maharashtra

*पुणे मुख्य टपाल कार्यालयात समर्पित आंतरराष्ट्रीय पार्सल बुकिंग केंद्र व पार्सल पॅकेजिंग युनिटचे उद्घाटन*


Inauguration of a dedicated International Parcel Booking Centre and Parcel Packaging Unit at the Pune Head Post Office.
*पुणे मुख्य टपाल कार्यालयात समर्पित आंतरराष्ट्रीय पार्सल बुकिंग केंद्र व पार्सल पॅकेजिंग युनिटचे उद्घाटन*

पुणे, दि. २३ जून २०२६ : ग्राहकांच्या सोयीसुविधा आणि सेवा उत्कृष्टता वाढविण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून पुणे मुख्य टपाल कार्यालयातील समर्पित आंतरराष्ट्रीय पार्सल बुकिंग केंद्र व पार्सल पॅकेजिंग युनिट चे उद्घाटन आज प्रमुख पाहुण्या सौ. प्रीती अग्रवाल, पोस्टमास्तर जनरल, पुणे क्षेत्र, पुणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी श्री. समीर महाजन, वरिष्ठ अधीक्षक टपाल कार्यालये, पुणे शहर पूर्व विभाग उपस्थित होते.

नवीन सुविधेचे संपूर्ण नूतनीकरण करण्यात आले असून आधुनिक व ग्राहकाभिमुख वातावरण निर्माण करण्यात आले आहे. या सुधारित केंद्रामध्ये प्रशस्त जागा, प्रतीक्षालय, ग्राहक विश्रांती कक्ष (Customer Lounge), बसण्याची व्यवस्था, ग्राहकांसाठी सुधारित सुविधा, सुबक सेवा काउंटर, कार्यक्षम कार्यक्षेत्र नियोजन तसेच ग्राहकांना पार्सल व लॉजिस्टिक सेवा सहज आणि आनंददायी पद्धतीने उपलब्ध करून देण्यासाठी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. या केंद्राचे कामकाजाचे तास सकाळी ९.०० ते रात्री ९.०० पर्यंत वाढविण्यात आले आहेत. तसेच या केंद्रामध्ये डाक निर्यात केंद्र (DNK) साठी स्वतंत्र काउंटरची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.

हे समर्पित आंतरराष्ट्रीय पार्सल बुकिंग केंद्र व पार्सल पॅकेजिंग युनिट देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर वस्तूंचे सुरक्षित पॅकेजिंग व पाठवणी करण्यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. ई-कॉमर्स, व्यावसायिक मालवाहतूक व वैयक्तिक पार्सल सेवांच्या वाढत्या मागणीच्या पार्श्वभूमीवर ही सुविधा ग्राहक समाधान व कार्यक्षमता अधिक बळकट करेल, अशी अपेक्षा आहे.

गेल्या तीन आर्थिक वर्षांत पुणे मुख्य टपाल कार्यालयाच्या पार्सल व्यवसायात सातत्याने उल्लेखनीय वाढ झाली आहे. पुणे मुख्य टपाल कार्यालयातून दररोज सरासरी ७४ आंतरराष्ट्रीय पार्सल विविध देशांमध्ये पाठविले जातात. तसेच दररोज सरासरी ६९ ग्राहक पॅकेजिंग सुविधेचा लाभ घेत असून त्यातून सुमारे ₹९६,२४२/- इतके उत्पन्न मिळते. याशिवाय, पुणे मुख्य टपाल कार्यालयातील डाक निर्यात केंद्रामध्ये दररोज सरासरी १२ बुकिंग्स होतात, ज्यातून सुमारे ₹२५,६७६/- इतके उत्पन्न प्राप्त होते. ही आकडेवारी इंडिया पोस्टच्या विश्वासार्ह, सुरक्षित आणि किफायतशीर लॉजिस्टिक नेटवर्कवरील ग्राहकांचा वाढता विश्वास दर्शवते.

पुणे मुख्य टपाल कार्यालयाव्यतिरिक्त, पुणे शहर पूर्व विभागांतर्गत चिंचवड पूर्व मुख्य टपाल कार्यालय आणि मार्केट यार्ड उप टपाल कार्यालय येथेही सकाळी ९.०० ते रात्री ९.०० या वेळेत समर्पित डाक निर्यात केंद्र व पार्सल पॅकेजिंग युनिट सेवा उपलब्ध आहेत. निकट भविष्यात हडपसर आयई उप टपाल कार्यालय आणि इन्फोटेक पार्क उप टपाल कार्यालय येथेही अशाच सुविधा सुरू करण्याचे नियोजन आहे.

यावेळी बोलताना पोस्टमास्तर जनरल सौ. प्रीती अग्रवाल यांनी विभागाच्या पायाभूत सुविधा व ग्राहक सेवा सातत्याने उन्नत करण्याच्या वचनबद्धतेवर भर दिला. त्यांनी सांगितले की, समर्पित आंतरराष्ट्रीय पार्सल बुकिंग केंद्र व पार्सल पॅकेजिंग युनिट हे पुणेकर नागरिकांना जागतिक दर्जाच्या टपाल व लॉजिस्टिक सेवा उपलब्ध करून देण्याच्या दिशेने आणखी एक महत्त्वाचा टप्पा आहे.

गेल्या १७० वर्षांहून अधिक काळ टपाल विभाग हा केवळ सेवा प्रदाता नसून लोक, व्यवसाय आणि समुदायांना जोडणारा विश्वासू सहकारी राहिला आहे. इंडिया पोस्टवर लाखो ग्राहकांनी दाखवलेला विश्वास हा विश्वासार्हता, पारदर्शकता आणि समर्पित सेवांच्या भक्कम पायावर उभा आहे. डिजिटल युगातही ग्राहक इंडिया पोस्टच्या व्यापक नेटवर्क आणि विश्वासार्ह सेवांमुळे टपाल सेवांना पसंती देत आहेत.

या उपक्रमाचा लाभ घेणाऱ्या ग्राहकांनी आपल्या समाधानाची भावना व्यक्त केली आणि पुणे मुख्य टपाल कार्यालय परिसरात अशा सुविधेची स्थापना झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला. ग्राहकांच्या बदलत्या गरजांनुसार टपाल विभाग सातत्याने प्रगत होत असून सेवांचा वारसा जपत आधुनिक सुविधा उपलब्ध करून देत असल्याचे त्यांनी नमूद केले.

मान्यवर ग्राहक कर्नल भगतसिंग यांनी आपले मत व्यक्त करताना सांगितले की, “मी सैन्य अधिकारी म्हणून २० पेक्षा अधिक देशांमध्ये प्रवास केला असून जगभरातील टपाल सेवा अनुभवल्या आहेत. पुणे मुख्य टपाल कार्यालयातील समर्पित आंतरराष्ट्रीय पार्सल बुकिंग केंद्र अत्यंत प्रभावी असून येथे उत्कृष्ट ग्राहकाभिमुख सुविधा व व्यावसायिक वातावरण आहे. कर्मचारी नम्र, कार्यक्षम आणि नेहमी मदतीस तत्पर आहेत. या सेवेबद्दल मी अत्यंत समाधानी असून आपल्या टपाल विभागातील हा सकारात्मक बदल पाहून अभिमान वाटतो.”

ग्राहक, व्यावसायिक संस्था, निर्यातदार, विद्यार्थी आणि उद्योजक यांनी पुणे मुख्य टपाल कार्यालयातील या समर्पित आंतरराष्ट्रीय पार्सल बुकिंग केंद्रास भेट देऊन देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय पार्सल सेवांसाठी उपलब्ध सुधारित सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. टपाल विभाग सर्व ग्राहकांना कार्यक्षम, ग्राहकाभिमुख आणि विश्वासार्ह सेवा प्रदान करण्यासाठी कटिबद्ध आहे.

या कार्यक्रमास वरिष्ठ टपाल अधिकारी, कर्मचारी तसेच विविध उत्पादक, सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग (MSME), वस्त्रव्यवसाय, पुस्तक विक्रेते, इलेक्ट्रॉनिक्स विक्रेते, शेतकरी उत्पादक संस्था, स्वयं-सहाय्यता गट, ग्रामीण कारागीर, हस्तकला उत्पादक, कृषी उत्पादन विक्रेते, स्थानिक विशेष वस्तू व भेटवस्तू विक्रेते आदी मान्यवर उपस्थित होते.

कोणत्याही तक्रार निवारणासाठी ग्राहकांनी श्री. अमेय निमसुडकर, वरिष्ठ पोस्टमास्तर, पुणे मुख्य टपाल कार्यालय किंवा श्री. अनुप नहाटे, पीआरआय (पी), पुणे मुख्य टपाल कार्यालय यांच्याशी संपर्क साधावा. तसेच कोणत्याही माहितीसाठी व्हॉट्सअॅप क्रमांक ८४२१३७२३१७ वर संपर्क साधता येईल.