महिलांवर जेव्हा - जेव्हा अन्याय झाला तेव्हा- तेव्हा महिलांनी आपल्या न्याय हक्कांसाठी आक्रमक भूमिका घेतल्याचे दिसून येते. महिला त्यामुळे संघटीत होऊ लागल्या. म्हणून संपूर्ण जगाने ८ मार्च हा दिवस "जागतिक महिला दिवस" म्हणून पाळला आहे.
महिलांवर जेव्हा - जेव्हा अन्याय झाला तेव्हा- तेव्हा महिलांनी आपल्या न्याय हक्कांसाठी आक्रमक भूमिका घेतल्याचे दिसून येते. महिला त्यामुळे संघटीत होऊ लागल्या. म्हणून संपूर्ण जगाने ८ मार्च हा दिवस "जागतिक महिला दिवस" म्हणून पाळला आहे. स्त्रियांनी आपले म्हणणे पूर्ण आत्मविश्वासाने मांडले पाहिजे. या गोष्टीचे स्मरण करून देण्यासाठीच दरवर्षी आपण हा दिवस साजरा करतो.
आपले घरकुल उबदार ठेवणाऱ्या, घरातील वृद्धांची सेवा, मुलाबाळांसाठी झटणाऱ्या, पतीच्या पाठी कायम उभे राहून त्यात समाधान मानणाऱ्या, घराला घरपण देणाऱ्या, घरातील प्रत्येक कामात सौंदर्य निर्माण करणाऱ्या स्त्रीला स्वतःकडे बघायला वेळ आहे का? असे कृतिशील जीवन जगताना तिला तिचं स्वातंत्र्य राखता येतं का? पुरुषांची नक्कल केली म्हणजे स्त्रीची उन्नती झाली असे समजायचे का? थ्स्त्री वेशभूषा पुरुषांसारखी करीत आहे किंवा आज पुरुषांच्या सर्वच क्षेत्रात महिलांनी आपले नाव उत्तुंग केले आहे; परंतु असे कर्तुत्व दाखवूनदेखील स्त्री पूर्णत: स्वतंत्र आहे असे म्हणता येत नाही. सर्वसामान्यपणे घरात राहणाऱ्या स्त्रियांच्या निर्णयाला महत्त्व दिले जात नाही. तिच्या भावनांचा विचार केला जात नाही. स्वतः अर्थार्जन करणाऱ्या महिलांना देखील स्वतःच्या (पैशाचा) पगाराचा स्वतःच्या मर्जीप्रमाणे विनियोग करता येत नाही. मुलांसंदर्भात देखील ती स्वतंत्रपणे निर्णय घेऊ शकत नाही. साधारण दोन दशकापूर्वीपर्यंत दररोजचा स्वयंपाक करायचा हे देखील ठरवण्याचे स्वातंत्र्य एकत्र कुटुंबातील स्त्रीला नसे. तिने बाहेर जाताना कुठली साडी नेसावी हे देखील सासू किंवा नंदन ठरवीत. असे आज या गोष्टी कालबाह्य झालेल्या असल्या, तरी अजून स्त्रीची गुलामी संपलेली नाही.
आज राजकीय क्षेत्रात महिला कार्यरत असल्या तरी त्यांचा अधिकार बऱ्याच वेळा सहीपुरताच असतो. स्त्रियांचे शिक्षण, नोकरी हे कुटुंबीयांच्या मर्जीवर अवलंबून असते. स्त्री एक निर्णयक्षम, स्वतंत्र व्यक्ती आहे हे समाजाच्या गावीही नसते. एक तर रुढीच्या बेड्या तिच्या पायात अडकवून तिला कायम तडजोड करण्याची शिकवण परंपरेने दिली जाते. त्यामुळे तिला आपल्या अस्तित्वाचा विचार करणे कठीण होते. जेव्हा जेव्हा ती आकाशात उंच भरारी घ्यायचा विचार करते तेव्हा तेव्हा तिचे उत्साहाचे पंख छाटले जातात. एवढेच काय कुठवर झेप घ्यायची याची चौकट आधीच ठरवून दिली जाते. जोपर्यंत पुरुषप्रधान संस्कृती आहे, तोपर्यंत स्त्रीचे स्थान दुय्यमच राहणार आहे. स्त्री पुरुषातील स्पर्धा ही अनावश्यक आहे. किंबहुना अशी स्पर्धा ही विनाशकारक आणि एक प्रकारची वेठबिगारीच आहे. स्त्री स्वातंत्र्याचा लढा हा पुरुषांच्या विरोधात नसून स्त्री-पुरुष समानतेच्या विचाराचा आहे. त्यामुळे हा लढा माणुसकीच्या न्यायतत्त्वावर आधारलेला पाहिजे. स्त्रीशिक्षित, आत्मनिर्भर, सर्व जबाबदाऱ्या पेलण्यास समर्थ असली, तरी असे वाटते की अजूनही खूप सुधारणा होणे आवश्यक आहे. शहराइतक्याच झपाट्याने ग्रामीण स्त्रियांमध्येही सुधारणा व्हायला हवी. महिलांनो राष्ट्र उभारणीत आपल्यावर फार मोठी जबाबदारी आहे. मुलांमध्ये उच्च नैतिक मूल्ये रुजवित संस्कारक्षम नवीन पिढी घडवायची आहे मुलांमध्ये स्त्रियांबद्दल आदर भावना निर्माण करून समस्त स्त्री वर्गाकडे बहिण, माता अशा भावनेने बघण्यास शिकविले पाहिजे.
तरुण पिढीचे वेल अजून मांडवावर चढायचे आहेत. त्या आधीच त्यांच्या आळ्यात शुद्ध विचारांचा उदक व डोळ्यात आचरणाचे अमृत पडायला हवे.
आपण सार्याजणींनी आत्मसंरक्षणासाठी सज्ज असायला हवे. शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त व मानसिकदृष्ट्या खंबीर राहून संकटांना सामोरे जाऊ या. आपला पेहराव उचित ठेवू या. मोबाईलवर फोटो, आपली माहिती अपलोड न करता आवश्यक तेवढाच वापर करू या. घरातल्यांनी सत्यतेची शहानिशा करावी लागणार नाही याची दक्षता घेऊ या. प्राचीन स्त्रियांच्या समस्या फार वेगळ्या व छोट्या होत्या. त्या मानाने स्त्रिया उंबरठा ओलांडून बाहेर पडल्याने त्यांचे जग विस्तारले, तसेच समस्यांचे स्वरूप ही बदलले. आपली काळजी आपण घेऊ या. भ्रूणहत्येविरोधात मानसिकता बदलली पाहिजे. एक सुंदर इंग्रजी वाक्य आहे 'मेन मेक हाऊसेस, विमेन मेक होम्स. (पुरुष घर बांधतात स्त्रिया घरकुल). या जगात स्त्रिया नसत्या तर ' अडगुळं मडगुलं सोन्याचं कडगुलं ' म्हणत बाळाला मांडीवर घेऊन रात्र जागवणारी आजी नसती. बाळाला स्वतःच जीवन देणारी आई नसती, 'माय मरो मावशी जगो' ही म्हण सार्थ करणारी मावशी नसती, रुसणारी आणि लगेच खुसकन हसणारी ताई नसती आणि 'आई ' म्हणत गळ्यात पडणारी छकुली ही नसती. म्हणजे काय जग असून, नसल्यासारखं झालं असतं. घरची ओढ ही भावना निर्माण केली स्त्रियांनी. म्हणून समग्र मानव जातीनेच भ्रूणहत्येविरोधात उभं ठाकलं पाहिजे.
- सौ. वसुंधरा अजय कदम
कृष्णानगर (खेड), सातारा.