लोकसहभागातून पाचगणीच्या कचरा व्यवस्थापनाचा डंका राजस्थानमध्ये
नगराध्यक्षा लक्ष्मी कर्हाडकर यांच्या सादरीकरणाने देशभरातील प्रतिनिधी भारावले
‘स्वच्छ सुंदर पाचगणी’च्या यशाला लोकसहभागाची जोड मिळाल्यानेच पाचगणी देशाला दिशादर्शक ठरले, असल्याचे प्रतिपादन पाचगणी गिरिस्थान नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा लक्ष्मी कर्हाडकर यांनी राजस्थान येथील अल्वा येथे केले.
पाचगणी : ‘स्वच्छ सुंदर पाचगणी’च्या यशाला लोकसहभागाची जोड मिळाल्यानेच पाचगणी देशाला दिशादर्शक ठरले, असल्याचे प्रतिपादन पाचगणी गिरिस्थान नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा लक्ष्मी कर्हाडकर यांनी राजस्थान येथील अल्वा येथे केले.
कचरा व्यवस्थापन व प्रकल्प व्यवस्थापनामध्ये देशात उल्लेखनीय कार्य करणार्या पाचगणी पालिकेच्या नगराध्यक्षा लक्ष्मी कर्हाडकर यांच्या कार्याची दखल थेट राजस्थान सरकारने घेतली.
यानिमित्ताने राजस्थान येथे सेंटर ऑफ अँड एन्व्हायरमेंट दिल्ली या संस्थेच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित केलेल्या अनिल अग्रवाल इन्व्हरमेंट ट्रेनिंग इन्स्टिट्यूट राजस्थान येथील कचरा व्यवस्थापन कार्यशाळेत कर्हाडकर मार्गदर्शन करताना बोलत होत्या.
या कार्यक्रमात देशातील निवडक 50 नगरपालिकांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.
पाचगणी पालिकेने घनकचरा व्यवस्थापन, विलागीकरण व त्यावरील प्रक्रिया, बायोगॅस प्रकल्प आणि वीज निर्मिती कशा पद्धतीने राबवली तसेच मैला शुद्धीकरण केंद्र, बांधकाम कचरा व राडारोडा विलागीकरण प्रक्रिया व्यवस्थापन केंद्र तसेच एखादा प्रकल्प अथवा विकासकामे राबवल्यानंतर त्याच्यात सातत्य कसे टिकवून ठेवले आहे. याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
प्रशासन पातळीवर राज्य सरकारने पैसे उपलब्ध नाही केले तर कशा पद्धतीने नियोजन करावे व मनुष्यबळ नसेल तर काय उपाययोजना कराव्यात, कमी खर्चात कशा पद्धतीने कचरा मुक्तीला तोंड द्यावे याबाबत त्यांनी तब्बल साडेतीन तास मार्गदर्शन केले. कर्हाडकर यांनी पाचगणीची यशोगाथा सादर करताना लोकांचा सहभाग किती महत्त्वाचा आहे, हे पटवून दिले. उपस्थित सदस्यांनी पाचगणीच्या यशाचे कौतुक केले.
या कार्यशाळेस सिक्कीम, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, केरळ, हिमाचल प्रदेश, दिल्ली अशा विविध राज्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.