maharashtra

मान्सूनाधीच मुंबईच्या समुद्राचं रौद्र रुप? किनाऱ्यावर मृत माशांचा खच आणि....चिंता वाढवणाऱ्या घटना


Mumbai's sea looks rough just before monsoon? Dead fish litter the shore and....worrying incidents
मुंबईसह कोकणातील समुद्रामध्ये सध्या कमी दाबाचा पट्टा सक्रिय होत असून, पावसाच्या धर्तीवर समुद्रातील हालचालींवरही हवामान विभाग लक्ष ठेवून आहे. याचदरम्यान दोन घटनांनी यंत्रणांची चिंता वाढवली आहे....

नैऋत्य (Monsoon News) मान्सूनची वाटचाल प्रगतीपथावर होत असून, येत्या काळात अरबी समुद्राच्या बहुतांश भागांमध्ये मान्सून पुढे जाईल असं म्हटलं जात आहे. प्रामुख्यानं अरबी समुद्रातील उत्तरेसह महाराष्ट्र आणि मुंबईच्या किनारपट्टी भागांमध्ये हे बदल दिसून येतील. ज्यामुळं केंद्रीय हवामान विभागानं दक्षिण कोकणासह गोवा, दक्षिण मध्य महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबई शहराच्या किनारपट्टी भागामध्ये यादरम्यान सोसाट्याचा वारा सुटेल, ज्यामुळं यंत्रणासुद्धा सतर्क आहेत. एकिकडे मान्सूनच्या आगमनाची उत्सुकता शिगेला पोहोचली असतानाच मुंबईनजीकच्या किनारपट्टीवरील काही घटनांनी मात्र चिंता वाढवली आहे. 

मुंबईलगतच्या समुद्रकिनाऱ्यावर हजारो मृत मासे

पालघरच्या मुरबे आणि सातपाटी समुद्र किनारपट्टीलगत हजारो लहान मृत मासे आढळल्याने खळबळ माजली. कारखान्यांमधून समुद्रात सोडण्यात येणाऱ्या केमिकल मिश्रित रासायनिक सांडपाण्यामुळे माशांचा मृत्यू झाल्याचा स्थानिकांचा आरोप आहे. मोठ्या प्रमाणावर मृत मासे आढळून आल्याने मच्छीमारांकडून संतापही व्यक्त केला जात आहे. पालघरच्या समुद्रकिनाऱ्यालगत मोठ्या प्रमाणावर दरवर्षी केमिकल सोडल्यामुळे मासेमारी संकटात येत असल्याचं दाहक वास्तव मागील काही वर्षांमध्ये भीषण रुप धारण करत आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ मात्र या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष करत असल्याचा स्थानिकांचा आरोप असून, इथं सध्या मृत माशांचा खच पडल्याने स्थानिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. 

पावसापूर्वी काळ्या तेलाचे तवंग

तिथं मुंबईत येणाऱ्या अनेकांसाठी कुतूहलाचा विषय असणाऱ्या जुहू चौपाटीच्या किनाऱ्यावर पावसापूर्वी अचानक काळ्या तेलाचे थर पसरल्याचे पाहायला मिळत आहेत. समुद्रकिनाऱ्यावरील वाळू आणि पाण्यावर पसरलेल्या या तेलकट प्रदूषणामुळे पर्यावरणाबरोबरच सागरी जीवसृष्टीवरही परिणाम होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. यामुळे चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. त्यामुळे पर्यावरणाची तशीच समुद्री जीवाची मोठ्या प्रमाणात हानी होण्याची भीती तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.