जिल्ह्याच्या विविध भागाला आज मान्सूनपूर्व पावसाने जोरदार तडाखा दिला. अनेक ठिकाणी मुसळधार पावसामुळे ओढे-नाले भरून वाहिले. उंब्रजजवळील चोरे येथे घरात पाणी शिरले तर मांडवे येथे ओढ्याला आलेल्या पुरात महिला वाहून गेली.
नागठाणे / उंब्रज ः जिल्ह्याच्या विविध भागाला आज मान्सूनपूर्व पावसाने जोरदार तडाखा दिला. अनेक ठिकाणी मुसळधार पावसामुळे ओढे-नाले भरून वाहिले. उंब्रजजवळील चोरे येथे घरात पाणी शिरले तर मांडवे येथे ओढ्याला आलेल्या पुरात महिला वाहून गेली.
नागठाणे : मांडवे (ता. सातारा) येथे ओढ्याला आलेल्या पुरात मधुमती सुधाकर माने (वय 65) या वाहून गेल्या. माजी सरपंच राजेंद्र माने यांच्या त्या मातोश्री होत. गुरे घेऊन त्या गावालगत असलेल्या माकडजाई पायथा या शिवार परिसरात गेल्या होत्या. सायंकाळी परिसरात जोरदार पावसाला सुरूवात झाली. त्यानंतर घरी परतत असताना ओढ्याला आलेल्या पुरात त्या वाहून गेल्या. गावालगत त्यांचा मृतदेह ग्रामस्थांना ओढ्याकाठी असलेल्या झुडूपात आढळला..
उंब्रज : उंब्रज सह परीसरात शनिवारी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास मान्सूनपूर्व पावसाने सुमारे दिड तास दमदार हजेरी लावल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. तर अनेक ठिकाणी शेतात पाणी साचण्याबरोबरच शेतातील ताली वाहून गेल्या असून ओढे, नाले पाण्याने तुडुंब भरून वाहत आहेत.
सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास उंब्रज, पाल, पेरले, चोरे, इंदोली, शिवडे, चरेगांव सह परीसरात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. सुमारे दीड तास झालेल्या मुसळधार पावसाने शेतात पाणी साचून तळे झाले होते. तर अनेक ठिकाणी मुसळधार पावसाने शेतातील ताली वाहून गेल्या आहेत. ओढे नाले पाण्याने तुडुंब भरून वाहत होते. चोरे येथे मंदिरानजीक असलेल्या दोन ते तीन घरामध्ये पावसाचे पाणी शिरल्याने जीवनावश्यक वस्तूंचे नुकसान झाले आहे.
तर उंब्रज येथील सबवे मध्ये पाण्याचे तळे निर्माण झाले होते. तर सर्व्हिस रोड लगत असलेली गटारे घाणीने तुडुंब भरल्याने पावसाचे पाणी रस्त्यावरून वहात होते.