पुसेगावमध्ये ‘कंटेन्मेंट झोन’ राहिले फक्त नावालाच
नागरिकांकडून प्रशासनाच्या नियमांचे तीनतेरा; प्रशासनाचेही अक्षम्य दुर्लक्ष
कोरोनाबाधित रुग्ण सापडलेला भाग प्रशासनाकडून सील करून तो ‘कंटेन्मेंट झोन’ (प्रतिबंधित क्षेत्र) म्हणून जाहीर करण्यात येतो. मात्र, या ‘कंटेन्मेंट झोन’चे गांभीर्यच नागरिकांच्या लक्षात येत नसून पुसेगाव (ता. खटाव) येथील कोरोनाबाधित रुग्ण सापडलेल्या भागात लावण्यात आलेले कळक, बॅरिकेटस् बाजूला सारून नागरिकांची ये-जा सर्रास सुरू असल्याचे चित्र गावात बहुतांशी ठिकाणी दिसून येत आहे.
पुसेगाव : कोरोनाबाधित रुग्ण सापडलेला भाग प्रशासनाकडून सील करून तो ‘कंटेन्मेंट झोन’ (प्रतिबंधित क्षेत्र) म्हणून जाहीर करण्यात येतो. मात्र, या ‘कंटेन्मेंट झोन’चे गांभीर्यच नागरिकांच्या लक्षात येत नसून पुसेगाव (ता. खटाव) येथील कोरोनाबाधित रुग्ण सापडलेल्या भागात लावण्यात आलेले कळक, बॅरिकेटस् बाजूला सारून नागरिकांची ये-जा सर्रास सुरू असल्याचे चित्र गावात बहुतांशी ठिकाणी दिसून येत आहे.
पुसेगाव येथील भवानीनगर, बेघर वस्ती, कुंभार टेक या भागात कोरोनाबाधित आढळून आल्याने हे भाग ‘कंटेन्मेंट झोन’ म्हणून सील करण्यात आले आहेत. मात्र, कळक, बॅरिकेटस् लावून सील केलेल्या विशिष्ट भागापुढे ‘कंटन्मेंट झोन’चे नियम व सूचनांचे पालन नागरिक करतात की नाही याची शहानिशा अथवा त्यावर कोणतेही नियंत्रण ठेवणारी यंत्रणा सध्या कार्यरत नाही. परिणामी, या भागातील नागरिकांची तसेच तेथे जाणार्या नागरिकांची सर्रास ये-जा सुरू आहे.
घोळक्याने एकत्र येणे, गाड्या पार्क करून गप्पा मारणे, शारीरिक अंतराच्या नियमांचे पालन न करणे, मास्कचा वापर न करणे, कोठेही थुंकणे आदी प्रकार या भागात वारेमाप सुरू आहेत. यामुळे पुसेगावमधील हे सर्व ‘कंटेन्मेंट झोन’ नावालाच राहिले असल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे.