चक्रीवादळ फेंगल :आज 'फेंगल' चक्रीवादळ धडकणार? 'या' राज्याला इशारा, अनेक जिल्ह्यांत शाळा बंद, वीज कपात
बंगालच्या उपसागरात तयार झालेले फेंगल चक्रीवादळ आज तामिळनाडूच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाकडून अलर्ट जारी
Cyclone Fengal: बंगालच्या उपसागरात तयार झालेले 'फेंगल' चक्रीवादळ बुधवार 27 नोव्हेंबर रोजी तामिळनाडूच्या (Tamilnadu) किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या काळात तामिळनाडूतील कुड्डालोर आणि मायिलादुथुराई या भागात अतिवृष्टीची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) चेन्नईसह अनेक जिल्ह्यांमध्ये यलो आणि रेड अलर्ट जारी केला आहे. चक्रीवादळामुळे किनारी भागात जोरदार वारे, तसेच मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याचीही शक्यता आहे.
शाळा, महाविद्यालये बंद, प्रशासन सतर्क
चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर चेन्नई, मायलादुथुराई, नागापट्टिनम आणि कुड्डालोर या जिल्ह्यांमध्ये शाळा-महाविद्यालये बंद करण्यात आली आहेत. या संदर्भात मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांनी मंगळवारी उच्चस्तरीय बैठक घेतली. सर्व जिल्ह्यांमध्ये एनडीआरएफ आणि स्थानिक मदत पथके तैनात करण्यात आली आहेत. मदत शिबिरे तैनात करण्यात आली आहेत. या मदत केंद्रांवर सार्वजनिक सुविधा पुरविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
तामिळनाडूच्या अनेक जिल्ह्यांत पावसाची शक्यता
हवामान खात्याने जारी केलेल्या अंदाजानुसार 27 नोव्हेंबर रोजी तामिळनाडूच्या किनारी जिल्ह्यांमध्ये मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. या चक्रीवादळ दरम्यान 65-75 किमी/तास वेगाने वारे वाहू शकतात. तर 28 नोव्हेंबरपर्यंत हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम आंध्र प्रदेश आणि कर्नाटकच्या किनारी भागातही दिसून येईल.
मच्छिमारांसाठी अलर्ट जारी
मच्छिमारांना 29 नोव्हेंबरपर्यंत समुद्रापासून दूर राहण्याच्या सक्त सूचना देण्यात आल्या आहेत. बंगालच्या उपसागरात आणि तमिळनाडूच्या किनारी भागात मासेमारीवर आधीच बंदी घालण्यात आली आहे. सागरी भागात तटरक्षक दलाची गस्त सुरू आहे. पश्चिम बंगाल आणि आंध्र प्रदेशच्या किनारी भागातील मच्छिमारांसाठी असाच इशारा जारी करण्यात आला आहे.