पाचगणी कोविडमुक्त करण्यास पालिका सरसावली
घरोघरी आरोग्य पथके जाऊन करताहेत तपासणी; नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन
कोरोनाच्या नव्या व्हायरसचा प्रादुर्भाव तसेच लोकांच्या बेफीकीरपणामुळे कोरोनाचा नवा स्ट्रेन जोरात फैलावतोय. बाधित रुग्णांचे प्रमाण दररोज वाढत असल्याने त्याला वेळीच रोखण्याकरिता पाचगणी नगरपरिषद शहरातील प्रत्येक वॉर्डमध्ये नगरपालिकेने तयार केलेल्या दहा आरोग्य पथकांमार्फत घरोघरी जाऊन नागरिकांची ऑक्सिजन लेव्हलची तपासणी केली जाणार असून, काही लक्षणे दिसून आल्यास अशा लक्षणे असलेल्यांची नावे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास देऊन त्यांची तपासणी करून पाचगणी शहरात वाढणार्या कोरोनाला प्रतिबंध घातला जाणार आहे.
पाचगणी : कोरोनाच्या नव्या व्हायरसचा प्रादुर्भाव तसेच लोकांच्या बेफीकीरपणामुळे कोरोनाचा नवा स्ट्रेन जोरात फैलावतोय. बाधित रुग्णांचे प्रमाण दररोज वाढत असल्याने त्याला वेळीच रोखण्याकरिता पाचगणी नगरपरिषद शहरातील प्रत्येक वॉर्डमध्ये नगरपालिकेने तयार केलेल्या दहा आरोग्य पथकांमार्फत घरोघरी जाऊन नागरिकांची ऑक्सिजन लेव्हलची तपासणी केली जाणार असून, काही लक्षणे दिसून आल्यास अशा लक्षणे असलेल्यांची नावे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास देऊन त्यांची तपासणी करून पाचगणी शहरात वाढणार्या कोरोनाला प्रतिबंध घातला जाणार आहे. याकरिता आपल्या दारात येणार्या आरोग्य कोविड दूतांना आपली योग्य माहिती देऊन सहकार्य करावे, असे आवाहन पाचगणी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी गिरीश दापकेकर यांनी पाचगणीकर नागरिकांना केलं आहे.
पाचगणी शहरात सध्या नव्या कोविड स्ट्रेनने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. त्याला रोखण्याकरिता पाचगणी नगरपरिषदेने त्रिसूत्री आरोग्य मोहीम हाती घेतली आहे. याबाबत मुख्याधिकारी गिरीश दापकेकर यांनी कर्मचार्यांना मार्गदर्शन केले आहे. या मोहिमेंतर्गत शहरातील प्रत्येक घरोघरी जाऊन आरोग्याची त्रिसूत्री मोहीम राबवली जाणार आहे. याकरिता दहा आरोग्य पथके तयार करण्यात आली आहेत. तर यामध्ये आरोग्य सेविका यांचा सुद्धा समावेश करण्यात आला आहे.
ही आरोग्य पथके घरोघरी जाऊन नागरिकांची ऑक्सिजन लेव्हल तपासणार आहेत. मोहिमेंतर्गत पाचगणी नगरपरिषद शहरातील प्रत्येक प्रभाग वॉर्डमध्ये नगरपालिकेने तयार केलेल्या दहा आरोग्य पथकांमार्फत घरोघरी जाऊन नागरिकांची तपासणी केली जाणार आहे. या तपासणी पथकात तीन आरोग्य दूत असणार आहेत. या येणार्या आरोग्य कोविड दूतांना आपल्या आरोग्याची योग्य माहिती देऊन सहकार्य करावे, असे आवाहन पाचगणी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी गिरीश दापकेकर यांनी केले आहे.
या अगोदर पाचगणी शहरात ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेंंतर्गत शहरातील सोळा हजार नागरिकांचे ट्रेकिंग, ट्रेसिंग, पाचगणी नगरपरिषदेने कोरोनाला हद्दपार करण्याकरिता आता ‘फोर टी’ हा उपक्रम राबविला आहे. त्याच धर्तीवर आता पुन्हा पर्यटननगरी कोरोनामुक्त करण्याकरिता पालिकेने कंबर कसली आहे. याकरिता वॉर्ड व प्रभागनिहाय आरोग्य पथके घरोघरी जाऊन प्रत्येक नागरिकाची ऑक्सिजन लेव्हल व इतर आजारांची माहिती घेत लक्षणेग्रस्त रुग्णांची माहिती आरोग्य केंद्रात दिली जाणार असून त्यांच्याद्वारे उपचार व्यवस्था केली जाणार आहे. त्यामुळे या मोहिमेची तपासणी अत्यंत काळजीपूर्वक केली जात असून, प्रत्येक नागरिकाचे यास सहकार्य अपेक्षित असून, या तपासणीची ऑनलाईन माहिती शासनास दिली जाणार आहे.
पालिकेची अनोखी ‘फोर टी प्लॅन’ मोहीम...
पाचगणी नगरपरिषदेने या अगोदर ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेंंतर्गत अनोखी ‘फोर टी प्लॅन’ मोहीम ट्रेसिंग, ट्रेकिंग, टेस्टिंग, ट्रिटिंग) राबवली असल्याने आत्ताची मोहीम राबविणे अत्यंत सुकर होईल. तसेच कोरोना रोखण्यास पालिकेला या माध्यमातून नक्कीच यश येणार आहे.पाचगणी शहरात सध्या 58 मायक्रो कंटेन्मेंट झोन कार्यरत असून 93 रुग्ण होम आयसोलेशनमध्ये उपचार घेत आहेत. आजअखेर 157 कंटेन्मेंट झोन झाले आहेत. तर आजपर्यंत एकूण बाधित रुग्ण 458 झाले आहेत.
कोविडमुक्त पाचगणी शहर करण्याकरिता सर्व पाचगणीकर शहरवासियांनी यास प्रतिसाद देत सहकार्य करावे, असे अवाहन करीत लवकरच पर्यटननगरी पुन्हा कोविडमुक्त करण्याचा मनोदय आहे.
- गिरीश दापकेकर, मुख्याधिकारी, पाचगणी नगरपरिषद.