deshvidesh

हवामान अपडेट : संकट अजून संपलेलं नाही, राजस्थानमध्ये वादळ पुन्हा येण्याची शक्यता, 80 किमी प्रतितास वेगाने वारे वाहणार


Weather Update: The crisis is not over yet, there is a possibility of a storm in Rajasthan again, winds will blow at a speed of 80 kmph
हवामान विभागाकडून अलर्ट जारी करण्यात आला आहे. राजस्थानमध्ये पुन्हा धुळीच्या वादळाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

 देशात वेगवेगळ्या ठिकाणी हवामानात वेगाने बदल होताना दिसत आहेत. हवामान विभागाने केलेल्या संशोधनात फार महत्त्वाची माहिती समोर आली आहे. भारताच्या उत्तर-पश्चिम भागात वातावरणात मोठा बदल होण्याची शक्यता आहे. राजस्थानमध्ये तब्बल 80 किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. यामुळे हवामान विभागाकडून सर्वसामान्यांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. देशाची राजधानी असलेल्या दिल्लीतही वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. तसेच हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये डोंगराळ भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.

राजस्थानमध्ये धुळीचे भयानक वादळ बघायला मिळालं. यानंतर आता हवामान विभागाकडून पुन्हा असा इशारा देण्यात आला आहे. राजस्थानच्या वाळवंटी प्रदेशात 80 किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. इथे वातावरण पुन्हा रौद्र रुप धारण करण्याची शक्यता आहे. राजस्थानमध्ये पुन्हा धुळीचे मोठे वादळ येण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे धुळीचे वादळ हे दिल्ली आणि पंजाबमध्ये देखील येण्याची शक्यता आहे. याच वेळी उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशात बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आगामी काही दिवसांमध्ये राजस्थानमध्ये धुळीचे वादळ येण्याची शक्यता आहे. यावेळी वाऱ्याचा वेग हा ताशी 80 किमी इतका असण्याची शक्यता आहे. तर दिल्लीत 40 ते 50 किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. याचवेळी विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता आहे. पंजाब, हरियाणा, जम्मू-काश्मीर इथे देखील वादळी पावसाची शक्यता आहे. उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशात उंचावरच्या भागात बर्फवृष्टी आणि मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर दक्षिणेत आंध्र प्रदेशाच्या किनारी भागात वाऱ्याचा वेग हा ताशी 70 किमी इतका असण्याची शक्यता आहे.

देशात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे वातावरण बघायला मिळत आहे. एकीकडे महाराष्ट्रात चंद्रपूरमध्ये सर्वाधिक 44.8 डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. तर देहरादूनला 17 डिग्री सेल्सिअस सर्वात कमी तापमानाची नोंद झाली आहे. एकीकडे मान्सून हा केरळ, तामिनळनाडू आणि लक्षद्वीपच्या दिशेला सरकत आहे. तर दुसरीकडे उत्तर-पश्चिम भारतात पश्चिमी विक्षोभमुळे मैदानी भागात धुळीच्या वादळाची शक्यता आहे. हवामानाच्या या विरोधाभासाने देशाच्या नागरिकांना आश्चर्यात टाकलं आहे.