शोभेचे हत्ती निवडून देऊन उपयोग काय?
उदयनराजे भोसले यांचा सवाल; सातारा क्लब, शाहू स्टेडियम येथे संवाद दौरा
निवडून येणारे शोभेचे हत्ती अनेक असतात, पण जनतेला त्यांचा उपयोग काय? असा सवाल महायुतीचे लोकसभा उमेदवार उदयनराजे भोसले यांनी उपस्थित केला.
सातारा : एकेकाळी पश्चिम महाराष्ट्रातून मी एकमेव भाजपचा आमदार होतो. कृष्णा खोरे महामंडळाचा उपाध्यक्षही झालो. मात्र या पदाच्या माध्यमातून जिल्ह्यातील धरणांना मंजुरी मिळवली. जिल्ह्याच्या दुष्काळी भागात जे काही पाणी फिरत आहे ते मी त्या काळात घेतलेल्या निर्णयामुळे शक्य झाले, त्यानंतर माझ्या विरोधातील उमेदवाराकडेही जलसंपदा खाते होते त्यांनी केले काय? निवडून येणारे शोभेचे हत्ती अनेक असतात, पण जनतेला त्यांचा उपयोग काय? असा सवाल महायुतीचे लोकसभा उमेदवार उदयनराजे भोसले यांनी उपस्थित केला.
उदयनराजे यांनी बुधवारी सातारा शहरातील छत्रपती सातारा क्लब, मंडई या ठिकाणी भेट देऊन जनतेशी संवाद साधला. यावेळी बोलताना खा. उदयनराजे यांनी बळावर महायुतीच्या पाठीशी राहण्याचे आवाहन केले.
उदयनराजे पुढे म्हणाले, मी नेहमीच पुढील 25 वर्षांचा विचार करून ठोस विकास कामांवर भर दिला. यापुढेही त्याच पद्धतीने विकास कामे करून जिल्ह्यातील तरुणांचे महानगरांत होणारे विस्थापन थांबवणार आहे. सातारा एमआयडीसी मध्ये आयटी पार्कसाठी जागा मिळाली आहे. या ठिकाणी भविष्यात सुसज्ज असा आयटी पार्क उभारला जाईल. केसुर्डी, खंडाळा, लोणंद या ठिकाणी अद्ययावत एमआयडीसी उभी झाली. आता जागा उपलब्ध करून उद्योग व्यवसायच्या वृद्धीसाठी प्रयत्न करणार आहे. या उलट माझ्या विरोधातील उमेदवाराने दत्ता जाधव सारख्या गुंडाला पाठबळ देऊन एमआयडीसीतील उद्योगपतींना त्रास देण्याचे काम केले आहे, आणि वर सांगतात सोडून गेलेल्या उद्योजकांना विचारा कोण त्रास देतो,व्वा रे तुमचा खोटारडेपणा,असे उदयनराजे भोसले पुढे म्हणाले.
छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुलातील भेटीप्रसंगी सुरेश साधले, मनोज कान्हेरे, मयूर कांबळे, इर्शाद बागवान, रोहन गुजर, माजी नगरसेवक राम हादगे, माजी नगराध्यक्ष सुजाता राजेमहाडिक, माजी उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांची उपस्थिती होती. सातारा क्लब मध्ये सातारा रनर्स फाउंडेशनच्या वतिने डॉ. प्रतापराव गोळे, एडव्होकेट कमलेश पिसाळ, डॉ. चंद्रशेखर घोरपडे, अमर जाधव, विशाल ढाणे यांनी उदयनराजेंचे स्वागत केले.
कृष्णा नदी शुद्धीकरणावर भर
अशुद्ध पाण्यामुळे कॅन्सर सारखे गंभीर आजार होत आहेत. कृष्णा नदी उगमापासून संगमावर पर्यंत सातारा मतदारसंघातून वाहते. या नदीवरच अनेक शहरे आणि गावांच्या पाणी योजना आहेत. ही नदी अनेक कारणाने प्रदूषित झालेली आहे. त्यासाठी कृष्णा नदीच्या शुद्धीकरणाचे जय जय कृष्णे या उपक्रमा अंतर्गत केंद्र सरकारच्या माध्यमातून काम हाती घेण्यात येणार असल्याचे अभिवचन उदयनराजे भोसले यांनी दिले.