blogs

सातारा बसस्थानकाला अतिक्रमणांचे ग्रहण

विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला; पालिका-पोलीस प्रशासनाचे साफ दुर्लक्ष

Eclipse of encroachment at Satara bus stand
सातारा बसस्थानकाच्या 500 मीटर परिघात बोकाळलेली अतिक्रमणे हा आजच्या घडीला गंभीर विषय ठरला आहे. या अतिक्रमणांमुळे बाहेरगावावरुन येणार्‍या विद्यार्थी-विद्यार्थीनींचे मात्र जीव टांगणीला लागले आहेत. असे असले तरी पालिका-पोलीस प्रशासन मात्र गेंड्याची कातडी पांघरुन या परिस्थितीकडे सोयीस्करपणे डोळेझाक करीत असल्याचे दिसून येत आहे. या प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी विनित जवळकर यांनी घेतला आहे या परिसराचा धांडोळा.

विनित जवळकर (भाग पहिला)
सातारा : सातारा बसस्थानकाच्या 500 मीटर परिघात बोकाळलेली अतिक्रमणे हा आजच्या घडीला गंभीर विषय ठरला आहे. या अतिक्रमणांमुळे बाहेरगावावरुन येणार्‍या विद्यार्थी-विद्यार्थीनींचे मात्र जीव टांगणीला लागले आहेत. असे असले तरी पालिका-पोलीस प्रशासन मात्र गेंड्याची कातडी पांघरुन या परिस्थितीकडे सोयीस्करपणे डोळेझाक करीत असल्याचे दिसून येत आहे. या प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी विनित जवळकर यांनी घेतला आहे या परिसराचा धांडोळा.
सातारा शहर तसे धड शहर ना गाव, अशी परिस्थिती झाली आहे. शहराचे सुशोभिकरण हे फक्त कागदपत्रांवरच दिसून येते. सातारा पालिका दरवर्षी घरपट्टी, पाणीपट्टी तर न चुकता (बडी धेंडे सोडून) नागरिकांकडून वसूल करतेच. मात्र विकासाच्या नावावर फक्त आणि फक्त आपलाच बाब्या म्हणवून घेण्याचे काम मात्र जिकडे-तिकडे सुरु आहे. अतिक्रमणे पदपथावर आणि पादचारी रस्त्यावर, अशी परिस्थिती सातार्‍यात आहे. पालिकेने हे पदपथ (फुटपाथ) पादचार्‍यांसाठी बांधले, की त्यावर बसणार्‍या विक्रेत्यांसाठी? हा गहन प्रश्‍न आहे. शहराची वाढ होत असताना रहदारीही खूप वाढली आहे. याचा सर्वस्वी ताण वाहतूक शाखेवर पडत असतो. त्यांनी बिचार्‍यांनी या अतिक्रमितांना हुसकवायचे की शहरातील वाहतूक सुरळीत राखायची, का मार्च एन्ड चा कोटा पूर्ण करायचा? अशा एक ना अनेक जबाबदार्‍या या वाहतूक पोलिसांवर असतात. तरीही त्यांचे प्रयत्न हे सुरुच असतात.
सातारा पालिका शहरात बोकाळलेल्या अतिक्रमणांवर काय कारवाई करते, याची कुचेष्टा तर आता शहरातील शेंबडे पोरसुद्धा करते. एकदा अतिक्रमण काढल्यानंतर त्याठिकाणी ते परत होवू नये, यासाठी कोणतीही यंत्रणा पालिकेकडे उपलब्ध नाही. त्यामुळे अतिक्रमण करणार्‍यांना पालिकेचा कोणताच दरारा राहिलेला नाही. काही भागातील नगरसेवकच आपापल्या कार्यकर्त्यांना मोक्याच्या जागा देत अतिक्रमणांना खतपाणी घालत आहेत. काही संघटनाही आपल्या हस्तकांना चांगली जागा कशी मिळेल आणि ती जागा कशी त्याचीच होईल, याकडे लक्ष देताना दिसून येत आहेत.
शहरात वाढलेल्या या अतिक्रमणांवर कोणा समाजसेवक, माध्यम प्रतिनिधीने आवाज उठवल्यास थातुरमातूर जुजबी कारवाई होते. त्या कारवाईत शेवटचे अतिक्रमण उठवताना पहिले आपल्या जागेवर आलेले असते, ही सातारची शोकांतिका आहे. बर, कारवाई होतानाच थोरल्या वा धाकल्या वाड्याचा ढोस त्या अधिकार्‍यांना दिला जातो. तरीही जरी कर्तव्याशी जागत एखाद्याने कारवाईचा दंडुका उगारलाच तर लगेच तडक वाड्यांवर धाव घेवून हे अतिक्रमण थांबवले जाते. वाड्यांवरले थोरले वा धाकले मालक बाहेरगावाला गेले असल्यास लगेच त्या-त्या भागातील नगरसेवक आहेतच हे सगळे थांबवायला आणि मालक परत आल्यानंतर आपण काय आणि कसे केले, याच्या फुशारक्या (?) मारायला. एवढ्यावरच हे प्रकरण न थांबता त्या अधिकार्‍याच्या नाकावर टिच्चून ते अतिक्रमण त्याच्या डोळ्यादेखत पूर्ववतही होते. सांगा, कारवाई कशी करायची?
शहराचा विकास व्हावा हे त्या शहरात राहणार्‍या प्रत्येक नागरिकाची मागणी असते. अतिक्रमणे का होतात? त्यांना पर्यायी जागा देवून ती इतरत्र हलवता येणार नाहीत का? पुण्यासारखी एखादी तुळशीबाग सातार्‍यात वसवता येणार नाही? खाण्यापिण्यासाठी एखादी स्वच्छ सारसबाग आपल्याला फुलवता येणार नाही? जोपर्यंत लोकप्रतिनिधी, मुख्याधिकारी, नगरसेवक, अधिकारी, पोलीस प्रशासन यांची एकत्रित बैठक होवून यावर रामबाण उपाय काढत नाहीत, तोवर येरे माझ्या मागल्या, अशी कारवाई होतच राहणार. सर्वसामान्यांचे सुंदर सातार्‍याचे स्वप्न हे स्वप्नच राहणार. नियोजनशून्य प्रशासनामुळे सातारकरांना आपला जीव मुठीत धरुन जगावे लागत आहे. आपल्या मुलांनाही या जत्रेत त्यांच्या-त्यांच्या नशिबावर रस्त्यावर सोडावे लागत आहे. आपल्या बापाचाच सातारा असल्यासारखी धनिकांची बांडगुळे शहरातून स्टंट करीत गाड्या बेफाम चालवित असतानाच पदपथांवरील अतिक्रमणांमुळे सर्वसामान्यांच्या या मुलांना रस्त्यावरुन चालण्याशिवाय पर्यायच नसल्याने त्यांना हातावर जीव घेवूनच चालावे लागत आहे. जरी एखादा अपघात झाला, तरी या बड्या बापाच्या पोरांसाठी फोनवर फोन येतात आणि हा लाडला कॉलर टाईट करुन पोलीस ठाण्यातून आपल्या घराचा रस्ता धरतो.
सातारा बसस्थानक परिसराच्या 500 मीटर अंतरावरील अतिक्रमणांकडे आपण पाहुया. बसस्थानक ते पोवई नाका रस्त्यावर असणारा पदपथ हा नामशेषच झाला आहे. याठिकाणी आजपावेतो इतक्या कारवाया झाल्या तरी येथील हॉकर्स आपले बस्तान उठवायला तयारच नसतात. कसे उठतील? त्यातील काहीजण संघटनांचे अध्यक्ष, पदाधिकारी आहेत. या रस्त्यावरुन विविध महाविद्यालयांमध्ये, शाळांमध्ये शिकणारे बाहेरगावचे विद्यार्थी-विद्यार्थीनी नियमित या रस्त्यावरुन ये-जा करतात. मागील इतिहास पाहता पोवई नाक्यावरुन येताना कित्येकवेळा वाहने ब्रेकफेल होवून अपघात घडले आहेत. याचा अनुभव घेता जर पुन्हा असे काही झाले तर या मुलांच्या जिविताचे काय? हा प्रश्‍नच अंगावर शहारा आणणारा आहे. या पदपथावरील विक्रेत्यांना शेवटी आपला माल विकायचा असतो, त्यांना बाकीचा कशाला विचार असणार?
सातारा वाहतूक विभाग आणि पालिका कारवाई करते ती सकाळी दहानंतर. मात्र, सकाळी दहापूर्वी सातारा बसस्थानकासमोरच्या भरणार्‍या मंडईकडे पाहिल्यास मस्तवाल असलेल्या मोठ्या फळ व भाजी विक्रेत्यांचे गाडे आणि गाड्या या जवळपास अर्धा रस्ता व्यापून उभ्या असतात. या फळ-भाजी विक्रेत्यांना वाहतूक वा नागरिकांच्या जिविताशी काहीएक घेणे-देणे नसते. दहानंतर मात्र पालिकेची गाडी आल्यावर गरीब शेतकरी आपापली टोपली सांभाळत आणखीनच अंग चोरुन बसतात. मात्र चोर सोडून संन्याशाला फाशी या उक्तीप्रमाणे त्यांच्यावर कारवाई होते आणि बडे विक्रेते खुशाल निघुन जातात.   (उद्या भाग दुसरा)