maharashtra

सदरबझारमधील कॅनॉल बंदिस्त करणार

उदयनराजे भोसले यांची ग्वाही; एसटी स्टँड चौकात कोपरा सभेला गर्दी

सदरबझारमध्ये असलेल्या उघड्या कॅनॉलमुळे येथील जनतेला अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. हा कॅनल बंदिस्त करून या ठिकाणी अद्ययावत गार्डन केली जाणार आहे, अशी ग्वाही महायुतीचे लोकसभा उमेदवार उदयनराजे भोसले यांनी दिली.

सातारा : सदरबझारमध्ये असलेल्या उघड्या कॅनॉलमुळे येथील जनतेला अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. हा कॅनल बंदिस्त करून या ठिकाणी अद्ययावत गार्डन केली जाणार आहे, अशी ग्वाही महायुतीचे लोकसभा उमेदवार उदयनराजे भोसले यांनी दिली.
सदरबझार बस स्टॉप येथे आयोजित केलेल्या कोपरा सभेत त बोलत होते. याप्रसंगी माजी अमर साबळे, लोकसभा निवडणूक निरीक्षक प्रवीण साले, माजी नगराध्यक्ष निशांत पाटील, माजी उपनगराध्यक्ष अमोल मोहिते, अविनाश कदम, शंकर माळवदे, भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश सदस्या सुवर्णा पाटील, माजी नगरसेवक विजय नाफड, भारती सोळंकी, राजेंद्रसिंह राजपूत, रीना भणगे, वसीमभाई सय्यद, बबलू सोळंकी, सुजित जाधव, राहुल किर्दत, चेतन सोळंकी, गणेश भोसले, लतीफ भाई चौधरी, भाजपचे शहराध्यक्ष विकास गोसावी, मारुतराव गायकवाड यांची उपस्थिती होती.
उदयनराजे म्हणाले, सदरबझार परिसरातील झोपडीत राहणाऱ्या नागरिकांना पक्की घरे बांधून दिली आहेत, माजी सैनिकांची घरपट्टी माफ केली आहे, शहीद जवानांच्या स्मरणार्थ कर्नल संतोष महाडिक स्मृती उद्यान उभारण्यात आले आहे. केंद्र शासनाच्या माध्यमातून अनेक योजना राबवून सर्वसामान्यांना दिलासा देण्याचे काम केले आहे. येथील पाटबंधारेचा कालवा बंदिस्त करावा अशी मागणी वर्षांपासून आहे. हे काम वर्षभरात पूर्ण करू.
अमर साबळे म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 26 नोव्हेंबर रोजी देशाला संविधान अर्पण केले होते. हा दिवस संविधान दिन म्हणून भाजप सरकारने घोषित केला. अनेक चांगले निर्णय भारतीय जनता पक्षाच्या सरकारने घेतले आहेत. उदयनराजेंचा मागील पराभव पुसून काढण्यासाठी या निवडणुकीत त्यांना जास्तीत जास्त मतदान करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
प्रवीण साले म्हणाले, ब्रिटिश सरकारच्या काळामध्ये देशाचा राजा इंग्लंडच्या राणीच्या पोटातून जन्माला येतो असे म्हटले जायचे. स्वातंत्र्यानंतर संविधान सादर करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मताच्या पेटीतून राजा जन्माला येईल, असे भाष्य केले होते. मतदारांना राजा करण्याचे काम संविधानाने केले आहे, हे संविधान कोणीही बदलू शकत नाही.
निशांत पाटील म्हणाले, उदयनराजे भोसले यांनी कधीही जाती धर्माचा विचार केला नाही. त्यांनी सर्व जातींसाठी काम केलेले आहे. विरोधकांच्या अफवांना बळी पडून जर आपण चुकीचा निर्णय घेतला तरी ती चूक दुरुस्त करायची संधी पुन्हा मिळणार नाही.