सातारारोड येथे फरसाण कंपनीला आग; दोन कोटीचे नुकसान
By सातारारोड | संदीप पवार Tue 13th Jul 2021 08:05 am
सातारा - सातारारोड ,ता.कोरेगाव येथील यशवंत औद्योगिक वसाहती मध्ये असणाऱ्या गणेश फरसाण कंपनीला आज पहाटे अचानक लाग लागली .हि लागलेली आग इतकी भयानक होती कि संपूर्ण कंपनीच व सर्व साहित्य जळून खाक झाले. याबाबत सविस्तर माहिती अशी कि सातारारोड येथील यशवंत औद्योगिक वसाहती मध्ये नंदकुमार नामदेव कुलकर्णी व विनायक परशुराम गद्रे यांच्या मालकीची गणेश फरसाण कंपनी आहे. या कंपनीत फरसाण ,शेव ,पापडी ,शेंगदाणे ,फुटाणे ,नमकीन ,बटाटा वेफर्स ,भावनगर गाठी शेव व इतर पदार्थ तयार केले जात होते.नेहमीप्रमाणे सर्व कामकाज संपल्यानंतर कंपनी बंद करून मालक व कामगार घरी गेले. काही ठराविक कामगार तिथेच राहतात. रात्री बारा वाजेपर्यंत तिथे सर्व परिस्थिती ठिक होती.मध्यरात्रीच्या सुमारास अचानक आग लागली आणि यावेळी सिलेंडर टाकीचा मोठा स्फोट झाला. या स्फोटाचा आवाज पाचशे मीटर अंतरावर असलेल्या एका शेतकऱ्यांने ऐकला .त्या आवाजाच्या दिशेने धावत जाऊन तेथील गाढ झोपलेल्या कामगारांना जागे केले.तोपर्यंत आगीने रौद्र रूप धारण केले होते. संपूर्ण कंपनीतच आग पसरली होती. यावेळी सातारारोड येथील वालचंदनगर इंडस्ट्रीज लि.या कंपनीच्या फायर ब्रिगेडला फोन करण्यात आला. त्यानंतर रहिमतपूर व सातारा नगरपरिषदेच्या फायर ब्रिगेडच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. फायर ब्रिगेडच्या गाड्या घटनास्थळी येईपर्यंत आग सर्वत्र पसरली होती. या आगीमध्ये कंपनीमधील तयार झालेला सर्व माल ,कच्चा माल ,तेलाचे डबे ,सर्व मशिनरी ,आँफीस मधील साहित्य जळून खाक झाले. यामध्ये महत्त्वाचा भाग म्हणजे कंपनीत लागलेली आग मध्यरात्री लागल्यामुळे कोणत्याही प्रकारची जिवीतहानी झाली नाही. गणेश फरसाण हि कंपनी नवीन जागेत सुरू होऊन अवघी तीनच महिने झाले होते. या लागलेल्या भयानक आगीत गणेश फरसाण कंपनीचे अंदाजे दोन कोटी रुपयांचे नुकसान झाले असल्याचे सांगण्यात येत आहे.