कांद्याचे दर कोसळल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त
भांडवली खर्चही निघेना; दोन हजार रुपये हमीभावाची मागणी
माण तालुक्यात मोठ्या प्रमाणात कांद्याचे उत्पादन घेतले जाते. गेल्या पंधरा दिवसांपासून परिसरात कांदा काढणी व काटणीची कामे वेगात सुरू आहेत. मात्र, कोसळलेल्या दरामुळे शेतकर्याच्या डोळ्यात पाणी आले आहे. सध्या प्रति क्विंटल आठशे ते नऊशे रुपये दर मिळत आहे. भांडवली खर्चही निघत नसल्याने कांद्याने बळीराजा चिंताक्रांत झाल्याचे दिसत आहे.
वरकुटे : माण तालुक्यात मोठ्या प्रमाणात कांद्याचे उत्पादन घेतले जाते. गेल्या पंधरा दिवसांपासून परिसरात कांदा काढणी व काटणीची कामे वेगात सुरू आहेत. मात्र, कोसळलेल्या दरामुळे शेतकर्याच्या डोळ्यात पाणी आले आहे. सध्या प्रति क्विंटल आठशे ते नऊशे रुपये दर मिळत आहे. भांडवली खर्चही निघत नसल्याने कांद्याने बळीराजा चिंताक्रांत झाल्याचे दिसत आहे.
मागील वर्षी जून ते सप्टेंबरच्या दरम्यान कांद्याचे भाव गगनाला भिडले होते. प्रति क्विंटल चार ते साडेचार हजारापर्यंत भाव होता. पण सप्टेंबर पर्यंत सलग व जोरदार पाऊस झाल्याने बर्याच जणांचा कांदा शेतातच नासून गेला तर अनेकांचा कांदा उगवलाच नाही, त्यामुळे शेतकर्याकडे कांदाच नव्हता अशी परिस्थिती होती.
पावसाने शेतीचे पूर्णपणे नुकसान होऊनही बळीराजाने पुन्हा नव्या जोमाने कांद्याची दुबार तर काहींनी तिबार पेरणी केली. पावसाने सगळीकडेच कांदा व रोपे नासून गेल्याने बियाण्यांचे दर प्रतिकिलो चार हजारापर्यंत भडकले होते. तरीही उसनवारी करून दिवाळीच्या सुमारास पाच महिन्यांचे गरवा कांदा बियाणे पुन्हा पेरले. सध्या सर्वत्र कांद्याची काढणी व काटणीची कामे जोमात सुरू असली तरी कांद्याच्या भावात मोठी घसरण झाल्याने काटलेल्या कांद्याचे करायचे काय?, असा प्रश्न शेतकर्याला पडला आहे. सध्या दर पडल्याने कांदा खरेदीसाठी व्यापारीही फिरकत नसल्याने शेतातच कांदा वाळून जाऊ लागला आहे.
कांदा हेच या परिसरातील नगदी पीक म्हणून घेतले जाते. या पिकातून मिळालेला पैसा पुढच्या पिकात भांडवल म्हणून वापराला जातो; पण या हंगामात कधी अस्मानी तर कधी सुलतानी संकटाने खर्चाचे गणित कोलमडणार असल्याचे शेतकरी वर्गातून बोलले जात आहे. कांद्याला किमान दोन हजार दर मिळावा, अशी आशा शेतकरी व्यक्त करत आहेत.
भांडवली खर्चही निघेना..
सध्या आठशे ते नऊशे असा कवडीमोल दर असून कांदा पिकासाठी मशागत, बियाणे, औषधे, खते, खुरपणी, काढणी, काटणी, साठवण व्यवस्थापन अशा बाबींवर केलेला भांडवली खर्च पाहता शेतकरी पूर्णतः तोट्यात गेल्याचे दिसत आहे. सरकारनं आमच्या पिकाचे नुकसान झाल्यावर कवडीमोल नुकसान भरपाई देण्यापेक्षा आमच्या पिकांना रास्त भाव द्यावा, असं वाटतं.
- सुुुभाष जाधव, वरकुटे.