सातारची माती ही कसदार आहे. या मातीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या इवल्या इवल्या पावलांचे ठसे उमटले आणि याच मातीतून त्यांनी प्रज्ञेच्या, विद्वत्तेच्या वैश्विक नभांगणात उंच भरारी घेतली. ते इतके उंच गेले की त्यांच्या कार्यकर्तृत्वाने अवघ्या जगाचे डोळे दीपले.
सातारची माती ही कसदार आहे. या मातीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या इवल्या इवल्या पावलांचे ठसे उमटले आणि याच मातीतून त्यांनी प्रज्ञेच्या, विद्वत्तेच्या वैश्विक नभांगणात उंच भरारी घेतली. ते इतके उंच गेले की त्यांच्या कार्यकर्तृत्वाने अवघ्या जगाचे डोळे दीपले. सिम्बॉल अॉफ नॉलेज म्हणून त्यांची ख्याती झाली. आज याच महामानवाच्या प्रेरणेतून नवऊर्जा घेऊन संबध देशभरातील युवा-विद्यार्थी पिढी घडतेय, वाढतेय हा एका अर्थाने सातारच्या मातीचाच विजय होय.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म हा साताऱ्यात झाला नसला तरी त्यांचे बालपण मात्र सातारच्या मातीला पहावयास व अनुभवयास मिळाले. खेळण्या बागडण्याची साधारपणे ८ ते ९ वर्षे लहानग्या बाबासाहेबांची साताऱ्यात गेली. लहानपणी त्यांना भिवा असे म्हणत. त्यांच्या शैक्षणिक प्रवासाचा प्रारंभ खऱ्या अर्थाने साताऱ्यातून झाला. ७ नोव्हेंबर १९०० रोजी त्यांनी छत्रपती प्रतापसिंह महाराज हायस्कूल येथे इयत्ता पहिलीमध्ये इंग्रजी वर्गात प्रवेश घेतला. हा त्यांचा शाळा प्रवेश दिन 'विद्यार्थी दिवस' म्हणून महाराष्ट्रातील सर्व शाळा, महाविद्यालयांतून दरवर्षी ७ नोव्हेंबरला साजरा होत असतो.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा शाळा प्रवेश दिन हा विद्यार्थी दिवस व्हावा यासाठी व्यक्तिशः मी मागील १६ वर्षापासून महाराष्ट्र सरकारकडे आग्रह धरला होता. मात्र शासन त्याबाबत फारसे गंभीर दिसत नव्हते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या शतकोत्तरी रौप्य महोत्सवी जयंती वर्षानिमित्त (१२५ व्या जयंतीनिमित्त) तरी या आग्रहाला दाद द्यावी आणि विद्यार्थी दिवस घोषित करावा यासंबधाने मंत्रालस्तरावर बैठका - चर्चा सुरू होत्या. परंतु यश काही येत नव्हते. त्यामुळे मुंबईच्या चैत्यभूमी येथील समुद्रात १२५ विद्यार्थी घेऊन जलसमर्पण करण्याची भूमिका मला घ्यावी लागली आणि अखेर शासनाच्या शिक्षण मंत्रालयाने २७ अॉक्टोंबर २०१७ रोजी विद्यार्थी दिवस घोषित केला. आता हा विद्यार्थी दिवस भारतभर साजरा होणं महत्वाचे असल्याने दिल्ली दरबारी शर्थीचे प्रयत्न सुरु ठेवले आहेत. महामहिम राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी यासंबधी अधिकृत घोषणा करणं गरजेचं आहे. डॉ. राधाकृष्ण सर्वपल्ली यांच्या नावाने शिक्षक दिन व डॉ. अब्दूल कलाम यांच्या नावाने वाचक दिन देशभर साजरा केला जातो, तसा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने संपूर्ण भारतात विद्यार्थी दिवस साजरा व्हायला हवा, यासाठी राज्य आणि राज्याबाहेरून १ लाख २५ हजार पत्रे दिल्लीला पाठविण्याची मोहिम गेल्या वर्षापासून मी राबवतोय.
खरंतर, सातारचे हे छत्रपती प्रतापसिंह हायस्कूल डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या शाळा प्रवेशाने कमालीचे चर्चेत आले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या शतकोत्तरी रौप्य महोत्सवी जयंती वर्षाच्या निमित्ताने ५० लाख रुपयेसुध्दा भव्यस्वरुपातील ग्रंथदालन निर्माण करण्यासाठी शासनाच्या माध्यमातून मी मिळवून दिले आहेत. हायस्कूलचे मुख्याध्यापक सन्मती देशमाने यांनी या हायस्कूलचे ऐतिहासिक महत्व आणि गांभीर्य ओळखून हायस्कूलला ऊर्जितावस्था प्राप्त करून दिलीय. ३९ पटसंख्या असणाऱ्या या हायस्कूलची पटसंख्या दीडशेच्या पुढे नेली. गुणवत्ता विकासाबरोबरच शिक्षकांची कार्यक्षमता वाढवली. लेखन - वाचन प्रकल्प, अध्ययन समृद्धी असे अनेकविध कल्पक उपक्रम राबवून हायस्कूलचा चेहरा बदलवला. नवीन बिल्डींग, विद्यार्थ्यांसाठी व विद्यार्थिनीसाठी स्वतंत्र शौचालय, जुने व जीर्ण साहित्य निर्लेखन, शाळेच्या शेती फार्मची जागा नावावर करून घेणे अशा कार्यात या ऐतिहासिक शाळेचा मुख्याध्यापक म्हणून त्यांनी स्वतःला झोकून दिलेय.
आज देश-विदेशाच्या कानाकोपऱ्यातून लोक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची ही शाळा पहायला येत आहेत. या शाळेला आंतरराष्ट्रीय दर्जा देण्यात यावा यासाठीचा आग्रहही सर्वस्तरातून होतोय. जुलै २०१८ मध्ये माझी मुंबई आणि नागपूरमध्ये काही मंत्र्याशी यासंबधाने महत्वपूर्ण चर्चाही झाली. त्यानुषंगाने आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळ समिती गठित केली गेली. मात्र या समितीला काही मर्यादा आल्याने समिती ठप्प झाली. असे असले तरी हायस्कूलस्तरावर कोरोनाला न जुमानता होत असलेली प्रगती आणि विकास हा निश्चितच कौतुकास्पद आहे. कारण या हायस्कूलच्या प्रशासनाला आणि एकूणच साताऱ्याला ठाऊक आहे कि येथे असा विद्यार्थी शिकून गेलाय की ज्याने अखंड देशाचं संविधान निर्माण करून या भारताला सर्वात प्रगल्भ अशी लोकशाही बहाल केलीय.
काही वर्षापूर्वी 'जगात आजपर्यंत सर्वात हुशार विद्यार्थी कोण होऊन गेला' यासंबंधीचे संशोधन झाले. इंग्लंड, अमेरिका येथील कोलंबिया, अॉक्सफर्ड अशा नामवंत विद्यापीठांनी यासाठी पुढाकार घेतला होता. हे संशोधन बरेच माहिने सुरु राहिले. नामवंत विद्यापीठांमधील तज्ज्ञ यामध्ये सक्रियपणे राबत होते. या संशोधनातून एक नंबरसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नांव पुढे आले. जगभर अनेक महापुरुषांचे असंख्य पुतळे आहेत. परंतु जगात इतर कोणत्याच महापुरुषाच्या पुतळ्याखाली 'सिम्बॉल अॉफ नॉलेज' असे कोट करण्यात आलेले नाही. कोलंबिया विद्यापीठात मात्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जो पुतळा आहे त्यावर 'सिम्बॉल अॉफ नॉलेज' असे कोट करण्यात आलेले आहे. हा गौरवपूर्ण संदर्भ इथे एवढ्याचसाठी द्यावासा वाटतो की सातारच्या या छ. प्रतापसिंह हायस्कूलमध्ये शिकलेला एक विद्यार्थी जगातला सर्वात हुशार विद्यार्थी ठरू शकतो.
अफाट अन् अचाट बुध्दिमत्ता लाभलेले आभाळ उंचीचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आजही छ. प्रतापसिंह हायस्कूलच्या रजिस्टरला भिवा रामजी आंबेडकर असे नाव असून १९१४ क्रमांकाला तशी नोंद आहे. प्रवेश घेताना या शाळेच्या मनाला आणि तेथील मातीच्या कणाला पूसटशी कल्पनाही नसेल की हा बाल भिवा भविष्यात जगातला आदर्श विद्यार्थी ठरेल. परंतु हे सारं भिवाने आपल्या विलक्षण प्रतिभेच्या जोरावर खरं ठरवले. मी तर असे म्हणेन या शाळेमुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर नावाचा प्रज्ञासूर्य जगाला मिळाला. या शाळेत त्यांचे पाऊल पडले आणि याच मातीतून प्रज्ञेच्या, विद्वत्तेच्या अवकाशात उंच भरारी घेण्याचे बळसुध्दा त्यांना प्राप्त झाले. त्यामुळे छत्रपती प्रतापसिंह महाराज हायस्कूल हे केवळ सातारकरांचे नाही तर या जगाचे आज प्रेरणास्थान ठरलेलं आहे. म्हणूनच त्यांचा शाळा प्रवेश हा भारताच्या दृष्टीने नवी पिढी घडवणारा, नवनिर्माणाचे स्वप्न विद्यार्थ्यांच्या मन, मेंदू अन मनगटात सळसळत ठेवणारा दिवस आहे. या दिवसाचे स्मरण चिरंतन ठेवायला हवं. शाळेत जाणं किती महत्त्वाचे आहे हे यानिमित्ताने विद्यार्थ्यांच्या मनात रुजवायला हवं.
जर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे शाळेत पाऊल पडलेच नसते, ते शाळेत गेलेच नसते आज संविधान निर्माण झाले नसते. भारतीय समाजव्यवस्थेच्या, धर्मव्यवस्थेच्या आणि जातीवयवस्थेच्या तळातला समूह आजही गंटागळ्या खात गुदमरत राहिला असता. गळ्यात मडकं आणि पाठीला झाडू तसाच राहिला असता. केवळ अस्पृश्यच नव्हे तर तर सवर्ण स्त्रियांनाही इथल्या पुरषीव्यवस्थेच्या अंधार कोठडीत खीतपत पडावे लागले असते. पेटत्या चितेमध्ये उडी घ्यावी लागली असती. मुंडण करून फिरावे लागले असते. या आणि अशा सर्व पार्श्वभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा शाळाप्रवेश मानवी जीवनाचा उत्कर्षारंभ ठरतोय हेही यानिमित्ताने लक्षात घेतले पाहिजे. आपल्याला उद्याचा नवा, समृध्द, शक्तिशाली भारत उभा करायचा असेल, तमाम गोरगरिबबांच्या, दलित- वंचितांच्या आणि एकूणच समाजाच्या नव्या पिढीला शिक्षणाच्या मुख्य धारेत आणायचे असेल तर एकही मूल शिक्षणापासून वंचित राहता कामा नये हे पाहण्याची आवश्यकता आहे. यातून समाजाला शिक्षणाची जबरदस्त प्रेरणा आणि चालना मिळणार असून व्यापक स्तरावर शालेय शिक्षण चळवळ अधिक गतिमान होत राहणार आहे.
अरुण विश्वंभर जावळे.
(प्रवर्तक, विद्यार्थी दिवस)
9822415472