माणदेशी शेतकरी कांद्याचे भाव घसरल्याने हवालदिल
हळव्याला अवकाळीचा फटका; शेतकर्याचा जमा-खर्चाचा ताळमेळ जुळेना
माण तालुक्यात शेतकर्यांचे नगदी पीक म्हणून कांद्याला ओळखले जाते. शासनाने नुकताच मिनी लॉकडाऊन जाहीर केला अन् शेतकर्यांनी मार्केटला कांदा विक्रीसाठी आणला. या कांद्याची अचानक आवक वाढल्याने कांद्याचा भाव घसरला असल्याने पुन्हा कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. सध्या एक हजाराच्या आत भाव आला असल्याने जमा खर्चाचा ताळमेळ जुळेनासा झाला आहे.
दहिवडी : माण तालुक्यात शेतकर्यांचे नगदी पीक म्हणून कांद्याला ओळखले जाते. शासनाने नुकताच मिनी लॉकडाऊन जाहीर केला अन् शेतकर्यांनी मार्केटला कांदा विक्रीसाठी आणला. या कांद्याची अचानक आवक वाढल्याने कांद्याचा भाव घसरला असल्याने पुन्हा कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. सध्या एक हजाराच्या आत भाव आला असल्याने जमा खर्चाचा ताळमेळ जुळेनासा झाला आहे.
बिदाल, शिंदी, भांडवली, मलवडी, गोंदवले, नरवणे, लोधवडे, जाशी, पळशी तसेच माणगंगा नदी काठच्या गावांमधून कांदा पीक प्रामुख्याने घेतले जाते, काही ठिकाणी पाण्याच्या उपलब्धतेनुसार शेतकरी कांदा पीक घेतात.
यावर्षी सलग तिसर्यांदा कांदा पिकाने शेतकर्यांना हुलकावणी दिली आहे. माण तालुक्यात शेतकरी दोन टप्प्यात कांदा पिकाचे उत्पादन करतात. खरिपातील अडीच महिन्यांचा हळवा आणि रब्बीतील पाच महिन्यांचा गरवा कांदा. पीक घेणे, जोपासणे तसं खर्चिक अन् जोखमीचे आहे. या पिकाची शेतकर्यांना लॉटरी खेळावी लागते, लागली तर लागली नाही हुकली, अशी शेतकर्यांची परिस्थिती असते. गतवर्षी पासून कांदा उत्पादक शेतकरी दोनही वेळा लॉटरी हरला आहे, यावर्षीच्या उत्पादित कांद्याला चांगला भाव मिळण्याच्या प्रतीक्षेत आहे. मात्र, दिवसेंदिवस दराची घसरण सुरू आहे.
गतवर्षी शेतकर्यांनी गरवा कांद्याचे विक्रमी उत्पादन घेतले; मात्र लॉकडाऊनच्या काळात हा कांदा शेतकर्यांनी कांदा चाळीत साठवून ठेवला. या कांद्याला बाजारपेठ उपलब्ध होईल, चांगला भाव मिळेल या आशेवर राहिला. अखेर समाधानकारक भाव मिळाला नाही, काही शेतकर्यांनी मिळेल तिथं कांदा विक्रीला पाठवला. मात्र, तिथंही भाव मिळाला नाही, अखेर योग्य दराअभावी काही शेतकर्यांनी साठवलेल्या कांद्याला उकिरड्याचा रस्ता दाखवला. त्यावेळी या पिकाचा खर्च माथी मारून घ्यावा लागला, काही शेतकर्यांनी तोटा होऊन देखील जोखीम पत्करून यावर्षीच्या खरीप हंगामातील हळव्या कांद्याचे पीक घेतले. सुरुवातीला जोमात आलेला कांदा अवकाळी पावसाला बळी पडून नासून गेला आणि या कांद्याला केलेला खर्च पाण्यात गेला.
दिवाळीनंतर रब्बी हंगामात पाच महिन्याच्या गरवा कांद्याचे उत्पादन घेतले जाते. या कांद्याच्या लागवडीसाठी रोपांचा तुटवडा होता. तर बी पेरणीसाठी बियाणे उपलब्ध होत नव्हते. परिणामी, बियाण्यांचा तुटवडा असल्याने या बियाण्याचा भाव चार हजार रुपये किलोच्या घरात गेला होता. सुमारे या दराचे बियाणे खरेदी करून कांदा पेरला गेला, मात्र काही बियाण्यांनी शेतकर्यांना दगा दिला व बियाणे उगवले नसल्याने बियाणे, पेरणी व खतांचा खर्च वाया गेला. चांगली उगवण झालेल्या गरवा कांद्याची काढणी सध्या शेतकर्यांनी केली असून कापणी करून विक्रीसाठी कांदा तयार ठेवला आहे. नुकताच शासनाने मिनी लॉकडाऊन जाहीर केला असल्याने हॉटेल व्यवसाय ठप्प झाला आहे.
त्यामुळे कांद्याची मागणी मंदावणार आहे तसेच मार्केटमध्ये आवक वाढली असल्याने कांद्याचा भाव चार हजारावरून एक हजारापर्यंत घसरला आहे. एकंदरीत गतवर्षापासून वेगवेगळ्या आपत्तींच्या माध्यमातून कांदा उत्पादक शेतकरी तोट्यात चालला आहे. कांद्याच्या सलग तिसर्यांवेळच्या पिकाने फसवल्याने कांदा उत्पादक शेतकर्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. आतापर्यंत कांदा उत्पादनासाठी खते, बियाणे, जोपासणूक त्यासाठी लागणारे मनुष्यबळ हे संपूर्णपणे वाया गेले आहे.
कांदा लागवडीसाठी शेतकर्यांनी चार लाख रुपये क्विंटलचे बियाणे खरेदी केले, लाखाच्या भावातील बियाणे खरेदी करताना शेतकरी डगमगला नाही, मात्र कांद्याचा भाव प्रति क्विंटल एक हजाराच्या आत आल्याने हवालदिल झाला आहे, वर्षात तीन तीन वेळा तोटा सहन करताना सहनशीलतेला पारा उरत नसल्याचे पाहायला मिळत आहे. पण या बळीराजाला सहन करण्याशिवाय पर्यायही उरत नाही.
यावर्षी कांदा पेरला बियाणं फसवं लागलं, त्यातून फुटीचे प्रमाण वाढले या फुटीच्या कांद्याला भाव मिळत नाही . तर चांगल्या दर्जाच्या कांद्याची निवड करून विक्रीसाठी थैल्या भरून ठेवल्या आहेत, पण भाव नसल्याने हा कांदा मार्केट पाठवला नाही. एक हजार रुपयांच्या आत दर आल्यास केलेला खर्च सुद्धा निघत नाही. इतर पिकांपेक्षा कांदा पीक फायदेशीर ठरते मात्र बाजार पेठेत दर नसल्याने सध्या हे पीक परवडत नाही.
- सदाशिव गंबरे, कांदा उत्पादक शेतकरी, पळशी.