाणी कावळ्यांच्या मृत्यूचे प्रकार घडला आहे. शहरातील महात्मा गांधी उद्यान, हुतात्मा स्मारक परिसर आणि शहर पोलीस ठाण्याचा आवारात मोठ्या संख्येनं कावळ्यांचे अस्तित्व आहे. मात्र मागील दोन दिवसांपासून अनेक कावळे झाडांच्या खाली मृतावस्थेत पडलेले आढळून येत आहेत. सुरुवातीला याकडे कोणी फारसं लक्ष दिलं नाही. मात्र सलग दुसऱ्या दिवशीही असेच कावळे मृतावस्थेत आढळून आल्याने अनेकांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. त्यामुळे लातूरमधील पशु वैद्यकीय विभाग आता सतर्क झाला आहे. या कावळ्यांचे मृतदेह पशु विभागाकडून गोळा करण्यात आले आहेत. जवळपास दिडशेहून अधिक कावळ्यांचा मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
मृत्यूमुखी पडण्याची पद्धतही फार विचित्र
हे कावळे मृत्यूमुखी पडण्याच्या पद्धतीमध्येही फारच विचित्र सामन्य आहे. आधी दोन्ही पायावर बसलेल्या कावळ्यांची मान अचानक वाकडी होते. सुसुत्रता गमावल्याप्रमाणे आणि तोल गेल्याने एखादी व्यक्ती झाडावरुन खाली पडते तसे हे कावळे झाडांच्या फांद्यावरुन जमिनीवर कोसळतात. अशा पध्दतीने कावळ्यांचा मृत्यू होत असल्याचे प्रकार उदगीर शहरातील तीन ते चार ठिकाणी घडले आहेत. एकंदरित या कावळ्यांच्या मृत्यूचा आकडा हा दिडशेहून किंतींच अधिक असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या विचित्र विषाणूचा संसर्ग झालेल्या 6 कावळ्यांवर उदगीरच्या पशू चिकीत्सालयात उपचार करण्यात येत आहेत.
तपासणीसाठी पाठवण्यात आले नमुने
मृत कावळ्यांच्या रक्ताचे नमुने पुणे व भोपाळ येथील पशुरोग अन्वेषण विभागाच्या प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत, अशी माहिती तहसीलदार राम बोरगावकर यांनी दिली आहे. आता या अहवालामधून काय माहिती समोर येते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.