कुरणेवाडीच्या खांडेकर बंधूंचे अडीच एकरात कांद्याचे 12 लाखांचे उत्पन्न
शेतीतील नियोजनबद्ध व्यवस्थापनाचे फलीत : पिचलेल्या शेतकर्यांसमोर ठेवला नवा आदर्श
कांदा हे कधी शेतकर्यांच्या तर कधी ग्राहकांच्या डोळ्यात पाणी आणणारे पीक म्हणून ओळखले जाते. मात्र, सातारा जिल्ह्यातील आणि दुष्काळ शापित माण तालुक्यातील शेवटचे टोक असणार्या कुरणेवाडीतील कांतीलाल खांडेकर व संजय खांडेकर या दोन भावांना कांद्याचे पीक वरदान ठरले आहे. त्यांनी अडीच एकर कांद्याच्या शेतीतून तब्बल 12 लाखांचे उत्पन्न मिळवून पिचलेल्या शेतकर्यांसमोर नवा आदर्श निर्माण केला आहे.
वरकुटे-मलवडी : कांदा हे कधी शेतकर्यांच्या तर कधी ग्राहकांच्या डोळ्यात पाणी आणणारे पीक म्हणून ओळखले जाते. मात्र, सातारा जिल्ह्यातील आणि दुष्काळ शापित माण तालुक्यातील शेवटचे टोक असणार्या कुरणेवाडीतील कांतीलाल खांडेकर व संजय खांडेकर या दोन भावांना कांद्याचे पीक वरदान ठरले आहे. त्यांनी अडीच एकर कांद्याच्या शेतीतून तब्बल 12 लाखांचे उत्पन्न मिळवून पिचलेल्या शेतकर्यांसमोर नवा आदर्श निर्माण केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, कुरणेवाडी येथील कांतीलाल खांडेकर व संजय खांडेकर या दोन भावांची अडीच एकर जमीन आहे. या अगोदर त्या जमिनीत ज्वारी, बाजरी यासारखी पारंपरिक पिके घेतली जात होती. त्यावरही कधी अस्मानी तर कधी सुलतानी संकटाने ग्रासलेल्या शेतीतून जेमतेम प्रपंच चालवण्या इतपतच उत्पन्न निघत असे. अनेकदा प्रचंड तोटाही सहन करावा लागत असे.
यामुळे शेती करत असताना उत्पादन खर्चही हाती येत नसल्याने, त्यांनी नियोजनबद्ध पद्धतीने संपूर्ण शेतात कांदा लागवड करायचे ठरवले. खांडेकर बंधूंनी ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात ‘पुना फुरसुंगी डबल पत्ती’ या वाणाचे बियाणे पुसेगाव येथील एका शेतकर्याकडून विकत घेऊन एकरी तीन किलो बियाणांची लागवड केली होती.
गेल्या वर्षी दमदार पडलेल्या पावसाने पाणी साठा टिकून आहे, याचाच फायदा घेऊन अगोदर नांगरणी करून एकरी चार ट्रॉलीच्या प्रमाणात शेणखत टाकून त्यांनी वाफा पद्धतीवर पाणी देण्याची व्यवस्था केली. त्यानंतर रोटावेटर मारून रान सपाट केले व वाफे तयार करून कांद्याचे बियाणे विस्कटले. त्यानंतर भांगलणी, फवारणी करून रासायनिक खते विस्कटणे असा एकूण दीड लाख रुपये खर्च आला.
साधारण 80 दिवसांतच अडीच महिन्याचा कांदा 6 टन विकला. त्यास साधारणपणे 4000 रु. प्रती क्विंटल दर मिळाला. त्यानुसार 2 लाख 40 हजार रु. झाले आहेत. आणि पाच महिन्याच्या दीड एकर कांद्याची काढणी सुरू आहे. तोही चांगला पोसला असून, जवळपास 19 ते 20 टन भरणार असल्याची खात्री आहे. चालू कांद्याच्या वाढत्या दरानुसार सरासरी 4500 रु. प्रती क्विंटल दर मिळण्याची शक्यता असून 9 लाख रु. चे उत्पन्न अपेक्षित आहे. ऑक्टोबर महिन्यापासून फेब्रुवारी महिन्यापर्यंत पाच महिन्यात बारा लाखांचे उत्पन्न मिळाले आहे.
यासाठी त्यांना वरकुटे-मलवडी येथील न्यू कृषीरत्न कृषी कल्याण केंद्राचे अनिरुद्ध उर्फ छोट्या आटपाडकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यांनी सांगलीच्या बाजारपेठेत बोली लावून व्यापार्यांना कांद्याची विक्री केली. कांद्याचा रंग आकर्षक असल्याने त्यांना सध्या 45 ते 50 रुपये प्रति किलो दर मिळत असल्याने सर्व खर्च वजा जाता 10 लाख रु. निव्वळ नफा मिळाला आहे.
आत्तापर्यंत पारंपरिक पद्धतीने शेती करीत असल्याने तोट्यात जात होतो. परंतु कांद्याची आधुनिक पद्धतीने लागवड करून कमी खर्चात आणि जेमतेम पाण्यात चांगले उत्पन्न मिळवले. शिवाय कोणत्या वेळेला कोणती खते द्यायची याबाबत माहिती करून घेतल्यास, कमी पाण्यात सुद्धा दर्जेदार उत्पन्न मिळवता येते. याबद्दल खात्री झाली आहे.
- कांतीलाल खांडेकर, शेतकरी, कुरणेवाडी, ता. माण.