1956 सालच्या मे महिन्यातली गोष्टी. भारत सरकारच्या पुरातत्व विभागाचं एक पथक अफगाणिस्तानात अभ्यासासाठी गेलं होतं.
काबूलमध्ये असताना या पथकाला एका असा शोध लागला, ज्यानं एका भारतीय देवतेच्या कहाणीमध्ये नवी आणि महत्त्वाची भर पडली.
काबूलमध्ये असताना या पथकाच्या सदस्यांना एका गणेशमूर्तीविषयी माहिती मिळाली होती. संगमरवरात घडवलेली ही मूर्ती विसाव्या शतकात काबूलपासून 70 किलोमीटर दूर असलेल्या गार्देझजवळ सापडली होती, असं त्यांना सांगण्यात आलं.
काबूलच्या दर्गाह पीर रतन नाथ इथे ही मूर्ती ठेवण्यात आली होती आणि शहरातले हिंदू रहिवासी तिची पूजाही केली जात होती.
कसा होता काबूलचा 'महाविनायक'?
अफगाणिस्तानात गेलेल्या 1956 सालच्या त्या पथकातल्या टी. एन रामचंद्रन आणि वाय. डी. शर्मा यां दोन पुरातत्व अधिकाऱ्यांनी या मूर्तीविषयीचा आपला अहवाल नवी दिल्लीत सादर केला होता.
त्यात या मूर्तीचं वर्णन आणि तिच्या खाली लिहिलेल्या शिलालेखातील मजकूराचाही समावेश आहे. पुढच्या काही वर्षांमध्येही अफगाणिस्तान आणि विशेषतः पूर्व अफगाणिस्तानवर संशोधन करणाऱ्या अनेक पुरातत्वशास्त्रज्ञांनी या मूर्तीविषयी लिहिलं आहे.
इतिहासकार आणि पुरातत्वशास्त्रज्ञ मधुकर केशव ढवळीकर या मूर्तीचं वर्णन करताना लिहितात, "ही मूर्ती म्हणजे इंडो-अफगाण शैलीचं उदाहरण आहे. कनिष्ठ दर्जाच्या संगमरवरी दगडापासून बनवलेली ही मूर्ती 24 इंच उंच आणि 14 इंच रूंद आहे."
या मूर्तीमध्ये देवता उभी राहिली आहे. तिचं मस्तक हत्तीचं आहे आणि सोंड तुटली असली तरी ती डावीकडे वळल्याचं दिसून येतं. या देवतेला चार भूजा आहेत, पण त्याही भंगलेल्या अवस्थेत आहेत.
त्यानं कंबरेला वाघाचं कातडं बांधलं आहे तर गळ्यात साप जानव्यासारखा परिधान केला आहे.
मूर्तीचं पोट मोठं आहे, जे 'लंबोदर' या गणपतीच्या वर्णनासारखंच आहे. पीळदार दंड आणि खांद्यांचा आकार इंडो-ग्रीक शैलीचा प्रभाव दाखवतो. तर त्यानं परिधान केलेला मुकुट पर्शियन (इराणी) शैलीतला म्हणजे रिबिनीनं बांधला जाणारा आहे.
त्यामुळेच ही मूर्ती म्हणजे पुरातत्वशास्त्रज्ञ आणि कलाइतिहासकारांना महत्त्वाची वाटते. कारण ती भारतीय, गांधार (इंडो-ग्रीक) आणि पर्शियन संस्कृतींच्या मिलाफाचं प्रतीक आहे.
काबूलच्या महाविनायकाची मूर्ती किती जुनी?
ही मूर्ती कोणत्या देवतेची आहे, हे कसं स्पष्ट झालं? तर या मूर्तीच्या खालच्या भागात दोन ओळींचा एक शिलालेख आहे. इतिहासकार आणि शिलालेखांचे अभ्यासक डीसी सिरकार यांनी त्याचा अभ्यास केला होता.
ते लिहितात की, हा शिलालेख संस्कृत भाषेत आणि ब्राह्मी सिद्धमात्रिका लिपीत लिहिलेला आहे. त्यात काही व्याकरणाच्या चुकाही आहेत आणि काही शब्दांचा अर्थ फोटोंवरून लावणं कठीण जातं.
पण या शिलालेखाचा सारांश काहीसा असा आहे: 'महाराजाधिराज शाही खिगल याने त्याच्या राज्याच्या आठव्या वर्षी महाज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षातील त्रयोदशीला विशाखा नक्षत्रावर, सिंह लग्न असताना या महाविनायकाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली.'
हा खिंगल राजा नेमका कोण, याविषयी मात्र पुरातत्वशास्त्रज्ञांमध्ये एकमत नाही. कारण या प्रदेशात हे नाव धारण करणारे किमान दोन राजे पाचव्या आणि सहाव्या शतकात होऊन गेल्याचे पुरावे आहेत. त्या काळात इथे हूणांचं राज्य होतं.
मूर्तीची शिल्पशैली आणि लिपी यांचा विचार करता ती पाचव्या ते सहाव्या शतकातील असावी असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. एम.के. ढवळीकर यांच्या मते ही मूर्ती पाचव्या शतकाच्या उत्तरार्धातली असावी.
पण काबूलमध्ये पुरातत्वशास्त्रज्ञांना केवळ एकच मूर्ती सापडली नव्हती. 1956 साली सादर झालेल्या अहवालात आणखी एका मूर्तीचा उल्लेख आहे.
काबूलच्या उत्तरेला दहा मैलांवर सकर धर (शंकर धर) इथे ही दुसरी मूर्ती सापडली होती आणि ती काबूलच्या राष्ट्रीय संग्रहालयात आणण्यात आली होती. ती चौथ्या शतकाच्या मध्यातली असावी असा अंदाज ढवळीकरांनी व्यक्त केला आहे.
काबूलच्या गणपतीचं पुढे काय झालं?
सकर धर आणि गार्देझ गणेशमूर्तींची कहाणी शोधताना माझ्या मनात एक प्रश्न राहून राहून येत होता. या मूर्ती आज कुठे असतील?
दुर्दैवानं त्याविषयी ठोस माहिती कुठेच उपलब्ध नाही. अफगाणिस्तानावर सोव्हिएत आक्रमणानंतर गार्देझची मूर्ती काबूलमधील राष्ट्रीय संग्रहालयात हलवण्यात आल्याचे उल्लेख आहेत.
पण 1996 नंतर तालिबान राजवटीत या संग्रहालयाची नासधूस झाली होती, अनेक मूर्ती नष्ट झाल्या किंवा चोरीला गेल्या. त्यामुळे आता या मूर्तीच्या केवळ फोटोंवरच समाधान मानावं लागतं.
गणपतीच्या सर्वात प्राचीन मूर्ती किंवा प्रतिमांमध्ये या मूर्तींचा समावेश केला जातो. आज भारताच्या बाकीच्या भागात ज्या रूपातील गणपतीची पूजा केली जाते, त्यापेक्षा या प्रतिमा काहींना वेगळ्या वाटू शकतात.
साहजिकच प्रश्न उभा राहतो, भारतातून गणपती तिथे गेला, की गणेशपूजेची प्रथा तिथून भारतात आली?
गणपतीच्या पूजेची सुरुवात कुठे झाली, याचं नेमकं उत्तर देता येणार नाही. पण त्याच्या उपासनेचं रूप कसं बदलत गेलं, याचे पुरावे धार्मिक ग्रंथांमध्येच सापडतात.
गणपतीचं रूप कसं बदलत गेलं?
गणपतीच्या आरतीनंतर जे देवे म्हटले जातात, त्यातले मंत्र म्हणजे ऋग्वेदातल्या काही ऋचा आहेत. साधारणपणे देवे म्हणताना पहिला जो मंत्र उच्चारला जातो, त्यात गणपतीचा उल्लेख आहे. 'गणानां त्वां गणपतिं हवामहे' हा तो मंत्र तुम्हीही कधीतरी ऐकला असेल.
पण ऋग्वेदात उल्लेख झालेला हा गणपती म्हणजे हत्तीचं मस्तक असलेला आजचा गजानन नाही, तर बृहस्पती ही देवता आहे.
ऋग्वेदात प्रामुख्यानं कुबेर, इंद्र, अग्नी अशा देवांची वर्णनं आहेत. पण ऋग्वेदानंतरच्या काळातील ग्रंथांमध्ये अनेक देवतांचे उल्लेख येतात.
इसवीसनपूर्व पाचव्या शतकात लिहिलेल्या धार्मिक विधींविषयीच्या 'मानवगृह्यसूत्र' या ग्रंथात चार विनायकांचा उल्लेख आहे. हस्तीमुख, वक्रतुंड, दातिन, लंबोदर अशा चार विनायकांचंच पुढे एका विनायकात रूपांतर झालेलं दिसून येतं, असा अंदाज अनेक अभ्यासकांनी मांडला आहे.
गणपतीच्या वर्णनांत आणि गुणांमध्येही बदल होत गेले, याकडेही जाणकार लक्ष वेधून घेतात.
पुरातत्वशास्त्रज्ञ आणि मानववंशशास्त्राचे अभ्यासक कुरुश एफ दलाल सांगतात, "आरंभीच्या काळातला गणपती विघ्नहर्ता नाही, विघ्नकर्ता आहे. त्याला भाव दिला नाही, तर तो तुमची वाट लावेल, म्हणून आधी त्याला प्रसन्न करायला हवे. पण काळाबरोबर हळूहळू गणपतीचं रूप बदलत गेलं."
गणपतीच्या रूपात आणि त्याच्या पूजेच्या पद्धतींमध्ये कसा बदल होत गेला, याविषयी लेखक आणि पुराणकथांचे अभ्यासक देवदत्त पटनायक यांनी 99 Thoughts on Ganesha या पुस्तकात लिहलं आहे.
पटनायक सांगतात की आधी हिंदू लोक यज्ञ करायचे, मंत्र म्हणून देवांना आवाहन करायचे आणि आगीत हवीर्भाग अर्पण करायचे. पण हळूहळू उपासनेचा नवा मार्ग, म्हणजे मूर्तीची पूजा सर्वसामान्यांमध्ये लोकप्रिय होऊ लागला.
"इसवीसनपूर्व 326मध्ये अलेक्झांडरनं (सिकंदर) भारतावर आक्रमण केलं आणि त्यानंतर काही वर्षांत मौर्य साम्राज्याचा देशभर विस्तार झाला. या काळातील अनेक इंडो-ग्रीक नाण्यांवर हत्तीच्या किंवा हत्तीसदृष्य प्रतिमा कोरलेल्या दिसून येतात. त्यामुळे अनेकांना ग्रीक संस्कृतीच्या प्रभावातून गणेशाची मूर्ती आकाराला आली असावी, असं वाटतं."
पटनायक पुढे लिहितात की भारतात येण्याआधी ग्रीकांनी इजिप्तवर ताबा मिळवला होता, आणि इजिप्तमध्ये अशा मानवी शरीर आणि प्राण्याचं धड असलेल्या देवतांच्या अनेक प्रतिमा आढळून येतात. या मिश्र प्रभावातून हत्तीचं मस्तक असलेल्या देवतेची पूजा सुरू झाली असावी.
"पुढे रोमन साम्राजाच्या काळात व्यापारामुळे तेही भारताच्या संपर्कात आले. रोमनांची देवता जानस आणि गणपती यांच्या गुणधर्मांमध्येही बरंच साम्य आहे. विघ्न आणि बदलाचं ते प्रतीक आहेत.
"ग्रीक, रोमन आणि इजिप्शियन देवतांचा भारतीय विचारांवर आणि गणेशाच्या संकल्पनेवर परिणाम झाला की नाही याचा केवळ अंदाजच लावू शकतो." असं पटनायक सांगतात.
आठव्या शतकात शंकराचार्यांच्या काळात हिंदू धर्मात अनेक बदल झाले आणि शिव, शक्ती, वैष्णव, सूर्य आणि गणेश या पाच पंथांचा प्रभाव दिसून येऊ लागला.
दहाव्या शतकापासून गणपत्य पंथांचा प्रसार वाढत जाताना दिसतो.
कुरुश दलाल सांगतात, विशेषतः पश्चिम आणि दक्षिण भारतात गणपतीची मंदिरं उभी राहिली आणि या देवतेचं रूप आणखी बदलत गेलं. गणपतीही सात्विक झाला. महाराष्ट्रात तो पेशव्यांचा आणि ब्राह्मणांचा मुख्य देव झाला आणि शिव-पार्वतीचा मुलगा व्हेजिटेरियनही झाला."
गणपती आणि संस्कृतींचा मिलाफ
बौद्ध धर्माच्या काही पंथांत विशेषतः तिबेटातील वज्रयान पंथातही विनायकाचे उल्लेख विघ्नकर्ता म्हणूनच येतात आणि त्याच्यावर बोधिसत्व अवलोकितेश्वरानं मिळवलेल्या विजयाच्या कहाण्याही आहेत. बौद्ध धर्मासोबत ही देवता पूर्वेकडील देशांमध्ये, अगदी जपानमध्येही पोहोचली आहे.
गणेशोत्सव: जपानमधल्या 'गणपती'ची गोष्ट, जिथे 'कांगितेन'ची होते पूजा
गणेशाच्या ठायी संस्कृतीचा हा मिलाफ अभ्यासकांना विशेष महत्त्वाचा वाटतो. त्याविषयीच आम्ही इतिहासाचे अभ्यासक आनंद कानिटकर यांच्याशी बातचीत केली. कानिटकर प्रदाय हेरिटेज मॅनेजमेंट सर्व्हिसेसचे संचालक आहेत आणि त्यांनी अफगाणिस्तानच्या बामियान आणि हेरातमध्ये युनेस्कोसाठी प्रकल्पांवर कामही केलं आहे.
ते सांगतात, "भारताचा इतिहास बघताना, नेहमी हे लक्षात घेतलं पाहिजे, की तेव्हा आतासारख्या सीमारेषा नव्हत्या. मगधपासून गांधारमधील तक्षशिला हा भाग व्यापारीमार्गांनी आधीपासून जोडलेला होता. गांधारपासून उत्तर अफगाणिस्तानातील बाल्खपर्यंतचा प्रदेशही व्यापारीमार्गांनी जोडलेला होता. काही वेळा हा भाग एका अंमलाखालीही आला होता. त्यामुळे तिथे भारतीय संस्कृतीच्या खाणाखुणा सापडणं ही आश्चर्याची गोष्ट नाही.बाल्खपासून ते पाटलिपुत्रपर्यंत राज्य करणाऱ्या कुशाण राजांच्या नाण्यांवर इराणी, भारतीय आणि ग्रीक देवताही दिसून येतात याकडे त्यांनी लक्ष वेधलं आहे."प्राचीन इतिहास पाहिल्यावर असं दिसून येतं, की कुठलीही गोष्ट 'वॉटरटाईट' कप्प्यांमध्ये विभागलेली नव्हती. अफगाणिस्तानात तर पश्चिमेकडून येणारी इराणी संस्कृती, स्थानिक ग्रीक राजांमुळे आलेली ग्रीक संस्कृती, उत्तरेतून येणारी मध्य आशियाई संस्कृती आणि आग्नेयेकडून येणारी भारतीय संस्कृती या प्रवाहांचा संगम झाल्याचं दिसून येतं.त्यामुळे गार्देज मधील या गणेश मूर्तीवर ग्रीक आणि इराणी प्रभाव दिसून येतात.