सातारा बसस्थानकाला अतिक्रमणांचे ग्रहण
सार्वजनिक रस्त्यालाच ठोकलीत लोखंडी भक्कम गेट; ओढ्यावरील अतिक्रमणांमध्ये मस्त भरतेय खाऊगल्ली (भाग तिसरा)
सातारा बसस्थानकाच्या 500 मीटर परिघात बोकाळलेली अतिक्रमणे पाहत असताना आता राधिका रस्त्यावरील अतिक्रमणांकडे आता पाहुयात. राधिका रस्त्यावरील एका सार्वजनिक रस्त्याच्या दोन्ही प्रवेशद्वारावर काही धनिकांनी लोखंडी भक्कम गेट लावून हा रस्ता वाहतुकीसाठी पूर्णत: बंद केला आहे. याच रस्त्यावर दोन व्यावसायिकांनी ओढ्यावर बांधकामे करीत सरकारी नियमांना हरताळ फासण्याचे काम केले आहे.
- विनित जवळकर
सातारा : सातारा बसस्थानकाच्या 500 मीटर परिघात बोकाळलेली अतिक्रमणे पाहत असताना आता राधिका रस्त्यावरील अतिक्रमणांकडे आता पाहुयात. राधिका रस्त्यावरील एका सार्वजनिक रस्त्याच्या दोन्ही प्रवेशद्वारावर काही धनिकांनी लोखंडी भक्कम गेट लावून हा रस्ता वाहतुकीसाठी पूर्णत: बंद केला आहे. याच रस्त्यावर दोन व्यावसायिकांनी ओढ्यावर बांधकामे करीत सरकारी नियमांना हरताळ फासण्याचे काम केले आहे.
सातारा बसस्थानकाकडे जाणारा तिसरा रस्ता असल्याने या रस्त्यावर कायम वाहनांची वर्दळ असते. याच रस्त्यावर काही लॉजेस असल्यामुळे बाहेरगावचे प्रवासीही याच रस्त्यावरुन ये-जा करतात. सकाळी या रस्त्यावर काही प्रमाणात शहराच्या आजुबाजूच्या परिसरातील शेतकरी आपली भाजी विकत असल्याने आणि ती स्वस्त पडत असल्याने याठिकाणाला शहरातील नागरिक पसंती देतात. सकाळी दहानंतर मात्र शेतकरी तिथून उठून गेल्यानंतर खर्या अर्थाने सुरु होतो तो इथला बाजार.
हा रस्ता सुरु होतानाच माणसाच्या मनात धडकी भरते. कारण इथे वावरणारी उडाणटप्पू मुले व माणसे. या रस्त्याच्या केवळ पन्नास-शंभर मिटरच्या अंतरावर तीन दारुची दुकाने आणि एक बार असल्याने कोणी ‘पाजणारा’ भेटतोय का? या प्रतिक्षेत दिवस-दिवस फुकटे बसून असतात. अजिजिने, प्रेमाने, धाकदपटशा दाखवून अथवा वेळ पडलीच तर मारहाणही करुन हे बेवडे आपली तृष्णा शांत करतात. या बेवड्यांच्या नादाला लागण्यापेक्षा काही लोक त्यांना काही पैसे देवून आपला पिच्छा सोडवतात. मात्र येथे वावरणारे सराईत त्या सामान्याला सोडायला तयार नसतात. गोड बोलून अथवा बाजुला नेवून त्याचा खिसा रिकामा केलाच जातो. कशाला पोलिसांची फुकटची झंझट म्हणून तो लुटलेला काही बोलत नाही आणि लुटणारे आपल्या आनंदात मश्गुल होतात. त्यामुळे हा बिनभांडवली धंदाही येथे चालतो. येथेच चकणा, ग्लास आणि पाण्याची बाटली विकत घेतली की हॉटेलमध्ये उभ्याने पिणारांचीही संख्या कमी नाही. या रस्त्याने येणार्या-जाणार्या आया-बहिणी आपल्या तोंडाला मास्क असूनही आणखी आपले तोंड झाकून घेतात. अथवा आपला मार्ग बदलून जातात. म्हणजेच हा रस्ता टाळतात. इतके दहशतीचे वातावरण याठिकाणी पहावयास मिळते.
याच ठिकाणी बिनबोभाटपणे अवैध दारु, मटका चालतो. येथे मार्केटयार्ड असल्याने हमाल, कष्टकरी लोकांची संख्या जास्त असल्याने या लोकांना दारु-मटक्याची भुरळ पाडली जाते. सर्व प्रकारचा गुटखा, दारुची येथे ड्राय डे दिवशी रेलचेल असते. त्यादिवशी छाती फुगवून तान्या-पांड्या येथे मस्तपैकी बक्कळ पैसे कमवतात. दारुचा हा स्टॉक लपवलेला असतो. गिर्हाईकाकडून दुप्पट पैसे मिळाले की हे आपल्या पंटरला ब्रॅण्ड आणि साईज सांगून ती आणायला फर्मावतात. थोड्याच वेळात त्या तळीरामाला आपला ब्रॅण्ड अगदी ड्राय डे दिवशीही मिळून जातो. मात्र, समोर व्यक्ती असूनही पोलीस कारवाई करीत नाहीत. या ‘माल’ घेवून येणार्या पंटरांनाही दिवसभर खस्ता खावून रात्री उशिरा सगळा ‘माल’ संपला की एखादी क्वार्टर वा काही पैसे देवून मोठ्या आवाजात, चार शिव्या घालून त्यांची बोळवण केली जाते. हेही गरीब बापडे तान्या-पांड्या दिवसाला हजारो रुपये कमवून ड्राय डे ला धन्यवाद देत असतात.
याच रस्त्यावरुन पोलीस हेडक्वार्टर कडे जाणार्या मार्गाला जोडणारा एक आठ फुटी कच्चा रस्ता होता. त्या रस्त्याचा उपयोग जेव्हा पुढचे ट्राफिक जाम होईल आणि राधिका रस्त्याकडून पोलीस हेडक्वार्टरकडे जायचे असेल तर तो खुष्कीचा मार्ग होता. मात्र काही धनिकांनी पैशांचा वापर करीत या रस्त्यालाच गेट लावली आहेत. दोन्हीही बाजूंकडून हा आठ फुटी रस्ता बंद करण्यात आला आहे. जेव्हा खोलात जावून या रस्त्याचे सर्वेक्षण केले असता. या रस्त्यामध्येच अतिक्रमण करीत एका फळविक्रेत्याने आपले फळांचे गोदाम टाकून आठ फुटी रस्त्याचा केवळ अडीच फुटी रस्ता केला आहे. त्यानेही एका बाजुला आपल्या हक्काचा आणि विकत घेतलेला रस्ता असल्यासारखे लोखंडी पत्र्याचे भक्कम गेट बसवले आहे. त्यामुळे गेला रस्ता कुणीकडे, असे म्हणायची वेळ सातारकरांवर आली आहे.
याच्याच पुढे जावून अधिक बारकाईने पाहिले असता या रस्त्याच्या खालून एक ओढा जातो. या ओढ्यावरच दोन खाद्यपदार्थ विकणार्या व्यावसायिकांनी बांधकाम करीत लोकांची भूक भागविण्याचे पुण्याचे काम केले आहे. पालिकेचा घो म्हणीत ही बांधकामे दिमाखात सर्वांसमोर नाचत आहेत.
सातार्यात पावसाळा जोरात असल्याने आणि सातारा शहर चढ-उतारावर असल्याने पावसाचे पाणी या ओढ्यांद्वारेच नदीला मिळते. ओढ्यांवरील बांधकामास बंदी असतानाही सातारा पालिकेचा एकही कर्मचारी वा अधिकारी या सरेआम कायदा बासणात बसविणार्या व्यवसायिकांवर कारवाई करीत नाही, हे पाहून मन उद्विग्न होते. ज्या मुख्याधिकार्यांकडे आता सातारा शहराची धुरा आहे, त्या मुख्याधिकार्यांनी आजपावेतो ही अतिक्रमणे याची देही याची डोळा पाहिली नसतील? आतापर्यंत ठिक होते. नगरसेवक व्होट बँकेसाठी कारवाई होवून देत नसत. मात्र आता तर प्रशासन ताब्यात असतानाही मुख्याधिकारी गप्प का? असा प्रश्न या रस्त्यावरुन ये-जा करणार्या सर्वसामान्यांना पडला आहे.
या रस्त्याने पडलेला प्लास्टिकच्या ग्लासांचा आणि रिकाम्या क्वार्टरचा ढिग सकाळी दृष्टोत्पत्तीस पडला की ‘सुंदर हा सातारा, स्वच्छ हा सातारा’ असे म्हटल्याशिवाय राहवत नाही.