ट्रकमालकाच्या अपघाती मृत्यूबद्दल तब्बल 1.15 कोटींची नुकसान भरपाई
जिल्हा न्यायालयाचा आदेश : समोरील ट्रकचा टायरचा फुटून झाला होता अपघात
ट्रकचा टायर फुटल्याने त्याची धडक समोरून येणार्या कंटेनरला बसली होती. या अपघातात कंटेनर चालवत असणार्या ट्रकमालकाचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी जिल्हा न्यायालयाने मयत ट्रकमालकाच्या वारसांना तब्बल 1.15 कोटींची नुकसान भरपाई देण्याचा आदेश दिला आहे.
सातारा : कंटेनर ट्रक चालक मालक संजय सखाराम पवार रा. परखंदी, ता. माण हे स्वत:चा ट्रक चालवत मुंबईकडून पुण्याकडे येत असताना जुन्या हायवेवर विरुध्द दिशेने आलेल्या दुसर्या ट्रकचा टायर फुटून जोराची धडक दिल्याने संजय पवार यांचा जागीच मृत्यू झाला होता. या अपघाती मृत्यूबद्दल नुकसान भरपाई मिळावी यासाठी संजय यांची पत्नी, तीन मुले व आई यांनी सातारा कोर्टात दाखल केलेल्या क्लेमच्या कामी सातारा जिल्हा न्यायालयाने नुकताच निर्णय देवून संजय यांच्या वारसांना समोरच्या ट्रकचा मालक व विमा कंपनीकडून 81 लाख अधिक 7 टक्के दराने व्याज अशी एकूण 1 कोटी 15 लाख इतकी नुकसान भरपाई देण्याचा आदेश दिला आहे. ही रक्कम जिल्ह्याच्या आजपर्यंतच्या न्यायालयीन इतिहासातील सर्वोच्च नुकसान भरपाई आहे.
याकामी संजय यांच्या वारसांतर्फे नुकसान भरपाईचे दाव्याचे काम पाहिलेले अॅड. राजेंद्र वीर यांनी सांगितले की, संजय यांनी सन 2008 मध्ये 10 चाकी कंटेनर ट्रक फायनान्स कंपनीच्या कर्जाने विकत घेतला होता. अपघात होईपर्यंत संजय यांनी दरमहा रुपये 35,000 इतका हप्ता वेळच्या वेळी फेडला होता. संजय यांचे कुटूब कळंबोली, मुंबई येथे भाड्याच्या घरात राहत होते व संजय यांची मुले तेथेच शिक्षण घेत होती. या सर्व बाबींचा विचार करुन संजय यांचे उत्पन्न दरमहा रुपये 66 हजार इतके होत असल्याने एकूण 1 कोटी 44 लाख रुपये नुकसान भरपाई मिळण्याची मागणी अर्जदारा तर्फ करण्यात आली होती. या क्लेमच्या कामी कंटेनर ट्रकच्या कर्ज खात्याचा उतारा, ट्रकच्या मालकीचे आर.टी.ओ चे दाखले इत्यादी कागदपत्रे दाखल करण्यात आली होती. सदर पुरावा व सर्वोच्च न्यायालयाचे व मुंबई उच्च न्यायालयाचे विविध न्यायनिर्णय यांचा विचार करुन सातारा येथील तदर्थ जिल्हा न्यायाधीश पी. पी. अभंग यांनी अतिम निर्णय देवून अर्जदारांना वरील प्रमाणे एकूण 1 कोटी 15 लाख इतकी नुकसान भरपाई देण्याचा आदेश दिला.
ही नुकसान भरपाई ट्रक चालक-मालकाच्या अपघाती मृत्यूबद्दलच्या क्लेममध्ये आज पर्यंतच्या सातारा जिल्हा न्यायालयाच्या इतिहासातील सर्वोच्च नुकसान भरपाई ठरली आहे. सदरकामी संजय यांचे वारसांतर्फे अॅड. राजेंद्र वीर यांनी काम पाहिले.