maharashtra

आकांक्षित जिल्ह्यांच्या विकासात माध्यमांची भूमिका महत्त्वाची : कीर्तीकिरण पुजार


Media plays a crucial role in the development of aspirational districts: Kirtikiran Pujar
पीआयबीच्या वतीने आयोजित ‘वार्तालाप’ माध्यम परिषदेचे धाराशिव येथे यशस्वी आयोजन; आकांक्षित जिल्ह्यांमध्ये शाश्वत शेती आणि आधुनिक तंत्रज्ञान पोहचवण्यासंदर्भात मंथन



मुंबई/ केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाअंतर्गत कार्यरत असलेल्या पत्र सूचना कार्यालय (PIB) मुंबईच्या वतीने आज (मंगळवार 1 सप्टेंबर) धाराशिव येथे पत्रकारांसाठी वार्तालाप कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. ही कार्यशाळा ‘आकांक्षित जिल्ह्यांसाठी शाश्वत शेतीचे सुलभीकरण’ या प्रमुख संकल्पनेवर आयोजित करण्यात आली होती.

कार्यशाळेचे उद्घाटन धाराशिवचे जिल्हाधिकारी कीर्तीकिरण पुजार, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियंवदा म्हाडदळकर यांच्या प्रमुख शुभहस्ते पार पडले. याप्रसंगी जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, पीआयबीचे माहिती व संचार अधिकारी हर्षल आकुडे, माहिती सहायक एडगर कोएल्हो आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने झाली.

आपल्या अध्यक्षीय भाषणात मनोगत व्यक्त करताना जिल्हाधिकारी कीर्तीकिरण पुजार यांनी कार्यशाळेच्या आयोजनाचे कौतुक केले.


शेतीसोबतच कुक्कुटपालन, शेळीपालन तसेच मधुमक्षिका पालन यांच्यासारखे शेतीपूरक व्यवसाय केल्यास शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होते. स्थानिक शेतकरी आणि ग्रामीण समुदायांच्या आर्थिक उन्नतीसाठी शाश्वत आणि सर्वसमावेशक कृषी पद्धती अत्यंत महत्त्वाची आहे.

माध्यमांनी शेतीसंदर्भातली उपयुक्त माहिती सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे. सकारात्मक आणि विकास पत्रकारितेच्या माध्यमातून शेतीतील यशकथा समाजापर्यंत पोहोचवल्यास शेतीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्यास मदत होते. त्यामुळे धाराशिवसारख्या आकांक्षित जिल्ह्यांच्या विकासात माध्यमांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी कीर्तीकिरण पुजार यांनी केले.


जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियंवदा म्हाडदळकर यांनी अशा प्रकारचे उपक्रम ग्रामीण भागाच्या विकासात महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. धाराशिव हा केंद्र सरकारच्या निती आयोगाच्या यादीवरील आकांक्षित जिल्हा असून शाश्वत आणि सेंद्रीय शेतीच्या माध्यमातून जिल्ह्याचा विकास वेगाने करता येऊ शकतो, असे त्यांनी सांगितले.

अणुऊर्जा विभागाचे कृषी क्षेत्रातील योगदान

कार्यशाळेच्या तांत्रिक सत्रात भारत सरकारच्या अणुऊर्जा विभागाच्या (DAE) तज्ज्ञांनी कृषी आणि अन्न तंत्रज्ञानातील आधुनिक अणुतंत्रज्ञानाच्या वापराबाबत उपस्थितांना महत्त्वपूर्ण माहिती दिली.


न्यूक्लियर ॲग्रीकल्चर अँड बायोटेक्नॉलॉजी डिव्हिजनचे सायंटिफिक ऑफिसर ‘जी’ डॉ. विनोद जे. ढोले यांनी पिकांच्या सुधारित आणि रोगप्रतिकारक वाणांच्या निर्मितीमध्ये तसेच कृषी उत्पादकता वाढवण्यात अणुतंत्रज्ञान कसे उपयोगात येते, यावर सविस्तर भाष्य केले.


अन्न तंत्रज्ञान विभागाचे श्री. सचिन हजारे यांनी रेडिएशन तंत्रज्ञानाचा वापर करून अन्नधान्य आणि फळांची साठवणूक क्षमता वाढवणे, अन्न सुरक्षा आणि आंतरराष्ट्रीय व्यापाराला चालना देण्याच्या क्षमतेवर प्रकाश टाकला.

कृषी विज्ञान केंद्राचा शेती तंत्रज्ञानावर प्रकाश

कृषी विज्ञान केंद्राचे (KVK) शास्त्रज्ञ डॉ. सचिन सूर्यवंशी यांनी ‘कृषी विस्तार सेवांच्या प्रसारात कृषी विज्ञान केंद्राची भूमिका’ या विषयावर माहिती दिली.


प्रयोगशाळेतील वैज्ञानिक संशोधन आणि शेतकरी यांच्यातील अंतर कमी करून आधुनिक ज्ञान, तंत्रज्ञान व पीक पद्धती थेट शेतापर्यंत पोहोचवण्यात कृषी विज्ञान केंद्र हे मुख्य दुवा असून संस्थेच्या क्षमता निर्मिती अंतर्गत शेतकऱ्यांना विविध उपक्रमांचा कशा प्रकारे लाभ दिला जातो, याबाबत त्यांनी माहिती दिली.

मधुमक्षिका पालन

केंद्रीय मधुमक्षिका संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेचे (CBRTI) प्रशिक्षण समन्वयक राहुल काळे यांनी शास्त्रीय बॉक्स मधमाशी पालन आणि फुलोरा व्यवस्थापनाचे महत्त्व स्पष्ट केले.


प्रशिक्षण व सूक्ष्मदर्शकीय परागकण विश्लेषणाद्वारे मधमाशी पालकांना शुद्ध मध उत्पादन घेणे शक्य होते आणि भेसळीवर नियंत्रण मिळवता येते, ज्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भर पडते, असे त्यांनी सांगितले.


याच सत्रामध्ये लातूर येथील मधपाळ ज्ञानेश्वर मलिले यांनीही आपले अनुभवकथन केले. CBRTI च्या सहकार्याने त्यांनी लातूर मधुशाळा तसेच भगीरथ मधु केंद्र यांची उभारणी केली असून या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होत आहे, असे त्यांनी सांगितले.



दरम्यान, धाराशिव जिल्ह्यातील केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री आवास योजनेचे लाभार्थी रघुनाथ जाधव तसेच लखपती दीदी अनिता देवकडे यांनीही माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला आणि योजनांबाबत समाधान व्यक्त केले.



कार्यक्रमाच्या अखेरीस, पीआयबी मुंबईचे माहिती सहायक एडगर कोएल्हो यांनी उपस्थित सर्व मान्यवर, तज्ज्ञ वक्ते आणि माध्यम प्रतिनिधींचे आभार मानले. सूत्रसंचालन भैरवनाथ कानडे यांनी केले. या कार्यशाळेस धाराशिव जिल्ह्यातील ज्येष्ठ पत्रकार, माध्यम प्रतिनिधी आणि अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दरम्यान, धाराशिव जिल्ह्यातील केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री आवास योजनेचे लाभार्थी रघुनाथ जाधव तसेच लखपती दीदी अनिता देवकडे यांनीही माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला आणि योजनांबाबत समाधान व्यक्त केले.



कार्यक्रमाच्या अखेरीस, पीआयबी मुंबईचे माहिती सहायक एडगर कोएल्हो यांनी उपस्थित सर्व मान्यवर, तज्ज्ञ वक्ते आणि माध्यम प्रतिनिधींचे आभार मानले. सूत्रसंचालन भैरवनाथ कानडे यांनी केले. या कार्यशाळेस धाराशिव जिल्ह्यातील ज्येष्ठ पत्रकार, माध्यम प्रतिनिधी आणि अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.