महाराष्ट्राचा लौकिक साताऱ्यातून वाढवण्याचे काम करा!
शशिकांत शिंदे यांना निवडून देण्याचे शरद पवार यांचे आवाहन
यशवंत विचार हा महाराष्ट्र आणि संपूर्ण देशाला दिलेला विचार आहे. साताऱ्यातून नेहमीच गौरवास्पद चळवळी आणि विचार पुढे आले आहेत. हाच गौरव कायम ठेवून श्रमिक कष्टकऱ्यांसाठी झटणाऱ्या शशिकांत शिंदे यांना दिल्लीत पाठवून महाराष्ट्राचा लौकिक वाढवा. याची सुरुवात साताऱ्यातून करा, असे आवाहन ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सातारा येथील सभेत केले.
सातारा : यशवंत विचार हा महाराष्ट्र आणि संपूर्ण देशाला दिलेला विचार आहे. साताऱ्यातून नेहमीच गौरवास्पद चळवळी आणि विचार पुढे आले आहेत. हाच गौरव कायम ठेवून श्रमिक कष्टकऱ्यांसाठी झटणाऱ्या शशिकांत शिंदे यांना दिल्लीत पाठवून महाराष्ट्राचा लौकिक वाढवा. याची सुरुवात साताऱ्यातून करा, असे आवाहन ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सातारा येथील सभेत केले.
महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांच्या प्रचारार्थ जिल्हा परिषदेच्या मैदानावर आयोजित सभेत शरद पवार बोलत होते. यावेळी आम आदमी पार्टीचे खासदार संजय सिंह, श्रीनिवास पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, फौजीया खान, माजी मंत्री अनिल देशमुख, राजेश टोपे, सचिन अहीर, आमदार बाळासाहेब पाटील, उमेदवार शशिकांत शिंदे यांच्यासह महाविकास आघाडीतील घटक पक्षातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
पवार म्हणाले, ही ऐतिहासिक सभा आहे. देशात सध्या संघर्षाची स्थिती आहे. त्याला सामोरे जावे लागणार आहे. मोदी काही सांगत असले तरी देशावर संकट आले आहे. देशाची चार हजार किलोमीटर जमीन चीनने ताब्यात घेतली आहे. या भागाचा माझा अभ्यास आहे. संरक्षण मंत्री असताना चीनच्या सीमेची मी प्रत्यक्ष पाहणी केली होती. धोका कुठून होईल याचे सर्वेक्षण करून काय काळजी घ्यायची, याचा अहवाल केला होता. परंतु मोदींनी काळजी घेतली नाही. त्यामुळे हजारो एकर जमीन चीनने बळकावली आहे. त्यामुळे तुमची, माझी जमीन जो घालवतो त्याला देशाची सत्ता द्यायची का, याचा निकाल घेण्याची ही निवडणूक आहे. महागाई कमी करू, शेतकऱ्यांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उत्पादन खर्चाचा विचार करून मालाची योग्य किंमत देऊ असे आश्वासन मोदींनी दिले होते. परंतु तो शब्द त्यांनी पाळला नाही.
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, पाच वर्षांपूर्वी उदयनराजेंच्या विरोधात शरद पवार यांनी पावसात अशी सभा घेतली होती. तुम्ही ९० हजार मतांनी त्या उमेदवारांचा पराभव केला होता. तेव्हा दोन पक्षांची आघाडी होती. आता तीन पक्षांची आहे. सहा विधानसभा मतदारसंघात स्पर्धा आहे. सर्वाधिक मताधिक्य कोण देणार? आपले मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आश्वासनांची खैरात करत आहेत. मंत्री करतो, राज्यसभेचा खासदार करतो म्हणतात. परंतु फार उशीर झाला आहे. मतदारसंघातील जनतेने कधीच निर्णय घेतला आहे. गद्दारांना जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही.
शशिकांत शिंदे म्हणाले, सामान्य मावळ्याला लढायची धमक तुम्ही दिली आहे. शरद पवारांनी माथाडी कामगारांच्या मुलाला पाच वेळा आमदार व एकदा मंत्री केले. हा संघर्षाचा काळ आहे आणि त्यांच्या मागे खंबीरपणे उभा राहुल भूमिका घेणारा मी कार्यकर्ता आहे. माझ्यावर टीका सहन करतो, पण शरद पवार यांच्यावर बोललेले सहन होणार नाही. पक्षाच्या अनेक नेत्यांचा विरोध असताना मी उदयनराजेंना समर्थन करत होतो. प्रचाराची धुरा अंगावर घेतली. मदत केलेल्याची जाणीव ठेवली पाहिजे. आम्ही नेहमीच गादीचा मान ठेवला आहे. पक्ष बदलाच्या वेळी त्यांना राज्याचे नेतृत्व करा, असे पवारांनी सांगितले होते. पण त्यांनी पक्ष सोडला. त्यामुळे छत्रपतींचा खरा मावळा मला साथ देऊन यावेळी इतिहास घडवेल. दोन-चार दिवसात बऱ्याच घडामोडी होतील. जागृत राहूया, एकीने उभे राहू. दमबाजी सुरू आहे, परंतु क्रांति उभी करायची असेल तर दबावाला झुकू नका. मतांसाठी बाहेर पडा. यावेळी पाऊस नाही असे काही म्हणतात. परंतु जनता आता मतांचा पाऊस पाडेल, असे ते म्हणाले.
यावेळी रकुल कार्तिकेय पार्वती महादेव यांनी हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत, संतोष जाधव यांनी शक्ती प्रदर्शन करत शशिकांत शिंदे यांना पाठिंबा दिला.