सातारा, दि. 27 ः प्रेम, विश्वास, आदर, काळजी, आपुलकीच्या आधारावर सुखी संसार सुरू असतानाच एखादे वादळ येऊन संसाराची गाडी भरकटते. इगो, संशय, मत्सर, अविश्वास अशा अनेक कारणांनी संसारामध्ये भांडणे लागतात. ही भांडणे चार भिंतीत न राहता अनेकदा संसार मोडण्याची वेळ येते. अशावेळी दोन्ही बाजू समजून घेऊन समझोता करणार्या हक्काच्या आणि विश्वासू संस्थेची गरज असते. पोलीस दलाच्या ‘भरोसा सेल’ने आपले नाव सार्थ करून दाखवत गेल्या वर्षभरात 46 व यावर्षीच्या 9 अशा 55 जणांचा संसाराची गाडी पुन्हा रुळावर आणली आहे.
दीपक देशमुख
सातारा, दि. 27 ः प्रेम, विश्वास, आदर, काळजी, आपुलकीच्या आधारावर सुखी संसार सुरू असतानाच एखादे वादळ येऊन संसाराची गाडी भरकटते. इगो, संशय, मत्सर, अविश्वास अशा अनेक कारणांनी संसारामध्ये भांडणे लागतात. ही भांडणे चार भिंतीत न राहता अनेकदा संसार मोडण्याची वेळ येते. अशावेळी दोन्ही बाजू समजून घेऊन समझोता करणार्या हक्काच्या आणि विश्वासू संस्थेची गरज असते. पोलीस दलाच्या ‘भरोसा सेल’ने आपले नाव सार्थ करून दाखवत गेल्या वर्षभरात 46 व यावर्षीच्या 9 अशा 55 जणांचा संसाराची गाडी पुन्हा रुळावर आणली आहे.
एखादा गुन्हा घडल्यानंतर कारवाई करण्याबरोबरच गुन्हा घडू नये, यासाठी शासनाच्या वतीने विविध उपाययोजना करण्यात येतात. अनेकदा घरातीलच काही किरकोळ वाद विकोपाला गेल्यास गुन्हे घडू शकतात. गुन्हे दाखल झाल्यास नात्यांना तडे जाऊ शकतात. संसाराची घडी विस्कटू शकते. अशी अनेक उदाहरणे आपल्या आजूबाजूला दिसून येतात. असे वाद-विवाद, तंटे मिटवून वेळीच गुन्हा रोखला जावा, यासाठी सातारा जिल्हा पोलीस दलाचा ‘भरोसा सेल’ आपले काम चोख बजावत आहे. या ‘सेल’च्या माध्यमातून महिलांना आणि बालकांना सुरक्षा देतानाच गुन्हा रोखण्यासाठी त्यांना योग्य मार्गदर्शन करण्यात येत आहे. कौटुंबिक हिंसाचाराचा सामना करावा लागलेल्या महिला व मुलांना ‘भरोसा सेल’मुळे मोठा आधार मिळत आहे. योग्य समुपदेशनामुळे घरातील वाद मिटून पुन्हा संसाराची गाडी रुळावर येत आहे.
याबाबत माहिती देताना ‘भरोसा सेल’च्या सपोनि माधुरी जाधव म्हणाल्या, ‘भरोसा सेलमध्ये महिला सहायता कक्ष, ज्येष्ठ नागरिक कक्ष आणि विशेष बाल पथक असे तीन कक्ष आहेत. यातील महिला सहायता कक्षात 2020 वर्षात एकूण 85 अर्ज आले आहेत. त्यापैकी 46 अर्जांवर योग्यरितीने समुपदेशन करून तडजोडीने अर्ज निकाली काढले आहेत. तसेच 2021 या वर्षात 20 अर्जांपैकी पैकी 9 प्रकरणे तडजोडीने मिटवली आहे. ज्या प्रकरणात तडजोड होत नाही, अशा अर्जांबाबत गुन्हा दाखल करण्याबाबत संबंधित पोलीस ठाण्याशी पत्रव्यवहार केला जातो. तसेच एखाद्या महिलेवर अन्याय झाला असेल तर त्याठिकाणीही महिलेला योग्य मार्गदर्शन करून त्याठिकाणी गुन्हा दाखल करून घेतलेला आहे. गतवर्षात आणि आजअखेर ‘भरोसा सेल’कडून अशा 7 अर्जांबाबत गुन्हे दाखल केले आहेत.’
याचबरोबर ज्येष्ठ नागरिक कक्षात 2020 सालात प्राप्त 24 अर्जांपैकी 21 तर यावर्षात आजअखेर प्राप्त 5 पैकी 2 प्रकरणे तडजोडीने मिटवून ज्येष्ठांना आधार दिला आहे. तसेच ज्येष्ठ नागरिकांची दर महिन्याला एक बैठक घेतली जाते. यालाही चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे सांगण्यात आले. विशेष बाल पथकात गतवर्षात व आजअखेर एक अर्ज आला असून, तो तडजोडीने मिटवला आहे.
गतवर्षात कोरोनामुळे हाहाकार उडाला होता. कोरोना ड्युटीवर असलेले अनेक पोलीस कर्मचारी बाधित झाले. पोलीस नियंत्रण कक्षातही कोरोनाचा शिरकाव झाल्यामुळे ‘भरोसा सेल’मधील कर्मचार्यांना नियंत्रण कक्षात नेमणुकीवर जावे लागले. ही जबाबदारी आल्याने काही काळ ‘भरोसा सेल’ बंद करण्याची वेळ आली. हा लॉकडाऊनचा काळ असल्याने घरगुती हिंसाचार, वाद विकोपाला जाण्याचे प्रमाणही वाढले होते. त्यामुळे ‘भरोसा सेल’मध्ये अर्ज येतच होते. तथापि, ‘भरोसा सेल’चे काम सुरू झाल्यानंतर येथील स्टाफने पुन्हा जोमाने काम करत पेन्डन्सी वाढू न देण्याची खबरदारी घेतली.
जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, ‘एलसीबी’चे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली ‘भरोसा सेल’च्या सहायक पोलीस निरीक्षक माधुरी जाधव, महिला सहायक कक्षातील हवालदार नंदकुमार चव्हाण, शुभांगी पवार, संगीता काळेल, ज्येष्ठ नागरिक कक्षात हवालदार विनायक राऊत, अंजली लोखंडे, विशेष बाल पथकात तृप्ती मोहिते, परशुराम वाघमारे आदी स्टाफ आपले काम चोख बजावत आहे. संपर्कासाठी या नंबरवर संपर्क साधावा. महिला हेल्पलाईन ः 1091, जेष्ठ नागरिक हेल्पलाईनः 1090, चाईल्ड हेल्पलाईन ः 1098. महिला, बालक तसेच ज्येष्ठ नागरिक यांच्याशी संवाद साधून अत्याचारांविरुद्ध लढण्यासाठी शारीरिक आणि मानसिक बळ मिळवून देण्याच्या उद्देशाने सुरू केलेला सातारा जिल्हा पोलीस दलाचा ‘भरोसा सेल’ खर्या अर्थाने पीडितांसाठी विश्वासपात्र ठरत आहे.