1 जूनपासून LPG सिलिंडरच्या नियमांत मोठे बदल? 'एक घर, एक कनेक्शन' पासून ते PNG पाइपलाइनच्या नियमांपर्यंत जाणून घ्या
पेट्रोल आणि डिझेलनंतर, 1 जून रोजी एलपीजीच्या दरात पुन्हा वाढ होणार का? 'एक घर, एक कनेक्शन' पासून ते पीएनजी पाइपलाइनच्या नियमांपर्यंत कोणते मोठे बदल घडत आहेत याबद्दल अधिक जाणून घेऊयात.
१ जून पासून सिलेंडरचे नियम: दर महिन्याच्या पहिल्या तारखेला एलपीजी सिलिंडरच्या किमती जाहीर होत असल्याने देशभरातील ग्राहकांचे लक्ष तेल कंपन्यांच्या निर्णयाकडे लागलेले असते. यंदाही 1 जून रोजी घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरांमध्ये बदल होणार का? याबाबत प्रश्न निर्माण झाला आहे. गेल्या काही महिन्यांपासून आंतरराष्ट्रीय ऊर्जा बाजारातील अस्थिरता, कच्च्या तेलाच्या किंमतीतील चढ-उतार आणि जागतिक घडामोडींचा परिणाम इंधन क्षेत्रावर होताना दिसत आहे. त्यामुळे एलपीजीच्या दरांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे का, याबाबत ग्राहकांमध्ये चर्चा सुरू आहे. मात्र सध्या केवळ सिलिंडरच्या किमतीच नव्हे, तर गॅस कनेक्शनशी संबंधित नियमांमध्येही महत्त्वाचे बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांनी ग्राहकांना अतिरिक्त गॅस कनेक्शन स्वेच्छेने सरेंडर करण्याचे आवाहन केले असून 'एक घर, एक कनेक्शन' या धोरणाची अधिक कठोर अंमलबजावणी करण्याची तयारी सुरू असल्याचे संकेत मिळत आहेत
PNG आणि LPG दोन्ही कनेक्शन असणाऱ्यांवर विशेष लक्ष
शहरी भागांमध्ये पाइपद्वारे नैसर्गिक वायू (PNG) पुरवठा वेगाने वाढत आहे. अनेक कुटुंबांनी PNG सुविधा स्वीकारली असली तरी त्यांनी एलपीजी कनेक्शन कायम ठेवले आहे. यामुळे दुहेरी कनेक्शनची संख्या वाढल्याचे तेल कंपन्यांचे निरीक्षण आहे. याच पार्श्वभूमीवर PNG आणि LPG दोन्ही कनेक्शन असलेल्या ग्राहकांची माहिती तपासली जाऊ शकते. भविष्यात अशा ग्राहकांना एक पर्याय निवडण्यास सांगितले जाऊ शकते. नियमांचे पालन न केल्यास गॅस सिलिंडर बुकिंग, रिफिल सेवा किंवा इतर सुविधा प्रभावित होऊ शकतात.
अतिरिक्त कनेक्शन असल्यास काय करावे?
तेल कंपन्यांच्या सूचनांनुसार, ग्राहकांनी आपल्या नावावर किंवा पत्त्यावर किती गॅस कनेक्शन आहेत याची खात्री करून घ्यावी. जर अतिरिक्त कनेक्शन आढळले तर ते संबंधित वितरकाकडे जमा करण्याचा पर्याय उपलब्ध आहे. काही प्रकरणांमध्ये ग्राहकांना 'डबल बॉटल कनेक्शन' (DBC) सुविधेचा लाभ घेता येऊ शकतो. या व्यवस्थेत एकाच कनेक्शनवर दोन सिलिंडर उपलब्ध होतात. त्यामुळे अतिरिक्त कनेक्शन ठेवण्याची गरज राहत नाही आणि घरगुती वापरात गॅस संपल्यास पर्यायी सिलिंडर उपलब्ध राहतो.
ट्रान्सफर व्हाउचरची सुविधा
PNG वापरणाऱ्या ग्राहकांसाठी काही प्रमाणात दिलासा देणारी व्यवस्था देखील उपलब्ध करून देण्यात येऊ शकते. त्यानुसार, ग्राहकांनी एलपीजी कनेक्शन तात्पुरते बंद केल्यास त्यांना ट्रान्सफर व्हाउचर दिले जाऊ शकते. भविष्यात PNG सेवा बंद झाल्यास किंवा अन्य कारणांमुळे एलपीजीची गरज निर्माण झाल्यास या व्हाउचरच्या मदतीने कनेक्शन पुन्हा सक्रिय करता येऊ शकते.
तेल कंपन्या कडक भूमिका का घेत आहेत?
एलपीजी सिलिंडरचा गैरवापर, काळाबाजार, अनधिकृत विक्री आणि अनुदान व्यवस्थेतील त्रुटी रोखण्यासाठी तेल कंपन्या डेटा पडताळणी मोहीम राबवत आहेत. देशभरात लाखो ग्राहकांनी वेगवेगळ्या कारणांमुळे एकापेक्षा अधिक कनेक्शन घेतल्याचे आढळले आहे. यामुळे वितरण व्यवस्थेवर अतिरिक्त ताण येतो आणि पात्र ग्राहकांपर्यंत सेवा पोहोचवण्यात अडचणी निर्माण होतात. याशिवाय, डिजिटल पडताळणी प्रणाली अधिक सक्षम झाल्याने एकाच पत्त्यावर किंवा कुटुंबाशी संबंधित अनेक कनेक्शन ओळखणे कंपन्यांना सोपे झाले आहे. त्यामुळे आगामी काळात नियमांची अंमलबजावणी अधिक काटेकोर होण्याची शक्यता आहे.
1 जूनला सिलिंडर महागणार का?
घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमती वाढणार की नाहीत, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. दर महिन्याच्या सुरुवातीला तेल कंपन्या आंतरराष्ट्रीय बाजारातील परिस्थिती, आयात खर्च, डॉलर-रुपया विनिमय दर आणि इतर आर्थिक घटकांचा विचार करून नवीन दर जाहीर करतात. त्यामुळे 1 जून रोजीच ग्राहकांना अंतिम चित्र स्पष्ट होईल.
ग्राहकांनी काय करावे?
ग्राहकांनी आपल्या गॅस कनेक्शनची माहिती तपासून घ्यावी. एकापेक्षा अधिक कनेक्शन असल्यास संबंधित वितरकाशी संपर्क साधावा. PNG आणि LPG दोन्ही सेवा वापरत असल्यास नियमांची माहिती घेणे आवश्यक आहे. तसेच कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता तेल कंपन्यांच्या अधिकृत सूचनांकडे लक्ष देणे महत्त्वाचे ठरेल. एकूणच, 1 जूनपासून एलपीजीच्या किमतींमध्ये बदल होणार की नाही याची उत्सुकता कायम असली तरी गॅस कनेक्शनशी संबंधित नियमांच्या अंमलबजावणीवर ग्राहकांनी अधिक लक्ष देण्याची गरज आहे. आगामी काळात "एक घर, एक कनेक्शन" हे धोरण अधिक प्रभावीपणे राबवले जाण्याची शक्यता आहे.


