समाजवादी पक्षाचे संस्थापक आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव यांचे निधन झाले आहे. दिल्लीच्या मेदांता रुग्णालयात त्यांनी ८ वाजून १६ मिनिटांनी अखेरचा श्वास घेतला. ते ८२ वर्षांचे होते.
नवी दिल्ली : समाजवादी पक्षाचे संस्थापक आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव यांचे निधन झाले आहे. दिल्लीच्या मेदांता रुग्णालयात त्यांनी ८ वाजून १६ मिनिटांनी अखेरचा श्वास घेतला. ते ८२ वर्षांचे होते. २२ ऑगस्ट रोजी मुलायम सिंह यादव यांना रक्तदाबाच्या समस्येमुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेव्हापासून मुलायमसिंह यांची प्रकृती सातत्याने खालावत गेली आणि आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. उत्तर प्रदेशात त्यांना नेताजी या नावानं ओळखले जात असे. मुलायम सिंह यादव यंनी समाजवादी पार्टीची स्थापना केली होती. २०१९ मध्ये ते मैनपुरी लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले होते. मुलायम सिंह यांच्या पत्नी साधना गुप्ता यांचं जुलै महिन्यात निधन झालं होतं. तर, पहिल्या पत्नी मालती देवी यांचं २००३ मध्ये निधन झालं होतं.
मुलायम सिंह यादव यांचा जन्म २२ नोव्हेंबर १९३९ रोजी झाला होता. मुलायम सिंह हे तरुणपणी कुस्ती खेळायचे. त्यांनी काही काळ कुस्तीचे मैदानही गाजवले. यानंतर मुलायमसिंह यादव यांनी काहीकाळ प्राध्यापक म्हणून काम केले. यानंतर आपले राजकीय गुरू नत्थू सिंह यांच्या सानिध्यात आल्यानंतर मुलायमसिंह यादव यांनी जसवंतनगर विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात पहिले पाऊल ठेवले. १९६७ साली ते पहिल्यांदा आमदार झाले. १९८२ ते १९८५ या काळात ते विधानपरिषदेचे सदस्य होते.
मुलायम सिंह यादव हे लोहिया आंदोलनात हिरीरीने सहभागी झालेल्या तरुण नेत्यांपैकी एक होते. ४ ऑक्टोबर १९९२ रोजी मुलायम सिंह यादव यांनी समाजवादी पक्षाची स्थापना केली. त्यानंतर मुलायम सिंह यादव आपल्या प्रतिस्पर्ध्यांना एकापाठोपाठ एक करून धूळ चारत गेले. ते आठवेळा उत्तर प्रदेश विधानसभेवर निवडून गेले होते. मुलायम सिंह यादव यांना तीनवेळा उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी बसण्याचा मान मिळाला. तसेच त्यांनी केंद्र सरकारमध्ये संरक्षण खात्यासारख्या अत्यंत महत्त्वाच्या खात्याचे मंत्रिपद भुषविले होते.
मुलायम सिंग यादव यांचं नेतृत्व जेपी यांच्या चळवळीतून पुढे आलं होतं. कायम जमिनीशी नाळ असणारा नेता अशी त्यांची ओळख राहिली. समाजातील मागास जातींना सोबत घेऊन त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याची त्यांची उर्मी वादातीत राहिली. कायम आंदोलनाच्या माध्यमातून सरकारी पक्षाला जाब विचारणे आणि मागास जातींना न्याय मिळवून देण्याचे काम नेताजींनी केलं. त्यांच्या जाण्याने उत्तर प्रदेशच नव्हे तर देशातील समाजवादी चळवळीवर मोठा आघात झाल्याची भावना आज व्यक्त होत आहे.
खंबीर संरक्षणमंत्री
आज भारत आणि चीन हा सीमावाद मोठ्या जोरदारपणे लढला जात असताना मुलायम सिंग यादव यांचा संरक्षण मंत्रीपदाचा कार्यकाळ कायम लक्षात राहण्यासारखा आहे. कारण ज्यावेळी मुलायम सिंग यादव संरक्षण मंत्री होते त्यावेळी त्यांनी कायम चीनच्या वाढत्या धोक्याची जाणीव करून दिली. मुलायमसिंग यादव दूरदृष्टी नेते होते. पाकिस्तान आपला शत्रू आहेत पण चीनला वेळीच रोखलं पाहिजे हे त्यांनी काही दशकाअगोदरच ओळखलं होतं.
मुलायम सिंग यादव यांचा राजकीय प्रवास
१९७७ मध्ये पहिल्यांदा यूपी सरकारमध्ये मंत्री
१९८० जनता दल यूपीचे अध्यक्ष
१९९६ पहिल्यांदा लोकसभा खासदार
१९९६ ते १९९८ संरक्षणमंत्री
तीन वेळा यूपीचे मुख्यमंत्री
१) ५ डिसेंबर १९८९ ते २४ जून १९९१
२) ४ डिसेंबर १९९३ ते ३ जानेवारी १९९५
३) २९ ऑगस्ट २००३ ते १३ मे २००७