deshvidesh

पंतप्रधान मोदींनी सीमेवर साजरी केली दिवाळी


माझे सैनिक बांधव उभे आहेत, ती भूमी एखाद्या मंदिरापेक्षा कमी नाही, असे सांगत पंतप्रधान मोदींनी सीमेवरील जवानांबाबत गौरवोद्गार काढत त्यांच्यासमवेत दिवाळी साजरी केली. त्यांच्या उपस्थितीमुळे सीमेवरील अधिकारी-जवानांमध्येही आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते.

लेप्चा : माझे सैनिक बांधव उभे आहेत, ती भूमी एखाद्या मंदिरापेक्षा कमी नाही, असे सांगत पंतप्रधान मोदींनी सीमेवरील जवानांबाबत गौरवोद्गार काढत त्यांच्यासमवेत दिवाळी साजरी केली. त्यांच्या उपस्थितीमुळे सीमेवरील अधिकारी-जवानांमध्येही आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते.
संपूर्ण देशभरात दिवाळी साजरी होत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना दीपोत्सवाच्या शुभेच्छा दिल्यानंतर हिमाचल प्रदेश येथील लेप्चा येथे जाऊन जवानांसोबत दिवाळी साजरी केली. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी जवानांना संबोधित केले. दिवाळी साजरी करण्याचा असा अनुभव समाधान आणि आनंदाने भरून पावणारा आहे. दीपावलीचा नवा प्रकाश तुमच्यासह संपूर्ण देशवासीयांपर्यंत पोहोचेल, असा मला विश्वास आहे. सीमेवर तैनात असलेले जवान कोणत्याही आव्हानात्मक परिस्थितीला सामोरे जातात. भारतीय सैनिक हिमालयाप्रमाणे सीमेवर जोपर्यंत उभे आहेत, तोपर्यंत भारत सुरक्षित आहे. जवानांनी केलेल्या या सेवेमुळेच भारतीय भूमी सुरक्षित आणि समृद्धीच्या मार्गावर पुढे जात आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी यावेळी बोलताना नमूद केले.
आता यापुढे संकल्पही आपला असेल आणि तो साध्य करण्यासाठी लागणारी संसाधनेही आपली असतील. सीमेवर तैनात असलेल्या जवानांमुळेच देश सुरक्षित आहे, असे गौरवोद्गार काढत पंतप्रधान मोदी म्हणाले, भारताला मिळत असलेल्या यशाचे श्रेय सीमेवरील सैनिकांना आहे. गेल्या काही काळापासून भारताला जे यश मिळत आहे, त्याचे श्रेय सीमेवरील सैनिकांना आहे. सीमेवरील सैनिकांमुळे देश विकसित होण्याचे अधिकाधिक प्रयत्न केले जात आहेत. जिथे माझे सैनिक बांधव उभे आहेत, ती भूमी एखाद्या मंदिरापेक्षा कमी नाही. जिथे जवान उभे आहेत, तिथेच माझा उत्सव आहे, असेही ते म्हणाले. सीमेवरील सैनिकांना कुटुंबाची आठवण येणे स्वाभाविक आहे. पण तुमच्या चेहर्‍यावर ती उदासीनता दिसत नाही. तुम्ही उत्साहाने परिपूर्ण आहात. कारण देशातील 140 कोटी जनतेला तुम्ही तुमचे कुटुंब मानता. यासाठी देश तुमचा सदैव ऋणी राहील, असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.
आता संकल्पही आमचे असतील, संसाधनेही आमची असतील, आता धैर्य-शौर्यही आमचे असेल, शस्त्रेही आमची असतील. आता श्वास आणि विश्वासही आमचा असेल, प्रत्येक पाऊल आमचे असेल. खेळही आमचा असेल आणि विजयही आमचाच होईल. उंच पर्वत असो वा वाळवंट, विस्तीर्ण मैदाने असोत, आकाशात फडकणारा हा तिरंगा सदैव आमचा असेल, असा विश्वास पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केला.