गेली 25 वर्षे चाललेली युती 2019 ला ‘मुख्यमंत्री शिवसेनेचाच’ या घोषणेमुळे संपुष्टात आली आणि 2019 ला मुख्यमंत्री शिवसेनेचा झाला. अडीच वर्षे शिवसेना आणि अडीच वर्षे भाजप या अटीवर कटूता आली होती. परंतू अडीच वर्षातच उद्धव ठाकरे यांना आपल्या पदावरुन पायउतार व्हावे लागले. पुन्हाही मुख्यमंत्री शिवसेनेचाच आणि तो पण भारतीय जनता पार्टीच्या पाठिंब्यानेच.
गेली 25 वर्षे चाललेली युती 2019 ला ‘मुख्यमंत्री शिवसेनेचाच’ या घोषणेमुळे संपुष्टात आली आणि 2019 ला मुख्यमंत्री शिवसेनेचा झाला. अडीच वर्षे शिवसेना आणि अडीच वर्षे भाजप या अटीवर कटूता आली होती. परंतू अडीच वर्षातच उद्धव ठाकरे यांना आपल्या पदावरुन पायउतार व्हावे लागले. पुन्हाही मुख्यमंत्री शिवसेनेचाच आणि तो पण भारतीय जनता पार्टीच्या पाठिंब्यानेच. नक्की राजकारण कोणत्या दिशेने चालले आहे याबाबत सामान्य नागरिकांच्या मनात प्रश्न निर्माण होऊ लागले आहेत. भारतीय जनता पार्टीने शिवसेनेचा बाणावरचा उपाय शिवसेनेचा बाण काढूनच केला आहे. गेली 25 वर्ष युती असताना शिवसेना आणि शिवसेना प्रमुख ह्या ना त्या कारणाने भारतीय जनता पार्टीवर दबाव निर्माण करीत होते. त्यात शिवसेना कायम मोठा भाऊ चे राजकारण करून भारतीय जनता पार्टीचे खच्चीकरण करत होती. 2019 च्या निवडणुकीमध्ये माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेच्या दुप्पट जागा निवडून आणल्या. त्यानंतर मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार हे शिवसेनाप्रमुखांनी जाहीर केले आणि त्याच कारणाने युती तोडली आणि महा विकास आघाडीचा जन्म झाला. महाविकास आघाडी दिसताना तीन पक्षांची दिसत असली तरी प्रत्येक निर्णय राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी चे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्याच प्रभावाने येत होते. त्यात केंद्रीय तपास यंत्रणारुपी दबाव दिसू लागल्याने महाविकास आघाडीमध्ये प्रचंड असंतोष निर्माण होऊ लागला होता. शिवसेनेमध्ये निर्माण झालेली खदखद आणि बंडाळीची जाणीव शरद पवारांनी सहा वेळा सेनाप्रमुख उद्धव ठाकरेंना दिली होती. परंतु सेनाप्रमुखांकडून त्याकडे दुर्लक्ष झाले आणि त्याचा परिणाम एकनाथ शिंदे यांच्याकडून केलेल्या बंडात दिसून आला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून राष्ट्र्रवादी आणि कॉंग्रेस दोन्ही पक्षांना मिळणारे झुकते माप तसेच उद्धव ठाकरे यांच्या भोवतालचे सेनेचे नेते यांच्याकडून एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सहकार्यांना मिळणार्या वागणुकीस कंटाळून (वैतागून) एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारले. बंडखोर नेते म्हणून एकनाथ शिंदे यांचे नाव उदयास आले. कालपर्यंत ठाणे परिसरातील शिवसेनेचा एकनिष्ठ नेता म्हणून ओळख असलेला नेता एकनाथ शिंदे आज बंड करून पूर्ण भारतभर प्रसिद्ध झाला. शिवसेनेत बंड होईल आणि सरकार पडेल, याची कानकुन राज्यसभा निवडणुकीत संशयित झाली होती.
भारतीय जनता पार्टीने एकनाथ शिंदे यांना नवे मुख्यमंत्री जाहीर करून एका बाणात अनेक शिकारी केल्या. 20 वर्षे भारतीय जनता पार्टी युतीत असताना शिवसेना कायमस्वरूपी मोठा भाऊ च्या भूमिकेत असायची. शिवसेना प्रमुखाचा कायम अंकुश भारतीय जनता पार्टीवर ठेवून असायचा. 2019 साली सेनेकडे मुख्यमंत्री पद दिले असते तर त्या पदाचा रिमोट कायम सेनाप्रमुखांकडे राहिला असता. या बंडानंतर शिवसेना प्रमुखांची पकड सेनेवरची बहुतांशी कमी झालेली असून शिंदे सरकारचा रिमोट भारतीय जनता पार्टीकडे आला. बंड झाल्यानंतर मावळते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा देण्यापूर्वी महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधला. त्यातून निर्माण झालेली सहानभूती आणि भारतीय जनता पार्टी बद्दल महाराष्ट्र्रातील नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला. त्या सर्वाचा परिमाण येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था आणि महानगरपालिका निवडणुकीत दिसण्याची शक्यता निर्माण झाली. या सर्वावर भारतीय जनता पार्टीकडून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करून बहुतांशी असंतोष कमी करण्याचा यशस्वी प्रयोग करण्यात आला. त्याचबरोबर हिंदुत्वाचा ठेका भारतीय जनता पार्टीचाच... हे पण दाखवून देण्यात भाजप यशस्वी झाले.
- श्रीकांत मुळे