उदयनराजे तुतारीची पिपाणी करतील
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा; तालीम संघावर उच्चांकी गर्दीत सभा
आमच्या शरद पवारसाहेबांचा दुटप्पीपणा बघा. कोल्हापूरला जातात अन त्या ठिकाणी सांगतात शाहू महाराज यांच्या विरोधात तुम्ही उमेदवार उभा केला. हे किती चुकीचे आहे. त्यांना तुम्ही त्याठिकाणी बिनविरोध निवडून द्यायला पाहिजे होते. मग साताऱ्यात हे छत्रपती उदयनराजे महाराज नाहीत का? हे तुम्हांला का नाही आठवलं? जर तुम्हांला कोल्हापूरला आठवते तर साताऱ्यात का नाही आठवत?
सातारा : आमच्या शरद पवारसाहेबांचा दुटप्पीपणा बघा. कोल्हापूरला जातात अन त्या ठिकाणी सांगतात शाहू महाराज यांच्या विरोधात तुम्ही उमेदवार उभा केला. हे किती चुकीचे आहे. त्यांना तुम्ही त्याठिकाणी बिनविरोध निवडून द्यायला पाहिजे होते. मग साताऱ्यात हे छत्रपती उदयनराजे महाराज नाहीत का? हे तुम्हांला का नाही आठवलं? जर तुम्हांला कोल्हापूरला आठवते तर साताऱ्यात का नाही आठवत? तुम्ही म्हणायला पाहिजे होते. साताऱ्यात या गादीचा मान आहे. इथे छ. उदयनराजे उभे आहेत मी उमेदवार उभा करणार नाही,पण त्यांनी असा उमेदवार उभा केला की, ज्याने शौचालयातही पैसे खाल्ले. छ. उदयनराजे यांच्या विरोधात उमेदवार उभा करायचा होता तर किमान त्या तोडीचा तर उमेदवार उभा करायला हवा होता. त्यामुळे आता तुतारीची पिपाणी होणार आहे. अन साताऱ्याचे छ. उदयनराजे भोसले हेच तुतारीची पिपाणी केल्याशिवाय राहणार नाहीत, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
देवेन्द्र फडणवीस म्हणाले की, आजची विराट सभा पाहिल्यानंतर आता माझ्या मनामध्ये उदयनराजे मोठ्या मताधिक्कयाने निवडून येण्यामध्ये कोणतीही शंका नाही. आज साताऱ्यात दुसरीकडे सभा सुरू आहे, पण त्यामध्ये एका कोपऱ्यएवढी लोक नाहीत. सातारा जिल्हा लढणारा आहे. आज सीमेवर लढणारे याच जिल्ह्यातील सर्वाधिक लोक आहेत. आज विकास कसा घडवायचा आहे, याची ब्ल्यू प्रिंट छ. उदयनराजे, शिवेंद्रसिंहराजे यांच्याकडे आहे. ज्यावेळी आपण आयटी हबची मागणी करता म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदीनी आयटी हब केले आहे. हे आज संपूर्ण देशाला ज्ञात झालं आहे.आयटी पार्क किंवा सातरकरसाठी वंदे भारत ट्रेन सुरू करायची असेल तर यासाठी नरेंद्र मोदी यांच्या समवेत छ.उदयनराजे यांनाही पाठवावे लागेल. देशाची किल्ली आपणाला याच माध्यमातून मिळणार आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ६0 कोटी पेक्षा अधिक लोकांना मोदी यांच्या गॅरंटी मुळे १0 लाखाच कर्ज मिळत आहे. आता ते २0 लाख करण्याचे उद्दिष्ट आहे. महिलांना अधिकार देण्याचे काम करावे लागत आहेत यापुढे ३३ टक्के महिलांना संधी मिळणार आहे. आज लाखो अनुसूचित जातीचे लोक उद्योजक झाले आहेत.मोदी यांनी वन रॅक वन पेन्शन योजना सैनिकांना दिली.आज महाराष्ट्राला ५0 हजार कोटी दिले तर सातारा जिल्ह्यात ४८ हजार हेक्टर जमीन ओलिताखाली आणली आहे. कोरेगावात एका शिंदेंना पाणीदार आमदार केले तर दुसऱ्याला हद्दपार केले आता उदयनराजे त्यांना कायमचे हद्दपार करतील.भारतात येणारी सर्वाधिक इन्व्हेस्ट ही महाराष्ट्रात असेल. आज भारताने अग्नी मिसायल तयार केलं आहे. ही भारताची प्रगती आहे. त्यामुळे आज भारताकडे कोणाची वाकडी नजर करण्याची हिंमत होत नाही. 2014 नंतर एकही बॉम्बस्फोट पाकिस्तानने भारतामध्ये केला नाही. नरेंद्र मोदी म्हणतात, तिसऱ्यांदा पंतप्रधान होताना माझी प्रेरणा ही छत्रपती शिवाजी महाराज आहेत. त्यामुळे समृद्ध भारत करण्यासाठी त्यांच्या सोबत साताऱ्याचे छ.उदयनराजे दिसले पाहिजेत, अशी अपेक्षा देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.
सातारा लोकसभेची निवडणूक ही सातारकरांनो आता तुमच्या भरवशावर सोडली आहे. या निवडणुकीत आता शिवेंद्रसिंहराजे भोसले अन छ. उदयनराजे भोसलेही आहेत. आपला उमेदवार निवडून येणार आहे, पण आम्हांला रेकॉर्ड हवं आहे. हे रेकॉर्ड सातारकरांनी असं केलं पाहिजे की, ते उभ्या देशाला समजलं पाहिजे. साताऱ्यातील छत्रपतीं शिवरायांच्या भुमीचा हुंकार हा उभ्या देशाला समजलं पाहिजे, असे मत देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.
छ. उदयनराजे भोसले म्हणाले, देशाला तांत्रिक दृष्ट्या मागास ठेवण्याचे पाप काँग्रेसने केले आहे. महायुतीच्या काळामध्ये सातारा जिल्ह्यात तब्बल दहा हजार कोटींची कामे झाली. आता टुरिझम, आयटी पार्क ,कृष्णा नदीचे शुद्धीकरण, एमआयडीसीची निर्मिती, स्ट्रॉबेरी, हळद ,बटाटा संशोधन केंद्र, अग्रो प्रोसेसिंग युनिट्स उभारण्याच्या अनुषंगाने आम्ही पाऊले टाकत आहोत. आम्हाला केंद्र व राज्य सरकारचे निश्चितपणाने बळ मिळणार आहे. 55 वर्षांमध्ये जे काँग्रेसला जमले नाही ते आम्ही दहा वर्षात करून दाखवले आणि इथून पुढच्या काळात देखील प्रगतीची ही गंगा अशीच वाहत राहणार आहे. आम्ही मागच्या जन्मी काहीतरी पुण्य केले असेल म्हणून आम्ही छत्रपती घरात जन्मलो आहे. पण आज आम्ही लोकशाही च्या माध्यमातून आपणाकडे मत मागत आहे. ज्यावेळी महाविकास आघाडीवर बोलायचं झालं तर त्यांचा स्वार्थ साधला की, निघून जात असतात त्यामुळे महाविकास आघाडी ही आज महाभकास आघाडी म्हणावे लागेल. मी आजपर्यंत तुम्हा सर्वांना केंद्र बिंदू मानून काम केले आहे त्यामुळे भविष्यात ही तेच राहणार आहे.
शंभूराज देसाई म्हणाले की, सातारकर यांना एवढेच सांगायचं आहे आमदार महायुती चे चार आहेत हे सर्वजण आम्ही विधानसभेसाठी मागतो त्याच प्रमाणे आम्ही उदयनराजे यांच्यासाठी निवडणुकीचा फॉर्म भरल्यापासून मागत आहोत. आजच्या सभेस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.
शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले की, सूत्रसंचालन करणारे कणसे यांनी माझा माजी मंत्री असा उल्लेख केला पण मी काय माजी मंत्री नव्हतो पण भविष्यात करतील का नाही माहीत नाही. पण जे करणार आहेत ते आपल्याच जवळ आहेत. त्यामुळे आपण सर्वांनी त्यांच्या पाठीशी रहावे. ही निवडणूक स्थानिक हेवेदावे यासाठी नाही. भारताचे संरक्षण कोणाच्या हाती जाणार आहे, ते ठरवायचे आहे, नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान म्हणून बसवायचे आहे. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाची गरज ही आज फक्त आपल्यालाच नाही, तर संपूर्ण देशाला आहे. उदयनराजे याना मत द्यायचे म्हणजे मोदींना मत आहे
प्रास्ताविक आ.महेश शिंदे यांनी केले. यावेळी ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन, महादेव जानकर, पालकमंत्री शंभूराज देसाई, आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, आ. महेश शिंदे, माजी आमदार मदनदादा भोसले, नरेंद्र पाटील, पुरुषोत्तम जाधव, अमित कदम, भाजप जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, सुनील काटकर, अशोक गायकवाड, बाळासाहेब बाबर, अरुणाताई बर्गे, सुरभी भोसले, माधवी कदम, चित्रलेखा कदम, सुवर्णा पाटील, माधवी कदम आदी उपस्थित होते.
भाजपमध्ये झाले पक्ष प्रवेश
सातारा येथील गांधी मैदानावरील आयोजित सभेत देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत वसंतराव मानकुमरे, पिंटू गुरव, सौरभ शिंदे आदींनी प्रवेश केला. याचवेळी गुजराथी समाजाने छ. उदयनराजे यांना पाठिंबा दिला आहे.
महाविकास आघाडीचे इंजिन स्वार्थी
आपली महायुती ही विकासाची गाडी आहे. याची बोगी मजबूत आहे. भटके विमुक्तसह सबका साथ सबका विकास घेऊन पुढे जात आहे, तर राहुल गांधींच्या गाडीला इंजिनच नाही. तिथे प्रत्येक जण मीच इंजिन आहे म्हणतो. पवारसाहेब यांच्या इंजिन मध्ये फक्त सुप्रिया यांना जागा आहे. तर उध्दव ठाकरे यांच्या इंजिनमध्ये आदित्य ठाकरे आहेत. एकूणच महाविकास आघाडीचे इंजिन हे स्वार्थी आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
दोन महाराजांचा आदेश शिरसावंद्य
महाराजांचा आदेश न पाळण्याची बिशाद कोणाकडे नाही. त्यांनी आयटी हब, एमआयडीसी मागितली आहे, देशाचं आणि राज्याचे नेतृत्व खंबीर आहे त्यामुळे या दोन्ही गोष्टी निश्चितपणाने दिल्या जातील, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.


