साताऱ्याच्या छत्रपतींच्या गादीवर फुले पडतील, अशी भाकणूक आदमापुर येथील संत बाळूमामा देवस्थानचे गुरुमाऊली कृष्णात ढोणे यांनी केली, उदयनराजे भोसले यांनीही विसापूर बोबडेवाडी भागाला निधी कमी पडू देणार नाही, असे आश्वासन दिले.
सातारा/पुसेगाव : साताऱ्याच्या छत्रपतींच्या गादीवर फुले पडतील, अशी भाकणूक आदमापुर येथील संत बाळूमामा देवस्थानचे गुरुमाऊली कृष्णात ढोणे यांनी केली, उदयनराजे भोसले यांनीही विसापूर बोबडेवाडी भागाला निधी कमी पडू देणार नाही, असे आश्वासन दिले.
बोबडेवाडी (विसापूर) संत बाळूमामा यांच्या मंदिरात आयोजित केलेल्या मूर्ती प्राणप्रतिष्ठापना आणि कलशारोहण सोहळ्यासाठी महायुतीचे लोकसभा उमेदवार उदयनराजे भोसले, आमदार महेश शिंदे यांनी विशेष उपस्थिती लावली.
याप्रसंगी उदयनराजेंच्या विजयाची भाकणूक करण्यात आली. संत बाळूमामाच्या हजारो भक्तांच्या साक्षीने ही भाकणूक झाली. आदमापूर येथील गुरुमाऊली कृष्णात ढोणे यांनी ही भाकणूक लावली आणि छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या विजयाची घोषणाच केली. याप्रसंगी उपस्थित असलेल्या हजारो भक्तगणांनी खासदार उदयनराजे भोसले यांच्या नावाचा जयघोष केला.
याप्रसंगी उदयनराजे भोसले म्हणाले, संत बाळूमामा यांच्या दर्शनाने मी धन्य झालो आहे. हजारो भक्तगणांच्या साक्षीने या परिसराच्या विकासाचे आश्वासन देतो.
आमदार महेश शिंदे म्हणाले, उदयनराजेंनी कृष्णा खोरे महामंडळाचा पाया रचला आहे. या दुष्काळी भागातील जी पाणी योजनेची कामे पूर्ण झाली, ती त्यांच्याच मार्गदर्शनाखाली झालेली आहेत. त्यामुळे या लोकसभा निवडणुकीत उदयनराजेंच्या हात बळकट करा.
साताऱ्याच्या माजी उपनगराध्यक्ष दिपाली गोडसे म्हणाल्या, मी विसापूर गावची माहेरवाशीण आहे. संत बाळूमामा मंदिरात जे भाकित होते, ते सत्य झालेले आहे. या भागासाठी मी जी कामे महाराजांकडे मागितली, ती त्यांनी केलेली आहेत. विसापुर, बोबडेवाडी व बुधावलेवाडी या रस्त्याचे काम मंजूर करून घेण्यात आले आहे. आचारसंहिता संपताच हे काम सुरू होईल, येत्या ७ मे रोजी कमळ चिन्हा पुढील बटन दाबून उदयनमहाराजांना प्रचंड मतांनी विजयी करा असे आवाहन त्यांनी केले. यावेळी बाळूमामाच्या नावानं चांगभलं असा जयघोष करण्यात आला.