ईपीएस 95 पेन्शनर्स संघटनेने उदयनराजे भोसले यांना लोकसभेसाठी पाठिंबा जाहीर केला आहे. त्याचबरोबर आपल्या प्रलंबित मागण्यांचे निवेदनही दिले. याबाबत नजीकच्या अधिवेशनात आपण मुद्दा उपस्थित करू असे आश्वासन उदयनराजे यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना दिले.
सातारा : ईपीएस 95 पेन्शनर्स संघटनेने उदयनराजे भोसले यांना लोकसभेसाठी पाठिंबा जाहीर केला आहे. त्याचबरोबर आपल्या प्रलंबित मागण्यांचे निवेदनही दिले. याबाबत नजीकच्या अधिवेशनात आपण मुद्दा उपस्थित करू असे आश्वासन उदयनराजे यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना दिले.
देशातील खासगी, सार्वजनिक, सहकार, सेवा क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी सेवानिवृत्तीनंतर ईपीएस 95 पेन्शनर्स संघटना स्थापन केली. या संघटनेच्या माध्यमातून त्यांच्या विविध प्रश्नांसाठी लढा उभारला. मात्र त्यावेळी सत्तेत असणाऱ्या काँग्रेस सरकारने या लढ्याची गंभीरपणे दखल घेतली नाही. परिणामी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना सर्वोच्च न्यायालयापर्यंत दाद मागावी लागली . या सर्व कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतन आणि महागाई भत्ता द्यावा असा निकाल न्यायालयाने दिला.
ईपीएस 95 प्रश्न संघटनेच्या काही प्रमुख मागण्या आहेत, त्यात पती-पत्नी दोघांना कमीत कमी 7500 पेन्शन अधिक महागाई भत्ता दरमहा मिळावा, कर्मचाऱ्यांनी सेवा काळात जमा केलेली रक्कम आणि शासनाने भरलेला रकमेचा फरक मिळावा, पती-पत्नी वैद्यकीय सेवा पेन्शन तहहयात मिळावी. जे कर्मचारी या योजनेमध्ये सहभागी नाहीत त्यांना त्यात सहभागी करून घ्यावे, अशा मागण्यांचा समावेश आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि 2014 मध्ये या योजनेअंतर्गत प्रत्येकास सरसकट 9000 रुपये दरमहा पेन्शन देण्यास सुरुवात केली होती. मात्र अद्याप प्रलंबित मागण्या पूर्ण करण्याचे निवेदन संघटनेचे अध्यक्ष भुजंगराव जाधव यांनी उदयनराजे भोसले यांना दिले. त्यावर नजीकच्या अधिवेशनात मागण्या मान्य करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन उदयनराजे भोसले यांनी दिले. यावेळी ईपीएस 95 पेन्शनर संघटनेने उदयनराजे भोसले यांना लोकसभा निवडणुकीसाठी पाठिंबा जाहीर केला.
भाजप कामगार मोर्चाची लाखभर मते उदयनराजेंच्या मागे : हरगुडे
भाजप कामगार मोर्चाची कामगार नोंदणी 20 हजाराहून अधिक आहे. मोर्चाचा उद्देश केंद्र सरकारने तसेच राज्य सरकारने दिलेल्या योजना तळागाळापर्यंत पोहोचवणे हा आहे, आणि आम्ही त्या पोचवल्या आहेत. सहाजिकच एका कामगाराचे चार जनांचे कुटुंब असा हिशोब धरला तर एक लाखावर मतदान भाजपा कामगार मोर्चाचे आहे. हे सर्व मतदान श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या पाठीशी असेल अशी ग्वाही भाजप कामगार मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष विजय हरगुडे यांनी सातारा येथे झालेल्या कामगार मेळाव्यात दिली.
याप्रसंगी सातारा मतदारसंघातील सर्व विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी उपस्थित होते.
हरगुडे पुढे म्हणाले, भाजपा कामगार मोर्चा औद्योगिक कामगार, शेतमजूर, घरेलू तसेच विविध क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध आहे. त्यांच्या अडीअडचणी आम्ही समजावून घेत आहोत. सहाजिकच 18 वर्ष वयाच्या कामगारापासून महिला व जेष्ठ कामगारांपर्यंतचे प्रश्न आम्ही मार्गी लावत आहोत. या कामी आम्हास पालकमंत्री शंभूराजे देसाई, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार महेश शिंदे, मदनदादा भोसले, अतुलबाबा भोसले, धैर्यशील कदम, विक्रमबाबा पाटणकर, मनोजदादा घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली वाटचाल सुरू आहे.
याप्रसंगी वनिता सुर्वे, नंदा चोरगे, मुमताज सय्यद यांनी भाजप कामगार मोर्चात प्रवेश केला. मेळाव्यास मोर्चाचे उपाध्यक्ष भाई गावडे, तेजस जमदाडे, चित्रपट आघाडी संयोजक विकास बनकर आदींनी मार्गदर्शन केले.
यावेळी अलीभाई आगा, मीनाक्षी पोळ, आशाताई जाधव, शिवदास लोहार, कुलदीप पवार, साताऱ्याच्या माजी नगराध्यक्ष रंजना रावत, श्रीकांत कुंभार, सुभाष गोगावले, विशाल शेडगे, विशाल घेवडे, सचिन काटे, विश्वनाथ कांबळे, संदीप ननावरे, सर्जेराव कोरके उपस्थित होते.