sports

काळचौंडीच्या सरपंचपदी राणी माने बिनविरोध

सर्व महिला सदस्यांच्या निवडीने घडविला इतिहास

माण तालुक्यातील काळचौंडी गावच्या सरपंचपदी राणी भाऊ माने तर उपसरपंचपदी अर्चना आबा कोरे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. 

वरकुटे-मलवडी : माण तालुक्यातील काळचौंडी गावच्या सरपंचपदी राणी भाऊ माने तर उपसरपंचपदी अर्चना आबा कोरे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. 

यावेळी ग्रामपंचायत सदस्य विमल आण्णा हांडे, लक्ष्मी नवनाथ सावंत, उर्मिला सूर्यकांत कुंभार, अर्चना बजरंग जाधव, सारिका अमोल केंगार, सुवर्णा सुरेश तिवाटणे, विजया सचिन माने, सर्व महिला ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होत्या.

माण तालुक्याच्या इतिहासात पहिल्यांदाच कुकुडवाड गटातील काळचौंडी गावच्या ग्रामपंचायतीवर सर्व महिला सदस्यांचेच राज्य प्रस्थापित झाले आहे. पक्ष, पार्टी, गट-तट बाजूला ठेवून गावच्या विकासासाठी कसलाही हेवादेवा न बाळगता काळचौंडीच्या ग्रामस्थांनी मोठ्या मनाने महिलांच्या हाती गावचा कारभार सोपवला आहे.

काळचौंडी ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित केलेल्या सरपंच निवडणुकीचे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून डी. बी. शिंदे व ग्रामसेवक मल्हारी खाडे यांनी काम पाहिले. 

यावेळी दोन्ही गटाचे प्रमुख माजी सरपंच बाळासाहेब दादू माने व बाळासाहेब महादेव माने, म्हसवडचे पोलीस कॉन्स्टेबल नंदकुमार खाडे आदी मान्यवर उपस्थित होते.

निवडीनंतर सरपंच, उपसरपंच यांंचा फेटा, शाल, श्रफळ देऊन सत्कार करण्यात आला तर सर्व महिला सदस्यांनी एकमेकींना पेढ्यांचा घास भरवून शुभेच्छा दिल्या. कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करीत आनंद व्यक्त केला. सर्व निवडणूक प्रक्रिया शांततेत व बिनविरोध पार पडल्याने काळचौंडी ग्रामस्थांच्यातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.