माण तालुक्यात शेतकर्यांचे नगदी पीक म्हणून कांद्याला ओळखले जाते. शासनाने नुकताच मिनी लॉकडाऊन जाहीर केला अन् शेतकर्यांनी मार्केटला कांदा विक्रीसाठी आणला. या कांद्याची अचानक आवक वाढल्याने कांद्याचा भाव घसरला असल्याने पुन्हा कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. सध्या एक हजाराच्या आत भाव आला असल्याने जमा खर्चाचा ताळमेळ जुळेनासा झाला आहे.
माण तालुक्यात मोठ्या प्रमाणात कांद्याचे उत्पादन घेतले जाते. गेल्या पंधरा दिवसांपासून परिसरात कांदा काढणी व काटणीची कामे वेगात सुरू आहेत. मात्र, कोसळलेल्या दरामुळे शेतकर्याच्या डोळ्यात पाणी आले आहे. सध्या प्रति क्विंटल आठशे ते नऊशे रुपये दर मिळत आहे. भांडवली खर्चही निघत नसल्याने कांद्याने बळीराजा चिंताक्रांत झाल्याचे दिसत आहे.
कांदा हे कधी शेतकर्यांच्या तर कधी ग्राहकांच्या डोळ्यात पाणी आणणारे पीक म्हणून ओळखले जाते. मात्र, सातारा जिल्ह्यातील आणि दुष्काळ शापित माण तालुक्यातील शेवटचे टोक असणार्या कुरणेवाडीतील कांतीलाल खांडेकर व संजय खांडेकर या दोन भावांना कांद्याचे पीक वरदान ठरले आहे. त्यांनी अडीच एकर कांद्याच्या शेतीतून तब्बल 12 लाखांचे उत्पन्न मिळवून पिचलेल्या शेतकर्यांसमोर नवा आदर्श निर्माण केला आहे.