मोठी बातमी! देवेंद्र फडणवीसांची भाजपाच्या गटनेतेपदी एकमुखाने निवड, दुपारी सत्तास्थापनेचा दावा करणार
नव्या सरकार स्थापनेसाठी आज (4 डिसेंबर) मुंबईत राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. आज भाजपाची केंद्रीय निरीक्षकांच्या उपस्थितीत भाजपाची महत्त्वाची बैठक झाली.
नव्या सरकार स्थापनेसाठी आज (4 डिसेंबर) मुंबईत राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. आज भाजपाची केंद्रीय निरीक्षकांच्या उपस्थितीत भाजपाची महत्त्वाची बैठक झाली. त्यानंतर भाजपाच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत आमदारांनी देवेंद्र फडणवीस यांची विधिमंडळ गटनेतेपदी एकमुखाने निवड केली. या सर्व निवड प्रक्रियेनंतर आता देवेंद्र फडणवीस (Devenra Fadnavis) हेच राज्याचे नवे मुख्यमंत्री होणार हे आता स्पष्ट झाले आहे.
आधी भाजपाच्या कोअर कमिटीची बैठक
आज सकाळी दहा वाजेच्या सुमारास भाजपाच्या कोअर कमिटीची बैठक झाली. या बैठकीला केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन आणि भाजपाचे नेते विजय रूपानी हे केंद्रीय निरीक्षक म्हणून महाराष्ट्रात आले होते. त्यांच्या उपस्थित विधानभवनात भाजपाच्या कोअर कमिटीची ही बैठक झाली. या बैठकीत भाजपाच्या विधिमंडळ पक्षनेतेपदासाठी देवेंद्र फडणवीस यांचे नाव एकमताने ठरवण्यात आले. या बैठकीत भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, भाजपाचे नेते सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील आदी महत्त्वाचे नेते उपस्थित होते.
132 आमदार उपस्थित होते. तसेच भाजपाला पाठिंबा देणाऱ्या अपक्ष आमदारांचाही या बैठकीत समावेश होता. भाजपाच्या कोअर कमिटीच्या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर भाजपाच्या नेतेपदासाठी शिक्कामोर्तब झाल्यानंतर विधीमंडळ पक्षाच्या बैठकीतही देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा प्रस्ताव गटनेतेपदासाठी ठेवण्यात आला. या प्रस्तावाला सर्व आमदारांनी एकमताने अनुमोदन दिले.गटनेतेपदाची निवड नेमकी कशी झाली?
भाजपाच्या विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत चंद्रकांत पाटील आणि सुधीर मुनगंटीवर यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा विधिमडंळ गटनेतेपदाचा प्रस्ताव मांडला. या प्रस्तावाला पंकजा मुंडे यांनी अनुमोदन दिले. यासह प्रवीण दरेकर यांनीदेखील देवेंद्र फडणवीस यांच्या नावाच्या प्रस्तावाला अनुमोदन दिले. मेघना बोर्डीकर यांनीदेखील फडणवीस यांच्या नावाच्या प्रस्तावाला अनुमोदन दिले. योगेश सागर यांनीदेखील भाजपाच्या विधिमंडळ पक्षाच्या गटनेतेपदासाठी फडणवीस यांच्या नावाच्या प्रस्तावाला अनुमोदन दिले. गोपीचंद पडळकर, आशिष शेलार या नेत्यांनीही फडणवीस यांच्या नावाच्या प्रस्तावाला अनुमोदन दिले.
भाजपाच्या विधिमंडळ पक्षनेतेपदासाठी फडणवीस यांच्या रुपात फक्त एकच नाव समोर आल्याने त्यांचीच भाजपाच्या विधिमंडळ गटनेतेपदी निवड करण्यात आली. यावेळी रणधीर सावरकर यांनी विधिमंडळ पक्ष बैठकीचे संचालन केले. फडणवीसांच्या नावाला कोणीही विरोध न केल्यामुळे त्यांची भाजपाच्या गटनेतेपदी एकमताने निवड करण्यात आली.
आता राज्यपालांकडे सत्तास्थापनेसाठी दावा केला जाणार
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून राज्याचा मुख्यमंत्री कोण होणार? याची सर्वांनाच उत्सुकता लागली होती. मात्र आता फडणवीस यांची भाजपाच्या गटनेतेपदी निवड झाल्यानंतर फडणवीस हेच मुख्यमंत्रिपदी विराजमान होणार, हे आता जवळजवळ स्पष्ट झाले आहे. त्यानंतर आता मिळालेल्या माहितीनुसार आज दुपारी साडे तीन वाजता सत्तास्थापनेचा दावा केला जाणार आहे. त्यासाठी भाजपाचे गटनेते देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षाचे गटनेते एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादीचे अजित पवार हे तिघेही राज्यपालांची भेट घेतील. त्यानंतर या भेटीत राज्यात सत्तास्थापनेचा दावा करण्यासाठी राज्यपालांना पत्र दिले जाईल. त्यानंतर सत्तास्थापनेची प्रक्रिया चालू होईल.