जेडा पिंकेट स्मिथची खिल्ली उडवल्यानंतर काहीच वेळात 'किंग रिचर्ड' मधील आपल्या भूमिकेसाठी विल स्मिथला बेस्ट ॲक्टरचा अवॉर्ड जाहीर झाला. याचदरम्यान मंचावर जात स्मिथने ख्रिस रॉकला कानशिलात लगावली.
हॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता विल स्मिथनं (Actor Will Smith) ॲकडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट अँड सायन्सेसच्या सदस्यत्त्वाचा त्याग करत राजीनामा दिला आहे. ऑस्कर पुरस्कार सोहळ्याचा सूत्रसंचालक ख्रिस रॉकला (Chris Rock) कानाखाली मारल्याचं प्रकरण बॉलिवूडपर्यंत गाजलं होतं या प्रकरणामुळे मोठा वाद निर्माण झाला होता.वाद निर्माण झाल्याकारणानं अभिनेता विल स्मिथनं ॲकडमीचा राजीनामा देण्याचं मोठं पाऊल उचललं आहे. शुक्रवारी विल स्मिथनं राजीनामा दिल्यानंतर पुन्हा एकदा माफी मागितली आहे. ” बदल घडायला वेळ लागतो आणि माझ्याकडून जी चूक झाली ती सुधारायला, त्यात बदल करायला मी तयार आहे. जेणेकरून माझ्याकडून हिंसेला कधीही प्रोत्साहन दिलं जाणार नाही,” असं स्मिथने आपल्या माफीनाम्यात म्हटलं आहे.
विल स्मिथनं आपल्या माफीनाम्यात म्हटलंय,”ॲकडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट अँड सायन्सेसच्या सदस्यत्त्वाचा राजीनामा देत आहे. यानंतर बोर्डाकडून जो निर्णय घेण्यात येईल तो मला मान्य आहे. 94 व्या ॲकडमी अवॉर्ड्सच्या दरम्यान माझ्याकडून जे काही कृत्य घडलं ते अत्यंत निंदनीय आणि अक्षम्य होतं. ज्या लोकांना माझ्या या कृत्यामुळे त्रास झाला त्यांची यादी मोठी आहे. त्यात ख्रिस, त्याचा परिवार, माझे अनेक मित्र याशिवाय माझे अनेक चाहते यांचा देखील यात समावेश आहे.
विलचा राजीनामा स्वीकार
स्मिथचा राजीनामा स्वीकार करण्यात आला आहे, असं फिल्म ॲकडमीचे अध्यक्ष डेव्हिड रुबिनने स्पष्ट केलं आहे. ॲकडमीच्या नियमांचं उल्लंघन करण्यात आल्यामुळे स्मिथ यांच्या विरोधात कारवाई करण्यात आली आहे. यासंदर्भातली पुढील बैठक 18 एप्रिलच्या आधी आहे.
विल स्मिथला बेस्ट ॲक्टरचा अवॉर्ड
ऑस्करच्या पुरस्कार सोहळ्यात विल स्मिथची पत्नी जेडा पिंकेट स्मिथची तिच्या केसांवरून ख्रिस रॉकने खिल्ली उडवली. जेडा केसांच्या आजारावरून त्रस्त आहे. या आजारामुळे तिला आपले सर्व केस गमवावे लागले आहेत. खिल्ली उडवल्यानंतर काहीच वेळात ‘किंग रिचर्ड’ मधील आपल्या भूमिकेसाठी विल स्मिथला बेस्ट ॲक्टरचा अवॉर्ड जाहीर झाला. याचदरम्यान मंचावर जात स्मिथने ख्रिस रॉकला कानशिलात लगावली होती.