maharashtra

पुण्यात पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भारतीय लष्कराची तुकडी तैनात


A contingent of Indian Army deployed to help the flood victims in Pune

पुण्यातील संततधार पाऊस आणि खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढल्यामुळे, भारतीय सैन्यदलाने एकता नगरमधील पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी  एक पूरग्रस्त मदत तुकडी त्वरीत तैनात केली आहे.  जिल्हाधिकारी कार्यालयाने आज सकाळी 9:15 वाजता भारतीय लष्कराच्या सहाय्याची मागणी केल्यानंतर त्वरीत ही कार्यवाही करण्यात आली.
पूरग्रस्त भागात तैनात केलेल्या या तुकडीत सुमारे 100 जवानांचा समावेश आहे.  या तुकडीमध्ये मराठा लाईट इन्फंट्रीच्या पायदळातील जवान, बॉम्बे इंजिनिअर्स ग्रुपचे अभियंता कार्य दल आणि खडकीच्या लष्करी रुग्णालयातील वैद्यकीय पथकाचा समावेश आहे. ही तुकडी,   बचाव नौका, मानवरहीत स्वयंचलित हेलिकॉप्टर्स (क्वाडकॉप्टर) आणि इतर आवश्यक बचावसाधनांनी सुसज्ज आहे. 
ही लष्करी तुकडी येऊन दाखल झाल्यानंतर, बचावतुकडीच्या प्रमुखाने (कमांडर) परिस्थितीचा आढावा घेतला आणि नागरी प्रशासनासोबत  प्राथमिक पाहणी केली.  खडकवासला धरणातून  पाण्याचा वाढीव विसर्ग सुरु केल्याने एकता नगरसह अनेक भागात पाण्याच्या पातळीत लक्षणीय वाढ झाली आहे.
नागरी प्रशासनाच्या सहकार्याने, भारतीय लष्कराच्या या तुकडीने जलमय भागातील सर्व इमारती आणि घरे रिकामी करण्यास सुरुवात केली असून, रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित केले जात आहे. 
पूरग्रस्त भागाचा परिणामकारक आढावा घेऊन प्रभावी उपाययोजना करण्यासाठी क्वाडकॉप्टर आणि फुगवता येण्याजोग्या रबरी नौकांच्या सहाय्याने टेहळणी करण्यात येत आहे.
सुरु असलेल्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून, द्वारका अपार्टमेंटमधून, काही अडकलेल्या लोकांची यशस्वीरित्या सुटका करण्यात आली.  रहिवाशांच्या सुरक्षिततेसाठी मोठ्या प्रमाणात पाणी साचलेल्या  निवासी इमारतींमध्ये आपत्कालीन निर्गमन व्यवस्था देखील तैनात केली गेली आहे.  आवश्यकतेनुसार मदत करण्यासाठी अतिरिक्त राखीव मदत तुकड्याही सज्ज ठेवण्यात आल्या आहेत.