maharashtra

शिष्टाचार की भ्रष्टाचार जनतेनेच ठरवावे

उदयनराजे यांची महाविकास आघाडीच्या नेत्यांवर टीका, गोडोलीत कोपरा सभेला मोठी गर्दी

महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतील घोटाळा उघडकीस आला आहे. त्यामुळे महायुतीच्या शिष्टाचाराच्या पाठीशी राहायचे की भ्रष्टाचारी लोकांना मदत करायची, हे जनतेनेच ठरवावे, असे प्रतिपादन महायुतीचे लोकसभा उमेदवार उदयनराजे भोसले यांनी केले.

सातारा : महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतील घोटाळा उघडकीस आला आहे. त्यामुळे महायुतीच्या शिष्टाचाराच्या पाठीशी राहायचे की भ्रष्टाचारी लोकांना मदत करायची, हे जनतेनेच ठरवावे, असे प्रतिपादन महायुतीचे लोकसभा उमेदवार उदयनराजे भोसले यांनी केले. सातारा शहरातील गोडोली येथे भैरवनाथ पटांगणात आयोजित केलेल्या कोपरा सभेत ते बोलत होते.
याप्रसंगी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, माजी नगरसेवक एडव्होकेट डी.जी. बनकर, शेखर मोरे पाटील, विजय नाफड, एडव्होकेट बाळासाहेब बाबर, शिरीष चिटणीस, सुनिता फरांदे, अविनाश कदम, अमोल मोहिते, जिल्हा परिषद संस्था फेडरेशनचे संचालक व्यंकटराव मोरे, माजी पंचायत समिती सदस्य आशुतोष चव्हाण, भाजप महिला व मोर्चाच्या प्रदेश कार्यकारणी सदस्या सुवर्णताई पाटील, अजिंक्यतारा सूतगिरणीचे चेअरमन उत्तमराव नावडकर, संभाजीनगरचे सरपंच सतीश माने राजू पिसाळ, सागर भोसले, सचिन तेरोडकर, फिरोज पठाण, माजी नगराध्यक्ष अशोक मोरे यांची उपस्थिती होती.
उदयनराजे म्हणाले, सिंचन खाते ताब्यात असताना विरोधी उमेदवाराने जिल्ह्यासाठी एक पैसाही आणला नाही. त्यामुळे उमेदवाराला नैतिकदृष्ट्या मत मागायचा अधिकार राहिलेला नाही. त्यांचा नाकर्तेपणा लपवण्यासाठी विरोधक काहीही बरळत आहेत. त्यांच्या नेत्याला विदर्भ, कोकण, मराठवाडा, खानदेशात काहीच काम राहिले नसल्याने अडीच जिल्ह्यांचे नेतृत्व त्यांच्याकडे उरलेले आहे. त्यामुळेच माझ्या विरोधात त्यांनी जिल्ह्यामध्ये चार सभा लावल्या आहेत असा टोला त्यांनी लगावला.
विरोधकांनी केवळ जातीजातीमध्ये तेढ निर्माण करण्याचे काम केले आहे. याउलट केंद्र व राज्यातील महायुतीच्या सरकारने मोठा निधी देऊन जिल्ह्यातील प्रकल्प पूर्ण केले. जिल्ह्यातील गावागावात रस्ते पाणी योजना पोहोचवल्या. हीच निवडणुकीसाठी आपली जमेची बाजू असून लोकसभा निवडणूक झाल्यानंतर लगेच विधानसभेची निवडणूक होणार आहे. त्यामुळे जिल्ह्यामध्ये महायुतीचे सहाही आमदार निवडून आणण्यासाठी मी कष्ट घेणार आहे, असे ही उदयनराजे म्हणाले.
हा संदर्भ घेऊन ते पुढे म्हणाले, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत देखील आपण एकत्र काम करायचे असून जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करायचे आहेत, असे उदयनराजे म्हणाले.
एडव्होकेट डी.जी बनकर म्हणाले, भविष्याच्या प्रगतीसाठी ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे मतांचा टक्का वाढवण्याची जबाबदारी सर्व कार्यकर्त्यांवर आहे. गोडोली सह शहराच्या हद्दवाढीमधील भागामध्ये कोट्यावधीची विकास कामे आपण हाती घेतली आहेत. या भागात राहणाऱ्या लोकांचे मतदान मोठ्या संख्येने उदयनराजेंना व्हावे, यासाठी नियोजन करावे लागेल.
 

त्यांनी' कॉलर उडवून माझ्या विजयाचे दिले संकेत
महाविकास आघाडीच्या नेत्यांनी साताऱ्यात सभा घेऊन माझ्यासारखी कॉलर उडवण्याची स्टाईल केली. त्यांनी केलेले अनुकरण हे त्यांनी दिलेले  माझ्या विजयाचे संकेत आहेत, असे उदयनराजेंनी म्हणताच टाळ्यांचा कडकडाट झाला.