maharashtra

राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये ईएसआयसी रुग्णालये उभारण्याचा प्रयत्न – कामगार मंत्री आकाश फुंडकर


Efforts to set up ESIC hospitals in all districts of the state – Labour Minister Akash Fundkar
नवीन कामगार संहितेनुसार 40 वर्षांवरील कामगारांसाठीच्या वार्षिक आरोग्य तपासणी शिबिराचा राज्यात शुभारंभ

नवीन कामगार संहितेनुसार 40 वर्षांवरील कामगारांसाठीच्या वार्षिक आरोग्य तपासणी शिबिराचा राज्यात शुभारंभ

नवीन कामगार कायद्यांतर्गत प्रस्तावित केल्यानुसार, 40 वर्षे आणि त्यावरील वयोगटातील कामगारांसाठीचा हा देशव्यापी वार्षिक आरोग्य तपासणी उपक्रमाचा शुभारंभ आज कर्मचारी राज्य विमा महामंडळ (ESIC) वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय, बसैदारापूर, नवी दिल्ली येथे केंद्रीय कामगार आणि रोजगार तसेच युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांच्या हस्ते करण्यात आला. याच वेळी देशातील इतर 11 ESIC रुग्णालयांमध्येही सदर कार्यक्रम आयोजित करण्यात आले. त्यामध्ये पुण्यातील ESIC रुग्णालयाचाही समावेश आहे.

    

पुण्यात आयोजित कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेले कामगार मंत्री आकाश फुंडकर आपल्या भाषणामध्ये म्हणाले की कामगारांना कोणताही आजार उद्भवण्यापूर्वीच त्यांची आरोग्य तपासणी करणे हा सरकारचा मानस आहे. नियमित तपासणीमुळे गंभीर आजारांचे लवकर निदान होऊन कामगारांना मोठ्या आरोग्य धोक्यांपासून वाचवता येईल. सध्या राज्यात औद्योगिकीकरण वाढत असून कामगारांची संख्याही मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. अशा स्थितीत ईएसआयसी रुग्णालयांची गरज भासणार असून केंद्र सरकारसोबत यासंदर्भात सल्लामसलत करून रुग्णालयांची संख्या वाढवण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असेही कामगार मंत्री फुंडकर यांनी सांगितले.

राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी यावेळी औद्योगिक अपघातांमध्ये जखमी होणाऱ्या कामगारांना तत्काळ उपचार मिळण्याच्या दृष्टीने खासगी रुग्णालये आणि डॉक्टरांची मदत घेण्याबाबत सकारात्मक विचार करण्याची गरज व्यक्त केली. अनेक खासगी रुग्णालये आणि डॉक्टर ही सेवा मोफत देण्यास तयार आहेत, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.