दुष्काळी भागातील दुग्ध उत्पादक शेतकरी भाव घसरल्याने तोट्यात
शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय : तीसचा पंचवीस रुपयांवर भाव; पशुधन धोक्यात
माण तालुका हा दुष्काळी तालुका म्हणून सर्वश्रूत अन् परिचित आहे. कधी सुकाळ तर कधी दुष्काळ अशा निसर्गाच्या लहरीवर इथला शेतकरी जगत आहे. केवळ लहरी शेतीवर अवलंबून न राहता शेतीला जोडधंदा म्हणून संकरित गाई जोपासून दुग्ध व्यवसाय सुरू ठेवला आहे. या व्यवसायावर अनेकांचे संसार उभे आहेत. मात्र, सध्या अघोषित दुधाचे दर खाली आले असल्याने शेतकर्यांचा जोडधंदा तोट्यात जाणार असल्याची चिन्ह निर्माण झाली आहे. तळहाताच्या फोडाप्रमाणे पशुधन जोपासले असून ते धोक्यात आले आहे.
दौलत नाईक
दहिवडी : माण तालुका हा दुष्काळी तालुका म्हणून सर्वश्रूत अन् परिचित आहे. कधी सुकाळ तर कधी दुष्काळ अशा निसर्गाच्या लहरीवर इथला शेतकरी जगत आहे. केवळ लहरी शेतीवर अवलंबून न राहता शेतीला जोडधंदा म्हणून संकरित गाई जोपासून दुग्ध व्यवसाय सुरू ठेवला आहे. या व्यवसायावर अनेकांचे संसार उभे आहेत. मात्र, सध्या अघोषित दुधाचे दर खाली आले असल्याने शेतकर्यांचा जोडधंदा तोट्यात जाणार असल्याची चिन्ह निर्माण झाली आहे. तळहाताच्या फोडाप्रमाणे पशुधन जोपासले असून ते धोक्यात आले आहे.
सततचा दुष्काळ, लहरी निसर्गाची अवकृपा त्यामुळे दुधत्या जनावरांसाठी ओला-सुका चारा तयार करताना शेतकरी वर्षभर झटत असतात. यावर्षी माण तालुक्यावर निसर्गाची कृपा होऊन पाऊस समाधानकारक झाला. यामुळे रब्बी हंगामातील ज्वारी-मका पिकांचे उत्पादन चांगले झाले आहे. त्यामुळे शेतकर्यांनी यावर्षी ज्वारी, मक्याच्या वैरणीच्या गंजी लागल्या आहेत.
लॉकडाऊनमुळे बाजारपेठेत दूध आणि दुग्धजन्य पदार्थाची मागणी घटली आहे. शेतकर्यांनी शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय मोठ्या प्रमाणात जोपासला आहे. दुधाचे दर गेल्या महिन्यापर्यंत अगदी तीस रुपयांपर्यंत होते. हा भाव शेतकर्यांना परवडत होता. त्यातून दोन पैसे शिल्लक राहून व्यवसायात समाधानी होता. मात्र, हळूहळू दुधाचे भाव खासगी डेअरीकडून कमी करण्यात आले आहेत, हे कमी झालेले भाव शेतकर्यांना परवडणारे नाहीत. त्यामुळे शेतकर्यांचे आर्थिक गणित कोलमडून जाण्याची गडद भीती निर्माण झाली आहे.
दिवसेंदिवस पशुखाद्याचे भाव गगणाला भिडू लागले आहेत. पशुखाद्याचा रतीब गाईंना लावल्या शिवाय जादा प्रमाणात दूध निघत नाही आणि जनावरांचे आरोग्य संतुलित राहत नाही. दुधाचे भाव घटल्याने पशुखाद्य यामध्ये सरकी, गोळी पेंड, मक्याचा भरडा, ओली व वाळलेली वैरण, औषधोपचार, संगोपन करताना पशुपालक शेतकरी तोट्यात जाताना दिसतोय. जनावरांच्या खुराकासाठी सरकी पेंड 1575 रुपये, गोळी पेंड 1350 रुपये तर मक्याचा भरडा 1050 रुपये, आटा 1000 रुपये, खपरी पेंड 2500 रुपये भावाने प्रती 50 पन्नास किलोची गोणी खरेदी करावी लागत आहे.
पशुपालकांना दुभत्या जनावरांना दररोज सकस आहार द्यावा लागतो. त्यामध्ये पशुखाद्य, हिरवा चारा, वाळला कडबा यावर इतका सरासरी पावणे चारशे ते चारशे रुपये खर्च होत असतो. जनावरांचा दुभता व भाकड काळ यातील दुधाचे सरासरी प्रमाण प्रतिदिन पंधरा लिटर इतके मानले तर पावणे चारशे रुपये शेतकर्यांच्या हातात येतात. दररोज पशुखाद्य सरासरी दहा किलो तीनशे रुपयांच्या घरात जातंय तर 25 किलो वैरण किमान शंभर रुपयांची लागत आहे. त्यामुळे उत्पादन आणि खर्च बघितला तर हा जोडधंदा तोट्यात असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
गाईच्या दुधाचा भाव फॅट, एसएनएफ या निकषावर ठरविला जातो. सध्या 16 एप्रिलनंतर गाईच्या दुधाला फॅट 3.5 एसएनएफ 8.5 या गुणवत्तेला 25 रुपये दर दिला जातोय, या अगोदर याच गुणवत्तेला 30 रुपये दर दिला जात होता. आता प्रती लिटर दुधाला पाच रुपयांची घसरण झालीय. आगामी काही दिवसांत आणखी पाच रुपयांची घसरण होण्याची शक्यता आहे. मग मे महिन्याच्या सुरवातीला भाव वीस रुपयांवर येईल, असे वर्तविण्यात येत आहे. तसेच फॅट 3.5 एसएनएफ 8.5च्या खाली गुणवत्ता आल्यास प्रती पॉईंट 40 पैसे प्रमाणे दरांची घसरण होत आहे. कमी फॅट, एसएनएफचे दूध शेतकर्यांना विक्री करायला व संकलन केंद्र चालकांना खरेदी करायला परवडत नाही.
सध्या 16 एप्रिल पासून 3.5 फॅट व 8.5 एसएनएफला 25 रुपये दर झाला आहे, तर कमी म्हणजे 3.0 फॅटला बावीस साडेबावीस रु. इतका दर बसत आहे. हे दर प्रत्येक दहा दिवसानी ढासळू लागले आहेत. उन्हाळ्याच्या दिवसात दर वाढत असतात. दर वाढायचं दूर राहिलं तर टिकून राहायचं सोडाच, दिवसेंदिवस दरात घसरण सुरू आहे. अशीच परिस्थिती राहिल्यास पशुपालक शेतकरी उद्ध्वस्त होऊन जाईल. तळहाताच्या फोडासारखे पशुधन सांभाळताना शेतकर्यांचा जीव मेटाकुटीला येत आहे.
मिल्किंग मशीन, कडबा कुट्टीमुळे वेळ अन् मनुष्यबळाची बचत
शेतकर्यांनी अधिक दूध उत्पादनासाठी संकरित गाई पाळल्या आहेत. अधिकतम दूध देणार्या प्रजाती विकसित झाल्या आहेत, जादा दूध देणार म्हणल्यावर त्या गाईंना खुराक ही त्या प्रमाणात द्यावा लागत असतो. अनेक पशुपालक शेतकर्यांनी पाच व त्यापेक्षा जादा गाईची जोपासना केली आहे. या जनावरांना ओली वाळलेली वैरण तोडून खाऊ घालणे कष्टाचे व जिकिरीचे असल्याने, वैरणीची बचत करणे या अनुषंगाने कडबा कुट्टीचा वापर करण्यात येत आहे. तसेच भरपूर गाई असल्याने सर्व गाईंच्या वेळेत धारा काढणे आवश्यक असते तर त्यासाठी कुशल माणसांची गरज असते. परंतु, दूध धारा काढण्यासाठी पशुपालक सर्रास मिल्किंग मशीनचा वापर करीत आहेत. त्यातून वेळ व मनुष्यबळाची बचत होत आहे. यासाठी शेतकर्यांना जादा भांडवल गुंतवावे लागत आहे.
दुधाच्या भावानुसार गाईंच्या किमतीत चढउतार
बाजारपेठेत दुधाचे भाव कसे आहेत, यावर दुभत्या व व्यायला झालेल्या गाईंचा दर ठरत आहेत. दुधाचे भाव खाली आल्यास गाईंचे दर कमी होऊन गाईंची विक्री मंदावते तर दर वाढल्यास गाई शोधून विकत मिळत नाहीत, परिणामी शेतकर्यांना गाई खरेदीसाठी व्यापार्यांचा आसरा घ्यावा लागत असतो. सध्या गाईंच्या किमती लाखाच्या घरात आहेत. गेल्या दुष्काळाच्या खाईत पशुधन घटले होते. मात्र, अलीकडे पर्जन्यमान चांगले झाल्याने शेतकर्यांकडे स्वतःच्या शेतात चारा निर्माण होऊन पुन्हा पशुधन वाढले आहे.
दुधाचा दर घसरल्यास व्यवसाय परवडत नाही..
दुग्ध व्यवसाय करायचा म्हटलं की गाई खरेदी करणे, निवार्यासाठी गोठा-शेड बांधणे, कडबा कुट्टी, मिल्किंग मशीन, चार्याची साठवणूक व तरतूद करणे, पशुखाद्य, मक्याचा भरडा आदीसाठी भांडवल गुंतवावे लागते. दुभती जनावरे अधूनमधून आजारी पडतात. त्यांना महागडा औषधोपचार करावा लागतो. शेतात किमान आठमाही हिरव्या चार्याचे नियोजन करून उन्हाळ्यात सुक्या चार्याबरोबर हिरवा, ओला चारा खरेदी करावा लागतो. या सर्व उलाढालीच्या चार्याबरोबर हिरवा, ओला चारा खरेदी करावा लागतो. या सर्व उलाढाली करीत असताना दुधाचे दर किमान तीस रुपयांच्या खाली आल्यास शेतकरी तोट्यात जात आहे.
- सुनील खाडे, पशुपालक शेतकरी, पळशी.